एक ह्रदयस्पर्शी नाटक :हरवलेल्या पत्त्यांचा बंगला

एनसी देशपांडे

0

प्रस्तावना
मराठी रंगभूमीने मराठी समाज घडवण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे. समाजातील अनेक ‘व्यक्त-अव्यक्त’ विषयांवर रंगावृत्तीच्या माध्यमाने समाज प्रबोधनाचं कार्य अतिशय उत्तम आणि यशस्वीपणे पार पाडलं आहे. मराठी माणूसही कौटुंबिक विषयावरील नाटकांना उचित सन्मान देऊन गर्दी करत असतो. किंबहुना मराठी माणसाचं समाजभान प्रगल्भ करण्यात रंगभूमीचा फार मोठा वाटा राहिला आहे. पती-पत्नी, आई-वडील, आजोबा-नातू, बाप-लेक अशा विषयांना समर्थपणे हाताळत या नात्यांमधील गुंता सोडवण्याचा साधा-सोपा मार्ग दाखवला आहे.

प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ‘आई’ ला विशेष स्थान आहे. आपल्या सर्व इच्छा, आकांशा, मनोकामना,  यश-अपयश, सुख-दुख:  व्यक्त करण्याचं आणि हक्काचं ठिकाण म्हणजे ‘आई’. आपल्या आयुष्यातील भरभक्कम आधार म्हणजे ‘आई’. परंतु आपली सर्व कर्तव्ये पार पडतांना तिला काय सोसाव लागत असेल, याचा साधा विचारही कोणी करत नाही, हेच सत्य! तिच्या या ‘कर्तव्य-कार्यात’ तिला स्वत:च्या अनेक इच्छा-आकांशांना मुरड घालावी लागते. मुलांच्या प्रेमापोटी हसत-हसत ती सगळ्या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असते. म्हणूनच कदाचित आईला काय सहज शक्य आहे, तिला कसलाही त्रास होत नाही असा गोड गैरसमज करून घेऊन तिला कायमच गृहीत धरलं जातं, ही बाब कोणालाही कधीही जाणवत नाही.

आईने मोजलेच नाही…
आयुष्याच्या तव्यावरती संसाराची पोळी भाजता भाजता हाताला किती बसले चटके,
नवर्‍यासह लेकराबाळांचे करता करता मोठ्यांचा मान राखता राखता कितीदा वाकले गेले
बाळाला किती झोके दिले, बाळासाठी किती रात्री जागले, आईने मोजलेच नाही…
जरा चुकले की घरच्यांची,बाहेरच्यांची किती बोलणी खाल्ली, काळजाला किती घरं पडली,
याच्यासाठी त्याच्यासाठी आणखीही कुणासाठी जगता जगता, स्वतःसाठी अशी किती जगले,
आईने मोजलेच नाही…

मराठी रंगभूमीवर ‘आई’ या विषयावर उत्तम नाटकांचे सादरीकरण झाले. किंबहुना कलेच्या प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांनी ‘आईची विविधांगीरूपे, तिची मानसिकता, नातेसंबंध, समाजातील वावर अशा अनेक दृष्टीकोनातून आपापल्या परीने तिची महती समाजासमोर मांडली आहेत.

‘हरवलेल्या पत्त्यांचा बंगला’ या नाटकाच्या निर्मितीची कहाणी नुसतीच मजेदार नसून त्यामागे एक समाजिक विचार आहे,ही बाब अत्यंत महत्वाची! ‘आई’ या विषयावरील लेखनस्पर्धेतील निवडक लिखाणावर आधारित हे नाटक म्हणूनच थेट हृदयाला भीडतं.

Marathi Drama/Entertainment News/A Heartwarming Drama: The Haravlelya Pattyancha Bangla

कथासंहिता
मुंबईतील चाळसंस्कृती मराठी माणसाला अत्यंत प्रिय आहे. वर्षानुवर्षे एकमेकांच्या सुख-दुखा:त कुटुंबातील सदस्याप्रमाणे वावरणारी ही मंडळी एकमेकांच्यात गुंतलेली असल्याने एकमेकांना भरभक्कम आधार असतात. या चाळींच्या ठिकाणी मोठ-मोठाल्या इमारती झाल्या आणि चाळीतील कुटुंबे ‘टू रूम किचन’ मध्ये जरी शिफ्ट झाली तरीहीआपली संस्कृती आजही विसरलेली नाहीत. यातील एक म्हणजे इंदिराबाई,  मुलगा अमेरिकेत स्थलांतरित झालेला तर मुलगी ‘इरा’ लग्न करून बदलापूर मध्ये स्थायिक. त्यामुळे अर्थातच इंदिराबाईंनी कॉलेजमध्ये शिकणारी ‘निधी’ला पेइंगगेस्ट म्हणून सोबतीला ठेवले असते. या दोघींची एकुणात केमेस्ट्री चांगलीच जुळलेली असते.

