कौटुंबिक मेलोड्रामाचं सुंदर सादरीकरण.. ‘सुमी आणि आम्ही’

एनसी देशपांडे

0

मराठी नाट्य-रसिक ‘कौटुंबिक नातीगोती, जिव्हाळा आणि भावनिक गुंतागुंत’ अशा विषयावरील नाटकांमध्ये जास्त रमतो. किंबहुना अशा विषयावरील नाटकांमुळेच मराठी रंगभूमी बहरत गेली. आजवरच्या दूरदर्शन मालिकांमध्येही हाच विषय सेलेबल राहिला आहे.

आनंद धडफळे यांनी वयाच्या चाळीशीत लग्न केलं असतं आणि आपल्या हयात नसलेल्या बहिणीची मुलगी दत्तक घेतलेली असते. आनंद आणि मेधा या वयस्कर दांपत्याच्या आयुष्यातील वादळी संघर्षाची कहाणी या नाटकाच्या माध्यमाने प्रेक्षकांना अनुभवायला मिळते. सुमीला घडवण्यातच या दोघांचं आयुष्य गुंतलय. सुमी कॉम्प्युटर इंजिनियर होऊन एका कॉर्पोरेट कंपनीत नोकरीच्या निमित्ताने बंगलोरला जाते. तोवर आनंदराव निवृत्त होऊन घराचा गाडा कसाबसा ओढत असतात. महत्वाकांक्षी सुमीला अमेरिकेत जाऊन ‘एम.एस.’ व्हायचं असतं. त्यासाठी अंदाजे चाळीस लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याने ती आनंदरावांकडे पैशाची मागणी करते. परंतु आनंदराव निवृत्तीनंतर कफल्लक झालेले असतात. नाही म्हणायला त्यांनी सुमीसाठी पाच लाख रुपये वेगळेच ठेवलेले असतात. आनंदराव सत्यपरिस्थिती सुमीला समजावून सांगतात, परंतु सुमीचा निश्चय दृढ असतो. त्यामुळे अमेरिकेला जाणायच हट्टच करून बसते. मग आनंदरावांची पत्नी मेधा पोरीच्या प्रेमाखातर वडिलोपार्जित जमीन विकून पैसे उभे करण्याचा प्रस्ताव आनदरावांपुढे मांडते. हा व्यवहार आनंदरावांना अजिबात मान्य नसतो, परंतु नाईलाजाने ते मान्यता देतात.

तशातच सुमीच्या कंपनीतील एक सहकारी ‘विल्सन’ अमेरिकेतल्या विद्यापीठात नोकरीच्या (फॅकल्टी) निमित्ताने जातो आणि सुमी त्याच्याबरोबरच राहणार या गोष्टीला आनंद-मेधाचा विरोध असतो पण सुमीच्या हट्टापुढे ते पुन्हा: नतमस्तक होतात. त्यातच सुमीचं पत्र थडकतं ‘विल्सनसोबत ‘लिव्ह ईन रिलेशनशिप’ राहण्याचा तिचा निर्णय कलतो आणि या दोघांचे होशच उडतात. आपले संस्कार कसे आणि कुठे कमी पडले, या विचारांनी दोघंही दु:खी होतात. त्यातच ‘वृद्धत्व, प्रकृतीच्या तक्रारी आणि आर्थिक कुचंबणा’ यामुळे दोघंही पिचले जातात. त्यांना थोडासा दिलासा, उमेद आणि भरवसा’ लाभतो तो सभोवतालच्या माणसांकडून. या माध्यमातून नाटककाराने कौटुंबिक आणि सामाजिक संबंधाची ताकद आणि गरज यावर प्रेक्षकांना विचार करायला लावला आहे.

नाटककार राजन मोहाडीकर यांनी आजच्या काळात कौटुंबिक आणि सामाजिक आपुलकी या विषयाभोवती फिरणारं कथानक मध्यवर्ती घेऊन नाटक उत्तमपणे रंगवलंय. आनंदराव(मोहन जोशी), मेधा(सविता मालपेकर), अण्णा(चंद्रशेखर भागवत), डॉ.पानसे(उदय लागू), गोवंडे(राजेश चिटणीस), बापट गुरुजी(प्रदीप जोशी) आणि सुमी(श्रद्धा पोखरणकर) या सर्व कलाकारांनी दिग्दर्शन, संगीत, नेपथ्य आणि वेशभूषा या चारही जबाबदाऱ्या समर्थपणे पेलणारे पुरुषोत्तम बेर्डे बरहुकूम आपापल्या व्यक्तिरेखा नेमकेपणाने सादर केल्या आहेत. रंगमंचावरील प्रत्येक प्रसंग प्रेक्षकांवर आपली पकड मजबूत करत जात असल्याने प्रेक्षकांची कथानकातील आणि पात्रामधील गुंतवणूक, हेच या कलाकृतीचे यश आहे.

