महाराष्ट्रात पावसाचा कहर!पुण्याला रेड अलर्ट,नाशिकसह अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

गंगापूर धरणातून ५,१८६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग,गोदावरीला पूर

2

मुंबई, दि. ६ जुलै २०२५ – Maharashtra Weather Update महाराष्ट्रात पावसाची तीव्रता झपाट्याने वाढत असून, राज्याच्या विविध भागांत हवामान विभागाने रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी केले आहेत. विशेषतः पुणे जिल्हा रेड अलर्टवर असून, नाशिक, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पालघर, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार काही भागांत २०० मिमी पर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.

पुण्याला रेड अलर्ट – घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर रविवारी आणि सोमवारी अतिवृष्टीची शक्यता असल्यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला आहे. काही ठिकाणी २०० मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

नाशिकसह ९ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Maharashtra Weather Update)
आजपासून पुढील काही दिवस नाशिक जिल्ह्यातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असून, गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम आहे. याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांना देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग, गोदावरी दुथडी भरून वाहते
नाशिकमध्ये गेल्या २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात ५,१८६ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आला. या विसर्गामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून, पाणी दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पोहोचले आहे. एका तरुणाला पूरग्रस्त भागात अडकले असताना अर्धा तास सिमेंटच्या खांबाला धरून उभा राहावे लागले. वेळेवर धावलेल्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्याचा जीव वाचवला.

गोसेखुर्द धरणातही मोठा विसर्ग
विदर्भातील गोसेखुर्द धरणाचे १५ गेट अर्धा मीटरने उघडण्यात आले असून त्यातून ६२,१३९ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. काल २७ गेट उघडण्यात आले होते. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाल्याने आज सकाळपासून १२ गेट बंद करण्यात आले आहेत.

देशभरात पावसाची स्थिती
पश्चिम आणि मध्य भारतासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. जम्मू, काश्मीर, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, ओडिशा, आसाम, मेघालय, नागालँड, झारखंड, दक्षिण कर्नाटक याठिकाणीही अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. ताशी ४० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

राज्यातील मुसळधार पावसाचा संभाव्य परिणाम
राज्यातील पावसामुळे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. काही भागांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी, शालेय आणि कार्यालयीन वेळापत्रकांवर परिणाम झाला आहे. शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरू शकतो, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याचीही शक्यता आहे.

यलो अलर्ट असलेले जिल्हे:
मुंबई, नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

पुढील चार दिवस राज्यात पावसाचे वर्चस्व
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रात पाऊस सक्रिय राहणार आहे. विशेषतः धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. मराठवाड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] जबरदस्त जोर पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक भागांत गेल्या काही तासांपासून […]

  2. […] विश्रांती घेतली होती. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असलं तरी जोरदार सरींचा उरक कमी झाला […]

Don`t copy text!