१. अशातच इराचा मुलगा ईशानला मुंबईतील कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळते आणि इरा त्याला आजीकडे ठेवण्याचा निर्णय घेऊनच दाखल होते. निधीच्या अस्तित्वामुळे ईशानच्या मुक्त वावराला अडचण आणि आईचे आणि निधीचे मनमोकळे संबंध  खटकल्याने निधीला घालवून देण्याचा निर्णयही तीच घेते. आईच्या मनाचा, गैरसोयीचा अजिबात विचार न करता हटवादी इरा मुलाला स्वतंत्र खोली मिळावी म्हणून निधीला घराबाहेर घालवतेच.

२. कालांतराने आपली बदली मुंबईत आईच्या घराजवळ करवून घेऊन इराही नवरा नितीनसोबत आईच्या घरात रहायला येते. आपल्या तिघांच्या घरात राहण्याने आईला काय त्रास होईल याचा साधा विचारही इरा करत नाही. त्यातच इरा आपल्या मैत्रिणींना पार्टी देण्याच्या निमित्ताने आईलाच सगळा सरंजाम करायची गळ घालते. जावई नितीन मात्र त्याच्या परीने इंदिराबाईंना मदत करत असतो.

३. कोणतीही जबाबदारी स्वीकारण्याची मानसिकता नसलेली आणि सदैव स्वच्छंदी आयुष्य जगण्याची सवय असलेली इरा आपल्या आईला कायम गृहीतच धरून वागत असते. दरम्यान इराच्या सासूबाई बाथरूममध्ये पडण्याचं निमित्त होतं आणि त्यांचं ऑपरेशन आणि इतर त्रासाला कंटाळून इरा आईलाच बदलापूरला जाऊन राहण्याचा सल्ला देते.

हटवादी आणि मनमानी करणारी इराची वागणूक इंदिराबाईंना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्रासदायक ठरतच असते. परंतु मुलीच्या प्रेमापोटी त्या सगळं काही निमुटपणे सहन करत असतात. मुलगा अमेरिकेतून फोनद्वारे ख्याली-खुशाली जाणून घेऊन अमेरिकेत येण्याची वारंवार विनंती करत असतो. परंतु नातेसंबंध आणि मित्रमंडळी यांच्यात पूर्णपणे गुंतलेल्या इंदिराबाई तिथल्या भयाण एकांताला घाबरून कायम नकार देत असतात. स्वतंत्र राहणी, आजूबाजूला ओळखीची मंडळी, सोबतीला निधी अशा स्वत:च्या विश्वात रममाण असलेल्या इंदिराबाईचं आयुष्य इरामुळे विस्कळीत झालं होतं. पोटची पोर, तिच्या अवगुणांची पूर्ण ओळख असूनही तिच्या मनमानी स्वभावाचा स्वीकार म्हणजे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ त्यांनी स्वीकारलेला होता.

संपूर्ण आयुष्य आपल्या कुटुंबाला वाहिलेल्या इंदिराबाईंना जेव्हा स्वत:चं घर सोडून बदलापूरला जाण्याचा सोयीस्कर सल्ला इरा देते. तेव्हा निधी त्यांना परिस्थितीची जाणीव करून देते. त्या सगळ्या गोष्टी त्यांनाही कळतच असतात नाही असं नाही परंतु लहानपणापासून त्यागाचे संस्कार झाले असल्याने सहनशक्ती नसानसात भरलेली असते. एकीकडे फक्त आणि फक्त स्वत:चाच विचार करणारी, आईला गृहीत धरून तिच्यावर आपला बोजा टाकणारी ‘इरा’ आणि दुसरीकडे स्वतंत्र विचारांची, आईवर नितांत प्रेम करणारी, वडिलांच्या व्यभिचारामुळे त्यांचा तिरस्कार करणारी ‘निधी’ यांच्या आजवरच्या वर्तणुकीचा विचार करता इंदिराबाईंना त्यागाची भूमिका सोडावी लागते. ‘त्यागालाच सर्वस्व मानणाऱ्या काळात आमचा जन्म झालाय’ अशा विचारांच्या इंदिराबाईनी खरंतर स्वत:च्या आयुष्यात अचानक झालेला बदल त्यांनी स्वत:च निवडलेला असतो. परंतु आता डोक्यावरून पाणी जायला लागल्याने त्यांना एकुणात परिस्थितीचा जाच झालेला असतो. निधीचा सल्ला  त्यांना एकुणात परिस्थितीवर विचार करायला भाग पाडतो. कायम आपलं कुटुंब, आपला संसार, आपली मुलं यांच्याचसाठी जगणाऱ्या इंदीराबाईना जेव्हा स्वत:चच घर सोडून बदलापूरला रहायला जाण्याचा सल्ला ‘इरा’ देते, तेव्हा मात्र इंदिराबाई तिला ठणकावून सांगतात ‘आईने मुलांवर संस्कार करायचे असतात; त्यांचे संसार करायचे नसतात’.

