भारतीय संस्कृतीचा सन्मान करणारा :अमेरिकन अल्बम 

एनसी देशपांडे

0

प्रस्तावना
‘आजी-आजोबांच्या गोष्टी, तत्कालीन नाटक- सिनेमा’ या भवतालमध्ये आपला समाज संस्कारित झाला आहे. स्वातंत्रोत्तर काळात ‘समाज आणि प्रसार माध्यम’ यांनी सातत्याने ‘शौर्य, देशप्रेम आणि स्वातंत्र्य’ यांचा गजर करणारे कार्यक्रम सादर केल्याने तत्कालीन पिढीची मातृभूमीशी नाळ घट्ट जुळलेली आहे. परिणामस्वरूप १९६०-७० या दशकात परदेशात स्थायिक झालेले भारतीय जरी तेथील समाजामध्ये सहजपणे मिसळले असले तरीही आपल्या जन्मभूमीला विसरले नाहीत, हे वास्तव आहे. १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘पूरब और पश्चिम’ या चित्रपटाने भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यांच्यातील तफावत ठळकपणे दाखवत लंडनमध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांच्या भावना हेलावून टाकल्या होत्या. सध्या बॉलीवूड मधील अक्षय कुमार या कलाकाराने भारतीय संस्कृती आणि आपल्या जन्मभूमीशी जोडलेली घट्ट जुळलेली नाळ याच्या प्रदर्शनाची जबाबदारी समर्थपणे पेलली आहे.

मराठी नाटककारांनी आजवर समाजातील अनेक ‘व्यक्त-अव्यक्त’ विषयांवर समाज प्रबोधनाचं कार्य अतिशय उत्तम आणि यशस्वीपणे पार पाडलं आहे. किंबहुना मराठी माणसाचं समाजभान प्रगल्भ करण्यात रंगभूमीचा फार मोठा वाटा राहिला आहे. राजन मोहाडीकर लिखित आणि पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित नुकतंच मराठी रंगभूमीवर दाखल झालेलं ‘अमेरिकन अल्बम’ हे नाटक म्हणजे एकुणात ‘भारतीय संस्कृती, भारतीयांची मातृभूमीशी घट्ट जुळलेली नाळ आणि देशप्रेम’ या विषयावर भाष्य करणारी करणारी एक उत्तम कलाकृती आहे.

कथा संहिता
१९६० – १९७० या काळात अमेरिकेत स्वत:चं आयुष्य घडवण्यासाठी आलेल्या आणि  स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबाच्या ‘व्यावसायिक यशस्विता आणि कौटुंबिक समस्या’ याचा लेखाजोगा मांडला आहे. भारतामध्ये आई-वडील, भाऊ-वाहिनी यांना सोडून अमेरिकेत यशस्वीपणे स्थिरावलेल्या हरिहर कानेटकर याच्या कुटुंबाच्या माध्यमातून तमाम भारतीयांना एक शिकवण देण्याचा हा प्रयत्न आहे.  भारतातील नातेवाईकांची जबाबदारी सांभाळत परदेशात येऊन स्वत:च्या बळावर यशस्वी होतांना नकळतपणे आपल्या स्वत:च्या कुटुंबातील लहान-सहान समस्या हळूहळू मोठ्या होतांना जाणवतच नाहीत. परंतु जेव्हा जाणवतात तेव्हा वेळ निघून गेलेली असते. परंतु आम्ही भारतीय, आमची संस्कृती आणि कुटुंब व्यवस्था याची महानता या सगळ्या समस्यांवर नियंत्रण मिळवते आणि संसाराची घसरलेली गाडी पुन्हा रुळावर आणून सोडते.

वास्तुविशारद हरिहर कानेटकर (दीपक करंजीकर), अमेरिकेत आपलं आयुष्य घडवण्यासाठी दाखल होतो आणि यशस्वी होतो. अमेरिकेला आणि हरिहरच्या पैशांवर नव्हे तर केवळ त्याच्या कर्तुत्वावर भाळलेली नीलिमा (भाग्यश्री देसाई), यांची कन्या हनी – बबलू (अमृता पटवर्धन) आणि निलीमाचा भाऊ – हरिहरचा व्यावसायिक सहकारी निशी (आशूतोष नेर्लेकर) यांच्या भोवती या नाटकाचं कथानक गुंफलेलं आहे. या कुटुंबातील ही  चार पात्रं आणि व्हिडीओच्या माध्यमातून हरिहरचे आई-बाबा, भाऊ-वाहिनी कथानकात महत्त्वाची भूमिका निभावतात. या व्यतिरिक्त मेघा फडणवीस (मोनिका जोशी) यांनी गंभीर विषयात काही हास्याचे फवारे उडवले आहेत. मार्गारेट (निशीची प्रेयसी) ही व्यक्ती केवळ उल्लेखानेच येते परंतु निशी आणि हनी यांच्या बाबतीत अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात मदत करते.

