लग्नसंस्था मोडीत काढणाऱ्या पिढीला योग्य दिशा देण्याचा यशस्वी प्रयत्न.:नियम आणि अटी लागू

एनसी देशपांडे

0

प्रस्तावना
मानवी जीवनात आपल्या कुटुंबातली नाती-गोती आणि त्यानुसार आपली सामाजिक जडण-घडण या बाबतीत ‘प्रसार माध्यमांनी’ समाजाचं अमाप प्रबोधन केलं आहे. कारण आजवरच्या ‘कौटुंबिक, आर्थिक, सामजिक आणि राजकीय’, ‘सुधार, बदलाव किंवा विकास’ घडवण्यात प्रसार माध्यमांनी अत्यंत महत्वाची भूमिका कळत-नकळतपणे निभावली आहे, यात दुमत नसावे. अर्थात हे चांगलं की वाईट हे ठरवणं, हा ज्याचा त्याचा प्रश्न!  वर्तमानपत्रांनी घडलेल्या आणि संभाव्य घटनांवर आधारित केवळ सामाजिक विचारधारांचा प्रसार केला ते चांगलेच आहे. परंतु मराठी नाटकांनी त्याही पुढे जाऊन घराघरातून उद्भवणाऱ्या, घडणाऱ्या बारीक-सारीक प्रसंगांचे कळत-नकळतपणे समाजावर उमटणारे पडसाद रंगमंचावर सादर केले आहेत. ज्यामुळे समाजाला त्या संभाव्य परिणामाची गहनता, दाहकता आणि व्यापकता’ याची देही याची डोळा अनुभवता आली आणि वेळीच त्यावर उपाययोजनाही करता आली. आजवरच्या अनेक कौटुंबिक नाट्य-संहितांमधून पती-पत्नी, भाऊ-बहिण, आई-वडील, आजोबा-नातू, भाऊ-भाऊ, अशा अनेक नातेसंबंधांमधील ‘भावभावनांना’ मोकळं केलं आहे. त्यातही ‘नवरा-बायको’ त्यांच्या संबंधातली नाजूकता, समाज-गैरसमज, उहापोह, राग-लोभ आणि समजुतदारपणा या समस्त छटा नाटककारांनी अतिशय संयतपणे मांडल्या, दिग्दर्शकाने त्याला रंगमंचीय रूप दिलं आणि कलाकारांनी सक्षमपणे या संबंधांना पुन्हा-पुन्हा जुळवून आणण्याचा सहज सोपा आणि सुलभ मार्ग रसिकांना दर्शवला आहे. मराठी नाटकांच्या या महनीय कार्याची थोडीफार जरी जाणीव समाजाने राखली, तरच या कार्याला एक सन्मान प्राप्त होऊ शकेल, असं मनापासून वाटतं.

एखादी व्यक्ती आपल्याला जशी भासते, जाणवते तशीच ती असते, असं कदापीही गृहीत धरू नये. वेगवेगळी परिस्थिती, नाती-गोती आणि भवतालचा समाज यानुसार प्रत्येक व्यक्ती घडत असते. अशा दोन व्यक्ती जेव्हा नवरा-बायको या बंधनात बांधले जातात, तेव्हा सोबतच्या व्यक्तीला समजून घेणं आणि त्यानुसार व्यवहार करणं, हेच व्यवहार्य ठरतं. अन्यथा या पवित्र बंधनाला गालबोट लागायला कितीसा वेळ लागतो. आणि अशी अनेक उदाहरणे आपल्या अवती-भवती आपल्याला आढळतात. या विषयाला विशिष्ठ नियमावलीत बांधून ठेवणं कधीच शक्य होणार नाही. कारण हा विषयच मुळी चिरंतन आहे. आणि प्रत्येक संबंधाला वेगवेगळं औषध लागू पडतं.

प्रशांत दामले फॅन फाउंडेशन निर्मित, संकर्षण कऱ्हाडे लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘ नियम व अटी लागू’ हे नाटक वरील विषयावरचं नाटक असून हास्यस्फोटक प्रसंगातून ‘नवरा-बायको’ या संबंधावर समाज प्रबोधन करतं.

कथासार
अमृता(अमृता देशमुख) आणि अनिकेत(संकर्षण कऱ्हाडे) या  ‘नवरा-बायको’ च्या संबंधावर आधारित हे कथानक आहे. अनिकेत – साफ्टवेअर इंजिनियर – एका मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर नोकरी करत असतो. साफ्टवेअर डेव्हलपिंग कंपनी, मोठी पोस्ट, मोठी जबाबदारी, यामुळे अनिकेतचा दिवस कंपनीतच मावळत असे. एकीकडे अनिकेतचं कंपनीच्या कामात सतत व्यस्त असणं आणि दुसरीकडे अमृता गर्भपात झाल्याने घरी एकटीच असते. तिच्यामागे ना बाळाचा ना नोकरीचा असा कोणत्याही प्रकारचा व्याप नसल्याने तिचं आयुष्य केवळ अन केवळ अनिकेत, म्हणजेच नवऱ्याभोवतीच फिरत असतं.अनिकेत – कंपनीच्या कामात पूर्णपणे बुडालेला आणि अमृता – अनिकेतचं आपल्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे, या एकमेव विचारात पूर्णपणे डूबलेली. आता या दोन टोकाच्या परिस्थितीत ‘कुरबुरी, कटकटी आणि रुसेवे-फुगवे’ अटळच असतात. ‘घरोघरी मातीच्या चुली’ या उक्तीनुसार हे दररोज सुरूच असतं.

