अखेर मराठा आरक्षणाला निर्णायक वळण! सरकारने मान्य केल्या जरांगेंच्या प्रमुख मागण्या
जरांगेंची प्रतिक्रिया – “जिंकलो रे, राजाहो आपण”
मुंबई, दि. २ सप्टेंबर २०२५ –Maratha Reservation मराठा आरक्षण चळवळीला अखेर मोठा टप्पा गाठता आला आहे. गेले अनेक महिने सुरू असलेल्या आंदोलनाला निर्णायक कलाटणी मिळाली असून राज्य सरकारने मनोज जरांगे यांच्या आठपैकी सहा महत्वाच्या मागण्या मान्य केल्या आहेत. हैदराबाद गॅझेटीयर आणि सातारा गॅझेटीयरची अंमलबजावणी करण्यासह, आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणे, शहीद कुटुंबांना मदत, तसेच नोकरीसंबंधी निर्णय यावर शासनाने अधिकृत जीआर काढला आहे.
हैदराबाद गॅझेटीयरवर शिक्कामोर्तब (Maratha Reservation )
मराठा समाजाच्या मागण्यांमध्ये सर्वाधिक महत्त्वाची असलेली “हैदराबाद गॅझेटीयर” अंमलबजावणीला मंत्रिमंडळ उपसमितीने मान्यता दिली आहे. याअंतर्गत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तथापि, गॅझेटीयरमध्ये लोकसंख्येचे आकडे आहेत, पण तपशीलवार माहिती नाही. त्यामुळे थेट अंमलबजावणीऐवजी पूरक कागदपत्रांच्या आधारे तातडीने प्रक्रिया राबवण्याची तयारी करण्यात आली आहे.
सातारा संस्थान गॅझेटीयर – कायदेशीर तपासणी नंतर अंमलबजावणी
पश्चिम महाराष्ट्र व्यापणारा सातारा गॅझेटीयरही सरकारने मान्य केला आहे. मात्र काही कायदेशीर अडचणी असल्याने १५ दिवसांच्या आत तपासणी पूर्ण करून अंमलबजावणी सुरू केली जाईल, असे आश्वासन शिवेंद्रराजेंनी दिले.
आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे
आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत सर्व प्रकरणे कोर्टातून मागे घेण्याची कार्यवाही पूर्ण होईल, असा जीआरही शासनाने काढला आहे.
बलिदान कुटुंबांना मदत आणि नोकरी
आरक्षण लढ्यात बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना आतापर्यंत १५ कोटी रुपयांची मदत पोहोचवण्यात आली आहे. उर्वरित कुटुंबियांना एका आठवड्यात मदत वितरित केली जाईल. याशिवाय वारसांना शासकीय नोकरी देण्याचा निर्णय घेतला असून, राज्य परिवहन महामंडळ तसेच औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) संधी उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. शिक्षणानुसार नोकरी देण्याची जरांगेंची मागणी सरकार विचारात घेणार आहे.
५८ लाख नोंदींची पडताळणी ग्रामपातळीवर
राज्यभरातून मराठा समाजाच्या ५८ लाख नोंदी सापडल्या आहेत. या नोंदी ग्रामपंचायत स्तरावर लावल्या जातील. पडताळणीसाठी तालुका व ग्रामपातळीवर नवीन स्क्रुटिनी समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जात पडताळणी समित्यांना मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रक्रिया गतीमान होणार आहे.
जरांगेंची प्रतिक्रिया – “जिंकलो रे, राजाहो आपण”
उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारचा मसुदा जरांगे पाटलांना दाखवला. त्यानंतर भावनिक होत जरांगे यांनी “जिंकलो रे, राजाहो आपण” असा नारा दिला. मात्र आंदोलन थांबवण्यापूर्वी जीआर अधिकृतरीत्या प्रसिद्ध व्हावा, अशी अट त्यांनी घातली. “आम्ही संयमाने घेतलं, पण आता समाजाचा अपमान होऊ देणार नाही. जीआर द्या आणि आम्ही मुंबई रिकामी करू,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.आझाद मैदानात ही घोषणा होताच हजारो मराठा बांधवांनी जल्लोष केला. “पाटील पाटील”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
[…] अखेर मराठा आरक्षणाला निर्णायक वळण! सर… […]