नवी दिल्ली – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे.ही सुनावणी पुन्हा लांबणीवर गेल्यामुळं सत्ताधाऱ्यांची धाकधुक वाढली आहे.आज (22 ऑगस्ट) होणारी सुनावणी आता उद्या (23 ऑगस्ट) होणार आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातील न्यायमूर्ती सी. टी. रवीकुमार यांच्या आजच्या अनुपस्थितीमुळे ही सुनावणी लांबणीवर गेल्याचे सांगण्यात येत आहे.आजची सुनावणी उद्यावर गेली असल्याचं सांगितलं जातंय. तीन जणांच्याच खंडपीठासमोर सुनावणी होणं अपेक्षित असल्यानं ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचं सांगितलं जातंय.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी ४ ऑगस्टला शेवटची सुनावणी घेण्यात आली होती. त्यानंतर तिसऱ्यांदा ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात आहे. हे प्रकरण पाच किंवा अधिक न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे पाठवणं, खरी शिवसेना कोणाची, तसंच बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत अशा मुद्दांवर सुनावणी होईल. या सुनावणीकडे महाराष्ट्रासह देशभराचं लक्ष लागलं आहे. हे यापूर्वी तीन सुनावण्या झाल्या आहेत. मात्र, अद्यापही ठोस निर्णय झालेला नाही. शिवसेना नक्की कुणाची उद्धव ठाकरे यांची की बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे यांची याचा फैसला या सुनावणीत होणार आहे.
महाराष्ट्राचा सत्तासंघर्ष आता न्यायालयीन लढ्यापर्यंत पोहोचला आहे. बंडखोर १२ आमदारांच्या निलंबनाचा विषय, विधानसभा उपाध्यक्षांबाबत बंडखोर आमदारांनी आणलेला प्रस्ताव, खरी शिवसेना कुणाची ? राज्यपालांची भूमिका, विधानसभा अध्यक्षांची निवड,अशा एकमेकांशी संबंधित असणाऱ्या गुंतागुंतीच्या राजकीय पेचावर सर्वोच्च न्यायालयात नेमका काय निर्णय होतो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.शिवसेनेच्या इतिहासातलं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं बंड शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्या रुपात पाहिलंय. त्यानंतर विस्कळीत झालेली शिवसेनेची घडी बसवण्याचं आव्हानही उद्धव ठाकरेंसमोत आहे. शिवाय धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाला मिळणार, यावरुनही चढाओढ पाहायला मिळतेय. त्यासाठीही कागदोपत्री लढा सुरु असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. या सगळ्या अनुशंगाने करण्यात आलेल्या एकूण पाच याचिकांवर सध्या सुप्रीम कोर्टात एका विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे.