मुंबई,दि २० फेब्रुवारी २०२५ – धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या नेत्याच्या मंत्रिपदावर गंडांतर ओढावले आहे नाशिकच्या सिन्नर विधानसभा मतदार संघाचे आमदार राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयाने मोठा दणका दिलाय. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना २ वर्षांचा कारावास आणि ५० हजारांच्या दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर केला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आता नाशिक जिल्हा न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९९५ ते १९९७ च्या दरम्यानचे हे प्रकरण आहे. माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात, त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की आमचं उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसरं घर नाहीये, अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिलेली होती. त्या सदनिका त्यांना शासनाच्या माध्यमातून मिळालेल्या होत्या. मात्र त्यावेळी तत्कालीन अधिकाऱ्यांनी या संदर्भातील तक्रार केलेली होती.
१९९५ साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आलेला होता. हे प्रकरण १९९७ पासून सुरु होतं आणि आज या प्रकरणाचा निकाल लागलेला आहे. यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलेले होते. त्यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूसह इतर दोघांचा समावेश होता. मात्र इतर दोन जणांबाबत कोर्टाने कुठल्याही स्वरूपाच्या शिक्षेची तरतूद केलेली नाही. मात्र माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांना दोन वर्षाची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
मंत्रीपद-आमदारकी जाणार ?
दरम्यान, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. लोकप्रतिनिधीला दोन किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचे सदस्यत्त्व रद्द होते. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपद आणि आमदारकी गमवावी लागू शकते आणि तसे झाल्यास माणिकराव कोकाटे यांच्या राजकीय कारकीर्दीला ब्रेक लागू शकतो. त्यामुळे आता माणिकराव कोकाटे वरिष्ठ न्यायालयात जाऊन या शिक्षेला स्थगिती मिळवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र, आता माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने अजित पवार गटाचा दुसरा मंत्री अडचणीत आला आहे. धनंजय मुंडे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसर्या नेत्याच्या मंत्रिपदावर गंडांतर ओढावले आहे. त्यामुळे आता याप्रकरणात माणिकराव कोकाटे, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस काय पावले उचलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.