खरंतर बाप आणि मुलगी यांचं नातं एक वेगळंच नातं मानलं गेलं आहे. परंतु आपल्या व्यवसायात आकंठ बुडलेला हरिहर, हनीवरील प्रेम व्यक्त करू शकत नाही. अमेरिकेतील कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था, तरुण पिढीची जडणघडण, आचार-विचार आणि व्यक्तीस्वातंत्र्य बाप-लेकी यांच्यातील नातं विकसित तर होतंच नाही. किंबहुना बाप-लेकीच्या नात्यातील दरी वाढण्यास कारणीभूत ठरते.

Marathi Drama,  /Honoring Indian Culture:  American Album

दिग्दर्शन आणि अभिनयानुभव
पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शन, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि वेशभूषा अशी पंचरंगी जबाबदारी पेलली आहे. लेखनापेक्षाही पुरुदाचं इंटरप्रिटेशन अचूक असल्याने नाटकाची मांडणी सुयोग्य झाली आहे.

हरिहर कानेटकर
अमेरिकेत वास्तव्य, तेथील समाज व्यवस्थेचा गाढा अभ्यास, अर्थतज्ञ, लेखक आणि उत्कृष्ट अभिनेता – दीपक करंजीकर याची ‘हरिहर कानेटकर’ या मध्यवर्ती भूमिकेसाठी निवड करून नाटकाची यशस्विता निश्चित केली आहे. एकीकडे यशाची चव चाखतांना आपल्या कुटुंबातील समस्यांकडे त्याचं दुर्लक्ष होत असल्याची गंधवार्ता हरिहरला अजिबात नसते. आपला देश, भारतीय आणि भारतातील आपले नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याविषयी अपरंपार प्रेम आणि आपुलकी, स्वाभिमान, कर्तुत्व, यशस्विता, हतबलता आणि अगतिकता असे अनेक कंगोरे दिपकने अतिशय उत्तमपणे सादर केले आहेत. आपल्या प्रगल्भ अभिनयाने दिपकने ही भूमिका इतकी अचूक पेलली आहे की त्याच्यासाठी टेलरमेड भूमिका असावी, इतपत हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं.

नीलिमा कानेटकर
सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि नवीन गोष्टी आत्मसात करण्याची प्रवृत्ती अशा ‘नीलिमाच्या’ भूमिकेसाठी भाग्यश्री देसाईची निवड एकदम सुयोग्य. एकुणात अमेरिकन सामाजिक व्यवस्था, अमेरिकन बोलीभाषा, उच्चार आणि एकुणात राहणीमान याचं उत्तम दर्शन या पात्रामुळे घडतं.

हनी – बबलू
अमेरिकेतला जन्म, शिक्षण, मित्रमंडळी, भवताल, व्यक्तीस्वातंत्र्य आणि त्याला कायद्याची जोड याने प्रभावित झालेली ‘हनी’ हे पात्र रेखाटण्यात अमृता पटवर्धन या अभिनेत्रीने कोणतीही कसूर सोडली नाही. अमेरिकेच्या उच्च राहणीमानात वाढलेल्या हनीला भारत देश आणि भारतीय यांचा प्रचंड तिटकारा आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाचं मूळ भारतीय असल्याचा तिला तिरस्कार आहे. तिच्या वागण्या-बोलण्यातून तो स्पष्टपणे जाणवतो.

निशी
नीलिमाचा भाऊ या नात्यापलीकडेही कानेटकर कुटुंबाचा व्यावसायिक आणि भावनिक आधारस्तंभ असलेला ‘निशी’ या भुमिकेसाठी आशुतोष नेर्लेकर याची केलेली निवड या कलाकाराने सार्थ ठरवली आहे. नाटकाचा तोल सांभाळण्याची जबाबदारी या भूमिकेवर आहे. प्रत्येकाला समजून घेण्याची आणि समजावून सांगण्याची हातोटी या पात्रावर आहे. खरंतर हरीच्या व्यवसायातील आणि कुटुंबातील प्रत्येक आनंदी आणि दुख:द प्रसंगी हमखास याचीच आठवण होईल असं हे पात्र आहे. सदैव हसतमुख, प्रत्येक संकटावर उत्तम उपाययोजना आणि अपेक्षित यश देण्याची हमी देण्याचं काम या अभिनेत्याने मस्तच रंगवलं आहे.