सारांश
हे नाटक बघतांना प्रेक्षकांना आपल्या घरातील व्यक्तीरेखा रंगमंचावर दिसत असतात, त्यामुळे संपूर्ण प्रेक्षगृहाचा ताबा कलाकारांनी कधीच घेतलेला असतो. प्रेक्षकांची मानसिकता आपल्या कथानकाला पूरक झाली असल्याने रंगभूमीवरचा प्रत्येक कलाकार आणि त्याच्या तोंडी असलेली वाक्ये प्रेक्षकांच्या हृदयात जागा आपसूक मिळवतात. नाटकाला उंची देण्याकरिता पल्लेदार वाक्यांची अजिबात गरज नसल्याने अगदी साध्या-सोप्या-सरळ शब्दात हे कथानक, यातील पात्रे प्रेक्षकांना आपलीशी वाटतात. कथानकातील गहिरे प्रसंगही लेखक आणि दिग्दर्शकाने ताणलेले नाहीत. हे प्रसंग अगदी सहज चर्चेत येतात, त्यावर तोडगा निघतो आणि प्रसंग बदलतो. एका विशिष्ठ पातळीवर आणि ठराविक वेगात हे कथानक प्रेक्षकांसमोर घडतं. त्यामुळे अगदी नकळतपणे प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात, वाहवा अनेकदा ओठातच राहून जाते आणि टाळ्याही क्वचितच ठिकाणी पडतात. यासाठी दिग्दर्शकाने विशेष योजना आखली असावी, असे स्पष्टपणे जाणवते. आपल्या कुटुंबासाठी झटणाऱ्या अनेक इंदिराबाई आज समाजात आहेत. माझ्या मुलांची जबाबदारी म्हणजे माझीच जबाबदारी,  मुलांच्या संसारातच आपलं सुख, असं मानून जगणं, सरत्या वयातही आपलं स्वत:चं आयुष्य, आवड-निवड, प्रकृती, इच्छा, आकांशा त्यागून मुलांच्या संसारातील जबाबदाऱ्या स्वत:च्या समजून जगणं, कितपत योग्य? इंदिराबाई हे पात्र साकारतांना तब्बल दहा वर्षांनंतर ‘वंदना गुप्ते’ रंगमंचावर दाखल झाल्या आणि एक अप्रतिम भूमिका निभावली आहे. हे पात्र अनुभवतांना अनेकदा हसू फुटतं, कौतुक वाटतं आणि वाईटही वाटतं, कधीकधी तर कीवही करावीशी वाटते. आपल्या रोजच्या शब्दात आणि वाक्यात हे कथानक रंगमंचावर सादर होतं. लेखकाला एक ‘महत्वपूर्ण विषय’ समाजासमोर मांडायचा असल्याने टाळ्या मिळवणाऱ्या वाक्यांना कथानकात थारा नाही, किंबहुना तशी गरजच ‘स्वरा मोकाशी’ हिला वाटलेली नाही. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी याने लेखकाच्या मूळ हेतूचा सन्मान करत प्रसंग अगदी साधे आणि सरळ रचले आहेत. एकही पात्र भडक वाटत नाही. प्रतीक्षा लोणकर इराच्या भूमिकेत चपखल, दीप्ती लेले निधी या पात्राला दिग्दर्शकबरहुकुम एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते. रंगभूषा, वेशभूषा, संगीत, प्रकाश या तांत्रिक बाबी चोख भूमिका बजावतात. श्रीपाद पद्माकर आणि दिलीप जाधव या निर्मात्यांनी एक महत्वाच्या विषयाला समाजासमोर मांडलं आहे. या संपूर्ण टीमला सलाम!
एनसी देशपांडे
9403499654

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.