तमाशा कलावंतांचा जीवनपट उलगडणारे नाटक मी आणि माझी कला
६३ वी मराठी राज्य हौशी नाट्य स्पर्धा ,नाशिक केंद्र
६३ व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत १४ डिसेंबर रोजी हं. प्रा. ठा. कला व रा. म. क्ष. विज्ञान महाविद्यालय, नाशिक या संघातर्फे मी आणि माझी कला हे नाटक सादर करण्यात आले. तमाशा आणि इतर लोककलावंतांना आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना समाजात प्रतिष्ठा मिळत नाही हे मी आणि माझी कला या नाटकात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे.
निळकंठ आणि शशिकला सातारकर आणि त्यांची मुलगी चंद्रकला ही लोकनाट्य तमाशा फड चालवत असतात. अतिशय निर्मळ मनाने कलेची उपासना करत असतात. चंद्रकलेला वयानुरूप सिनेमातील प्रसिद्धीचे आकर्षण असते. गावातील गर्विष्ठ आमदार व त्याचा चेला पिंट्या हे शशिकला आणि निळकंठ यांवर रोष ठेवून असतात. त्यातच सिनेमात लावणी नृत्याचे शूट करून घेण्यासाठी लावणी कलावंतांच्या शोधात दिग्दर्शिका दुर्गा मुंबईहून यांच्या फडात येते. तिथे तिला समजते की निळकंठ हाच दामिनीबाईच्या रूपात फडात लावणी सादर करतो, शिवाय त्याने त्याच्या मरणासन्न आईला लक्ष्मीबाईंना लहानपणी वचन दिलेल असते की आपली कला केवळ रंगांच्यावर रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर करीन. त्याच्या आयुष्यावर एक भव्य चित्रपट बनवण्याचा विचार दुर्गाच्या मनात येतो, पण निळकंठ आईला दिलेल्या वचनात बांधील असल्याने तो प्रस्तावना नाकारतो. ही गोष्ट दुर्गा प्रतिष्ठेची बनवते आणि विक्रमरावसह कारस्थान करून फड बंद पाडते.
विक्रमराव शशिकलेवर हात टाकण्याचा प्रयत्न करतो, पण शशिकला तीव्र प्रतिकार करते. त्यामुळे अपमान झालेला विक्रमराव त्यांच्या फडाची बदनामी करतो, तोडफोड करून नुकसान करतो. सावकार पैसे देऊ नये म्हणून कारस्थान करतो. शशिकला याचा जाब विचारायला आमदाराच्या वाड्यावर गेली असताना आईसाहेबांकडून हे समजते की विक्रमराव व शशिकला यांचे वडील एकच आहेत, म्हणजेच विक्रमराव व शशिकला एकमेकांचे सावत्र भाऊ बहीण आहेत. इकडे कोणाकडूनही मदत न मिळाल्याने शेवटी नाईलाजास्तव निळकंठ सिनेमासाठी तयार होतो. तेव्हा दुर्गा त्याला सत्य सांगते आणि त्यामध्ये चंद्रकलेनेही तिला मदत केली, हे समजल्यावर त्या धक्क्याने लावणी सादर करत असतानाच निळकंठ हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मरण पावतो. मरताना आपला वारसा घुंगरू रूपाने चंद्राला देऊन जातो. चंद्राला तिची चूक समजते. पुढे ती आई वडिलांच्या पाऊलावर पाऊल टाकून प्रामाणिकपणा कला जोपासते आणि महाराष्ट्राचे जुगलबंदी ही सवाल-जवाबाची स्पर्धा जिंकते. विक्रमरावाला स्त्रियांच्या विनयभंग प्रकारात कोर्ट दोषी ठरवते आणि त्याची राजकीय कारकीर्द संपुष्टात येते. चंद्रकला आपल्या वडिलांचा वारसा पुढे चालवते.
नाटकाचे लेखन तुषार गुरूम तर दिग्दर्शन सोनाली कुलकर्णी – गायकवाड यांचे होते. प्रकाशयोजना ललित श्रीवास्तव व नेपथ्य तुषार गुरुम यांचे होते. वेशभूषा चिन्मय मालपुरे व रंगभूषा भारती झंवर यांचे होते. नाटकामध्ये दामिनीबाई व निळकंठ तुषार गुरुम, शशिकला वेदिका अंभोरे, चंद्रकला – जान्हवी जोशी, दुर्गा – सोनाली कुलकर्णी – गायकवाड, विक्रमराव – गौरव डव्हाण, पिंट्या – अथर्व संगमनेरकर, हार्मोनियमवाला – महेश माळी, ढोलकीवाला – वैभव मटाले, तुणतुणेवाला – आर्यन निकम, कृष्ण – हर्षिता, लक्ष्मीबाई – सुहानी शेटे, बालनिळकंठ – श्रेया वालझाडे, सावकार – गौरव, गण्या – ऋषिकेश, आईसाहेब – सई गावाने, जनी – सायली बोंडगे, दुर्गाची असिस्टंट – सिद्दी कुलकर्णी, अँकर – सायली बडगुजर, कस्तुरीबाई बनसोडे – कस्तुरी, कस्तुरी गटातील ढोलकीवाला – ललित, मालती मालपुरे -चिन्मयी मालपुरे त्यांनी भूमिका साकारल्या.
दिगंबर काकड
मो-९५९५९९६०३३
आजचे नाटक – सशक्त
संस्था -एम. जाधव फाउंडेशन,नाशिक
लेखक – दिलिप जगताप
दिग्दर्शक :-दिलिप काळे