मुंबई – अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अखेरीस शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता चांगलेच कामाला लागले आहे. पण, अजूनही शिंदे गटाकडून अनेकांच्या भेटीगाठी सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी आज सकाळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.राज ठाकरे यांच्या भेटीनंतर सदा सरवणकर म्हणाले की, ‘राज्यात सेना-भाजप सरकार स्थापन झाले आहे. राज ठाकरे हिंदु पुरस्कर्ते आहेत. राज ठाकरे हे हिंदु जननायक आहेत. माझे शेजारी सुद्धा आहेत. त्यांची तब्येत बरी नसतानाही त्यांनी मला वेळ दिला मी आभारी आहे’असं ही सदा सरवणकर यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आ. सदा सरवणकर अचानक शिंदे गटात सामील झाल्यामुळे शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात खळबळ उडाली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर आता सर्व शिंदे गटातील आमदार हे आपआपल्या मतदारसंघात पोहोचले आहे.आज सकाळी सदा सरवणकर यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी जाऊन भेट घेतली.
माहीम मतदार संघाचे आमदार सदा सरवणकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. सदा सरवणकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत. या भेटीच्यावेळी सरवणकर यांची मुलगी आणि माजी नगरसेवक असलेला मुलगा समाधान सरवणकर हे राज ठाकरे यांच्या भेटी दरम्यान उपस्थित होते.