मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; उद्यापासून कडक उपोषण सुरू करणार
पत्रकार परिषदेत राज ठाकरेवर थेट हल्ला;चंद्रकांत पाटलांवरही आरोप
मुंबई, दि. ३१ ऑगस्ट २०२५ – Manoj Jarange Patil मराठा आरक्षणासाठी सुरु असलेलं आंदोलन आज तिसऱ्या दिवशी प्रवेशलं आहे. मुंबईतील आझाद मैदानावर हजारोंच्या संख्येने मराठा समाजाचे आंदोलक जमले असून नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. दरम्यान, जरांगे यांनी सरकारला थेट इशारा देत उद्यापासून पाण्याचाही त्याग करून कडक उपोषण सुरू करणार असल्याचं जाहीर केलं आहे.
उद्यापासून उपोषण कडक करण्याची घोषणा(Manoj Jarange Patil)
आझाद मैदानावर जमलेल्या कार्यकर्त्यांसमोर बोलताना जरांगे म्हणाले,“काल आणि आज मी पाणी प्यायलो, पण उद्यापासून मी पाणीही घेणार नाही. सरकार कानावर घेत नाही, म्हणून आता उपोषण कडक करणार आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मुंबई सोडणार नाही. हा माझा शब्द आहे.”त्यांनी पुढे स्पष्ट केलं की, आंदोलन शांततेत राहील आणि तरुणांनी उचापती करू नयेत. “आपल्याला मान खाली घालावी लागू नये, हेच महत्त्वाचं आहे. अन्याय– अत्याचार झाला तरी संयम राखायचा आहे,” असे ते म्हणाले.
रेनकोट-छत्र्या प्रकरणावर ताशेरे
अलीकडे आंदोलनाच्या नावाखाली काही लोक मदतीच्या वस्तू वाटत असल्याचा मुद्दा जरांगेंनी उपस्थित केला. “कुणी रेनकोट-छत्र्या वाटत असतील तर एक रुपया देऊ नका. हे लोक माझ्या नावावर कमावत आहेत. समाजाच्या नावाने धंदा सुरू केला आहे. महाराष्ट्रातील मराठ्यांनी कुणालाही पैसे द्यायचे नाहीत,” अशी सूचना त्यांनी आंदोलकांना दिली.
सरकारवर सडकून टीका
जरांगे यांनी थेट सरकारवर निशाणा साधत बैठकींचा फोलपणा उघड केला. “काल मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली, मार्ग काढा असे आदेश दिले असं ऐकलं. मग ज्यांना आदेश दिले त्यांनी अजून काय काम केलं? फक्त बैठका घेत आहेत. या सगळ्या बैठका म्हणजे केवळ ढोंग आहे,” असे ते म्हणाले.
अलीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनावर प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देताना जरांगे म्हणाले “राज ठाकरे चांगले भाऊ आहेत, पण विनाकारण मराठ्यांच्या प्रश्नात पडतात. आम्ही ११-१३ आमदार निवडून दिले, ते पळून गेले. मग आम्ही विचारलं का? लोकसभेला तुझा गेम झाला, विधानसभेला तुझ्या मुलाला पाडलं, तरी आम्ही विचारलं का? पण राज ठाकरे हे मानाला भुकेले आहेत. फडणवीस त्यांच्या घरी चहा पिऊन गेला तरी हुरळून जातात.”
चंद्रकांत पाटलांवर आरोप
यावेळी जरांगेंनी भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली. “मराठ्यांच्या शिव्या खाऊ नका. मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून तुम्हीच व्हॅलिडिटी रोखली. आता वचवच करू नका. कोल्हापूरच्या राजघराण्यातले असूनही समाजाच्या प्रश्नावर प्रामाणिक भूमिका घेतली नाही,” अशी टीका त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या या इशाऱ्यामुळे राज्य सरकारसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आंदोलनाचा तिसरा दिवस संपताना जरांगे यांनी उपोषण आणखी तीव्र करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आगामी काही दिवसांत मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणत्या टप्प्यावर जातो, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.