मेघा फडणवीस
या नाटकाचा मूळ बाज गंभीर आहे. सुरुवात, मध्यंतर आणि शेवट गोड होईपर्यंतचे प्रसंग प्रचंड तणावपूर्ण आहेत. परंतु दिग्दर्शकाने मधून-मधून ताण-तणाव सैल करत नाटक खेळतं ठेवलं आहे. सुरुवातीलाच प्रेक्षकांना ताण जाणवू नये म्हणून ‘मेघा –फडणवीस’ या पात्राच्या रूपाने खसखस पिकवली आहे. त्यासाठी पुणेरीपणा, खोचकपणा आणि समाजकार्याच्या रूपाने व्यावसायिकता दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न मोनिका जोशी या अभिनेत्रीने केला आहे.

दिग्दर्शनासोबतच, पडदा उघडताच देखणा सेट, संगीत, प्रकाशयोजना आणि वेशभूषा या तांत्रिक बाबी एव्हरीथिंग पुरूचा फील देतात. कलाकारांच्या उत्तम अभिनयाची जादू, परदेशात स्थिरावलेल्या भारतीयांच्या कौटुंबिक समस्यांची जाणीव करून देते. रंगमंच व्यवस्था शिकागो शहरातील घराचा फील देते. कलाकारांना पात्रांना साजेशी वेशभूषा कलाकारांना भूमिका साकारण्यात उपयुक्त ठरते. प्रकाश योजना आणि संगीत नाटकातील प्रसंग गहिरे करतात. सध्याच्या युगातील व्हिडीओ कॉलचा सुंदर वापर करून दिग्दर्शकाने प्रेक्षकांना भारतातील नातेवाईकांशी गाठ घालून दिली आणि आणिबाणीच्या प्रसंगांची आखोदेखी सादर केली.

Marathi Drama,  /Honoring Indian Culture:  American Album

सारांश
दोन पिढ्यांमधील अंतर हा विषय भारतातही आहेच. परंतु भारतीय मूळ जपणारा अमेरिकेतील बाप आणि भारताचा मनसोक्त तिरस्कार करणारी अमेरिकन मुलगी यांच्यातील विसंवाद किंबहुना नात्याचा अस्वीकार यावर उघडपणे भाष्य करणारी ही कलाकृती प्रेक्षकांनाच नव्हे तर भारतीयांना अनेक प्रसंगांना सामोरे जाण्याचा मार्ग दाखवते.

मध्यंतरात अमेरिकेत यशस्वी झालेल्या परंतु मुळात भारतीयत्वाचा अभिमान बाळगून  आपल्या बापाच्या मृत्यूनंतर भगवतगीतेतील पंधरावा अध्याय पठण करणारा अगतिक मुलगा हरी दाखवून लेखक आणि दिग्दर्शकाने भारतीय संस्कृतीचा एकप्रकारे सन्मानच केला आहे. नाटकाचा शेवट करतानाही लेखक आणि दिग्दर्शकाने भारतीयत्व, संस्कृती, समाज आणि कुटुंब व्यवस्था याचं प्रदर्शन करून भारताला अपेक्षित सन्मान दिला आहे.

अमेरिकेन संदर्भ आणि भारतीय संस्कृती याची सांगड घालत ‘जनरेशन गॅप’ या विषयावरील प्रबोधनात्मक नाट्य मांडायचं म्हणजे ‘लेखन, दिग्दर्शकीय इंटरप्रिटेशन आणि अभिनय’ अत्यंत महत्वाचं ठरतं. दिग्दर्शनाचा दांडगा अनुभव असलेला ‘पुरुषोत्तम बेर्डे, समाजप्रबोधनाचा वसा घेतलेला दीपक करंजीकर आणि व्यावसायिक नाटकांचा तगडा अनुभव असलेली भाग्यश्री देसाई’ या त्रिवेणी संगमाने या विषयाला न्याय दिला आहे. जन्माने भारतीय आणि परदेशात यशस्वीरीत्या स्थाईक झालेले हरिहर कानेटकर आणि नीलिमा कानेटकर या दांपत्याची तिथेच जन्मलेली मुलगी हनी (अमृता पटवर्धन) यांच्यातील ‘कौटुंबिक गुंतागुंत, देश-परदेश यातील फरक, दोन पिढ्यांमधील वैचारिक संघर्ष आणि कुचंबणा’ या विषयाला अत्यंत परिणामकारक पद्धतीने सादर केल्याने लेखकाचा मूळ हेतू सफल होतो. अगदी नकळतपणे आपणही त्यांच्यात गुंतून जातो. हसवणारं, रडवणारं आणि विचार करायला भाग पाडणारं, हे नाटक प्रेक्षकांना समाधान देतं.

एनसी देशपांडे
मोबाईल – ९४०३४९९६५४

N C Deshpande
एनसी देशपांडे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.