लेखकाला अपेक्षित पात्रांमधील परस्परसंबंध दिग्दर्शकाने नेमके रंगवल्याने प्रेक्षक आपसूकच त्यांच्यात गुंतत जातात. तद्वतच या कथानकातील नाट्य आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग अगदी कोणाच्याही आयुष्यात घडू शकणारे असल्याने प्रेक्षक ‘सहानुभूती, गुंतवणूक, प्रतिसाद,  प्रोत्साहन आणि समाधान’ अशा मिश्र विचारांसह रंगमंचाचा एक भाग होऊन जातात.  कथानकातली परिस्थिती रंगवतांना दिग्दर्शकाने प्रसंग इतके प्रभावी बसवले आहेत की, पात्रांची अगतिकता प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू तरळतात. आपण ज्या इंटेन्सीटीने आपल्या मुलांना प्रेम देतो, त्यांच्या यशाचं कौतुक करतो, त्यांच्या इच्छा आकांशांना प्रतिसाद देतो, अगदी नकळतपणे त्याच  इंटेन्सीटीची त्यांच्याकडून अपेक्षा करणं, मूर्खपणाचं ठरतं.

दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी या कथानकातील ‘आशय, पात्रे, परस्पर संबंध, कौटुंबिक ओलावा, तरलता आणि नाट्य’ अबाधित ठेऊन हे नाटक बांधलंय. त्यासाठीची पात्रांची निवड सुयोग्य केली आहे. त्याचमुळे या कलाकृतीचा आनंद प्रेक्षकांना घेता येतो. कारण सगळी पात्रे वास्तवदर्शी उभी करण्यात दिग्दर्शकीय कौशल्य प्रकर्षाने जाणवतं. साधारणत: सत्तरच्या दशकातली शोभेल अशी या नाटकाची रचना आहे. यातील काही पात्रे आजच्या युगात अनफिट वाटतील, परंतु त्यांचा सहभाग संहितेनुसार योग्य असून कलाकारांनी त्यांची भूमिका उत्तमपणे मांडली आहे. दिग्दर्शकाने या दशकाचा फील देत नाटकाचा आशय प्रेक्षकांपर्यंत यशस्वीपणे पोहोचवला आहे. अगदी लहान-सहान प्रसंगांतून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना कथानकाशी जखडून ठेवलंय. काही प्रसंग तर इतके सुंदर गुंफले आहेत की त्याचं वर्णन इथे करणं योग्य नाही. किंबहुना प्रेक्षकांनी त्या प्रसंगाचा आनंद स्वत:च घ्यावा, हे अगदी मनापासून सांगावसं वाटतं.

अभिनयानूभव
मोहन जोशी आणि सविता मालपेकर यांची केमेस्ट्री ‘गाढवाचं लग्न’ पासून रसिकांना सुपरिचित आहे. आनंद धडफळे या वृद्धाच्या भूमिकेत ‘मोहन जोशी’ एकदम फिट्ट, किंबहुना ही भूमिका त्यांना समोर ठेउनच लिहिली असावी, इतपत हे पात्र मस्त साकारलंय. सविता मालपेकर यांनी मेधा हे पात्र रंगवतांना अनेक कंगोरे उलगडले आहेत. आनंदरावांचे आजारपण, स्वत:चं दुखणं-खूपणं, आर्थिक कुचंबणा, मनाचा कोंडमारा, पोरीच्या प्रेमापोटी जमीन विकण्याचा निर्णय या सगळ्या अॅडव्हर्स परिस्थितीतही प्रसंगानुरूप विनोदबुद्धी जागृत ठेवण्याची कला त्यांनी साधली आहे. सुमीच्या भूमिकेत श्रद्धा पोखरणकर हिने बाजी मारली आहे. सुमीचं पात्र आजच्या पिढीनुसार फक्त स्वत:चा विचार करणारं असल्याचं प्रेक्षकांना सुरुवातीला जाणवतं. परंतु लेखकाने तिच्या मनातले खरे आणि मध्यंतरीच्या काळात भरकटलेले विचार उघड करतांना प्रेक्षकांना अचंबित केलं आहे. अपेक्षित आणि अनपेक्षित घटना, भावना, दुं:ख, आनंद, अचंबा अशा प्रसंगांनी रंगवलेलं हे नाटक प्रेक्षांना निश्चितपणे खिळवून ठेवतं.

एनसी देशपांडे
९४०३४९९६५४

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.