परंतु एके दिवशी या त्रिगुणात्मक परिस्थितीचा उद्रेक होतो आणि मग T20 सामना सुरु होतो. अनिकेत – हेच माझं वय आहे, करियर बनवायचं आणि आत्ताच आयुष्य घडवण्याच्या प्रक्रियेसाठी मी माझा ‘वेळ, ज्ञान आणि कष्ट’ असं सर्वस्व दिलं तरच पुढे काहीतरी चांगलं आयुष्य जगता येईल, आणि ही माझी अवस्था अमृताने समजून घ्यावी. अमृता – ते मी समजते पण किमान घरी आल्यावर तरी मला वेळ देत नाही आणि माझी साधी चौकशीही अनिकेत करत नाही याचा अर्थ काय?

परिणामस्वरूप, अनिकेत – आपण वेगळं होऊ या! असं त्राग्याने म्हणतो. पण अमृताला त्याचा हा अप्रोच अतिरेकीपणाचा वाटतो. अशा या युद्धजन्य परिस्थितीत अमृताची बहिण या दोघांना ‘मानसोपचार तज्ञ’ अतिरेककर यांचा अनुभवी सल्ला घेण्याचा विचार मांडते. तिच्या विचारांवर विचार करून ही दोघं अतिरेककर यांच्याकडे जातात.

मानसोपचारतज्ञ डॉ.अतिरेककर हे एक अजबच व्यक्तीमत्व असतं. त्यांचं ‘दिसणं, पेहराव, देहबोली, निदान आणि उपचारपद्धती’ सगळंच विचित्र असतं. ही दोघं निमुटपणे अतिरेककरांच्या चित्रविचित्र अटी शिरसावंद्य मानतात आणि या दोघांचा त्यांच्याच घरात, पती-पत्नी असूनही, ‘घराबाहेच जास्त वेळ काढायचा, स्वतंत्र संसार आणि अनोळखी व्यवहार’ असा मूक-सामना सुरु होतो.

सुरुवातीला शक्य वाटणाऱ्या गोष्टी नंतर नंतर अशक्य वाटायला लागतात. आपल्याच आणि एकाच घरात अनोळखी असल्यासारखं वावरायचं म्हणजे कठीणच की हो! अतीव प्रयत्न केल्यानंतरही त्यांच्यातल्या सोकॉल्ड ‘तक्रारी, कुरबुरी आणि अपेक्षा’ क्षीण होतच नाहीत. मग पुनश्च ‘अतिरेककर’ यांच्याशी भेट, सल्ला. आता आधीच्या अगदी उलट व्यवहार करायचा असतो. एकमेकांशी बोलायचं, एकत्र रहायचं असं काहीसं असतं ते. परंतु ही नियमावलीही या दोघांना अवघड वाटायला लागते. कारण अर्थातच आधीच्या व्यवहाराची एवढी सवय झालेली असते की चांगलं वागणंच जमत नाही. ‘धड हे नाही की ते नाही’ या दरम्यान ‘अतिरेककर’ यांच्या घरी येऊन ‘सलोखा आणि समन्वय’ याच्या मात्रा देतच असतात.परंतु कुठलंच औषध लागू पडत नाही.

अशा या भीषण परिस्थितीत एक वेगळंच आयुध यांच्या युद्धात प्रवेशतं. नागपूरस्थित अमृताच्या वडिलांना अचानक दवाखान्यात दाखल करतात आणि अमृता नागपूरला तातडीने निघते. परंतु महत्वाच्या कामांमुळे अनिकेत मात्र तिच्यासोबत जाऊ शकत नाही आणि युद्धाचा भडकाच उडतो. अमृताच्या बिथरून घराचा त्याग करते आणि कायमची अनिकेतला सोडून जाते ……… यानंतर पुढे काय घडतं ते प्रत्यक्ष रंगमंचावर अनुभव घेण्यातच खरा मजा आहे.

