रक्तदानाबद्दल राजपत्रित अधिकारी गजानन देवचके यांचे नांवे आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद

रक्तदानाच्या माध्यमातून शासकीय अधिका-याची दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये आंतरराष्ट्रीय विक्रमाची नोंद 

0

नाशिक,दि. २२ सप्टेंबर २०२३ – महाराष्ट्र राज्य शासनाच्या वित्त विभागात कार्यरत उपकोषागार अधिकारी,गजानन माधव देवचके(सिन्नर )यांनी त्यांचे आयुष्यातील १०५ वे रक्तदान नुकतेच पूर्ण केले.त्यांच्या या रक्तदानाच्या कार्याची दखल दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेव्दारे नुकतीच घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील शंभर पेक्षा जास्त (१०५) वेळा रक्तदान करणारा गट ब संवर्गातील एकमेव राजपत्रित अधिकारी अशी नोंद होऊन दि ग्रेट इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे हा आंतरराष्ट्रीय विक्रम त्यांच्या नांवे घोषित करण्यात आलेला आहे.सदर विक्रमाचे प्रमाणपत्र,स्मृतीचिन्ह व मेडल त्यांना नासिकचे विभागीय महसूल आयुक्त श्री.राधाकृष्ण गमे आय ए एस यांच्या हस्ते विभागीय आयुक्त यांचे दालनात देण्यात आले.

गजानन देवचके यांनी सदरच्या आंतरराष्ट्रीय विक्रमाला वयाच्या ४६ व्या वर्षी गवसणी घातलेली आहे. त्यांनी आत्तापर्यंत ४२ वेळा सिंगल डोनर प्लेटलेट व एकदा कोविड प्लाझमा देखील दिलेला आहे. श्री. देवचके हे नाशिक येथील जनकल्याण रक्तपेढीवर संचालक पदावर देखील कार्यरत आहेत. वरील १०० रक्तदान हे सलग एकाच रक्तपेढीत करण्यात आलेले आहेत. त्यानंतर त्यांनी अनुक्रमे १०१ ते १०५ हे रक्तदान जिल्हा शासकीय रुग्णालय,नाशिक,अहमदनगर, धुळे,जळगांव, व नंदूरबार येथे जाऊन पूर्ण केलेले आहे. नासिक विभागातील पाचही सिव्हील हॉस्पीटलमध्ये जाऊन सलगपणे रक्तदान पूर्ण करणारे ते पहिले राजपत्रित अधिकारी ठरले आहेत.

त्यांना कोविड योध्दा, महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस, शतकवीर रक्तदाता, पंचवटी गौरव, दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर समाज गौरव, अश्या अनेकविध नामांकित पुरस्कारांनी गौरविलेले आहे.

त्यांना मा. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांच्या हस्ते ”जीवनदाता गौरव” पुरस्काराने देखील सन्मानीत करण्यात आलेले आहे. अपर मुख्य सचिव वित्त विभाग मंत्रालय, मुंबई श्री. आशिष कुमार सिंह यांनी विशेष उल्लेखनीय कामगिरी बाबत वित्त विभागाच्या वतीने सन्मानीत केलेले आहे.

मा. पोलिस आयुक्त श्री.अंकुश शिंदे (भाप्रसे) यांच्या हस्ते आरोग्य विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार झालेला आहे.भविष्यात विविध शासकीय प्रशिक्षण केंद्रे, महाविदयालये, आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहांच्या माध्यमातून रक्ताबाबतचे प्रबोधन करण्याची त्यांची इच्छा आहे.

त्यांची पत्नी अश्विनी यांनी १५ वेळा व त्यांची ज्येष्ठ कन्या अनुष्का हिने ०५ वेळा रक्तदान केलेले आहे.गजानन देवचके यांच्या या कार्याबद्दल शासनाच्या तसेच समाजाच्या विविध स्तरामधून शुभेच्छा देण्यात आल्या.

Marathi News/Nashik News/Gazetted officer Gajanan Devachke's name entered in international record for blood donation

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!