लेखन आणि दिग्दर्शन
‘संकर्षण कऱ्हाडे’ याने आपली‘अष्टपैलू’ अशी प्रतिमा निर्माण केली आहे. ‘लेखक निवेदक. कवी, कलाकार आणि आता नाटककार’ असा प्रवास करत त्याने या नाटकाचं लेखन केलं आहे.  पती-पत्नी संबंधातील ‘तक्रारी, कुरबुरी, समाज-गैरसमज, बेबनाव असामंजस्य’ या बाबींचा ‘अतिरेक आणि विस्फोट’ कोणत्या स्तरांपर्यंत पोहोचू शकतो, याचं सादरीकरण करतांना ‘मनोरंजन आणि प्रबोधन’ याचा सुंदर समन्वय आपल्या लेखनातून मांडला आहे. या नाटकाचं दिग्दर्शन ‘चंद्रकांत कुलकर्णी’ याच्याकडे सोपवल्याने या कथानकाच्या साद्रीक्र्नाला एक वेगळाच आयाम प्राप्त होतो. गंभीर विषय, त्याचा अतिरेक, विस्फोटक परिस्थिती आणि तरीही हास्यस्फोटक हाताळणी म्हणजे एक रिस्कच असते. परंतु जादुगार ‘चंकू’ला हे सहजी शक्य झालं आहे. यातील प्रसंग टोकाच्या भूमिकेचे आहेत. तरीही त्यांची हाताळणी ‘हसत-खेळत’ केली आहे. शिवाय मानसोपचारतज्ज्ञ ‘अतिरेककर’ या विक्षिप्त आणि अर्कचित्रात्मक व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून विनोदाला एका विशिष्ठ पातळीवर राखण्यात यश लाभलं आहे.

अभिनयानुभव
अनिकेत – हे पात्र साकारतांना ‘संकर्षण कऱ्हाडे’ याने आपल्या एकुणात प्रतिमेचा भरभक्कम आधार घेतला आहे. अनिकेत हे पात्र या नाटकाचा पाया आहे. या भूमिकेला स्वभावाचे अनेक कंगोरे आहेत. यातल्या एकूणएक बारकाव्यानिशी, एका टोकाच्या भूमिकेकडे प्रवास करणाऱ्या अनिकेतचं ‘बोलणं आणि वागणं’ संकर्षणला चांगलं साधलं आहे. त्याचा ‘चेहरा, देहबोली आणि एक्सप्रेशन्स’ विनोदी भूमिकेसाठी चपखल आहेत, हे त्यालाही चांगलं ज्ञात आहे. त्याचाच आधार घेत ‘चंकू’ने ही भूमिका रंगवली आहे, असं म्हणायला भरपूर वाव आहे.

अमृता –अगदी सामान्य गृहिणी प्रमाणेच आहे. कामाच्या रगाड्यात पूर्णपणे बुडालेल्या अनिकेतकडून ‘आपल्यासाठी काही वेळ, प्रेमाचे क्षण आणि हवं नको’ या बेसिक मागणीची अपेक्षा ठेवणारी ही अमृता. अमृता देशमुख हिने या पात्राची या पात्राची मागणी जाणून घेऊन ‘एक साधी आणि सिम्पल गृहिणी’ अपेक्षांचा चुराडा झाल्याने वैतागलेली आणि सततच्या ओरडण्यानेही अनिकेतच्या वर्तनात फरक न पडलेला बघून दुखावलेली स्त्री, तिने उत्तमपणे सादर केली आहे.

अतिरेककर – आपल्या नावाला समर्पक असे अतिरेकी विचार आणि सल्ले देणारं हे व्यक्तिमत्व गंभीर विषयाला हसत खेळत ठेवण्यात महत्वाची भूमिका पार पाडतं. यांच्या एकुणात ‘नियम व अटी’ कल्पनेबाहेरच्या, जगावेगळ्या आणि जाचक आहेत. हे पात्र म्हणजे फँटसीचा उत्कृष्ट नमुना आहे. प्रसाद बर्वे या कलाकाराने हा जर्म चांगलाच ओळखल्याने हे विचित्र पात्र कथानकाचा महत्वाचा भाग बनून जातं आणि सादरीकरणात जान आणण्यात उपयुक्त ठरतं. अर्थात या पात्राच्या गरजेनुसार प्रसाद बर्वेचं एकुणात व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाचं ठरतं.

सारांश 
‘पती-पत्नी’ यांच्या परस्पर नातेसंबंधातील घटनांचा दाखला मनोरंजनात्मक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडत समजाला शिक्षण देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. प्रेक्षक अनुभवत असलेल्या ‘सादरीकरणाचा’ परस्पर भिन्न दृष्टीकोन या दोघांच्या भूमिकांमधून अभिनयातून बघायला मिळतो. अर्कचित्रात्मक व्यक्तिमत्व ‘अतिरेककर’ नवरा-बायको संबंधातील विचित्र गुंत्यांना हलकेच सोडवू शकतं, कारण हा तिसरा ‘आउट ऑफ बॉक्स’ विचार समाज कधीही करत नाही. थोडक्यात काय? तर एका गंभीर विषयाचा गुंता सोडवण्याच्या शिकवणीला प्रसन्नतेची झालर लावलेलं हे नाट्य, बघण्यायोग्यच आहे.
एनसी देशपांडे
9403499654

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.