विद्यार्थ्यांनी केवळ नोकरी मिळविण्याऐवजी स्वतः उद्योजक व्हावे -उपायुक्त सैंदाणे
एम.ई.टी.भुजबळ नॉलेज सिटीत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
नाशिक ,दि,१९ ऑक्टोबर २०२३ –पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा हा केवळ नोकऱ्या देण्यासाठी नाही. विद्यार्थ्यांमधून उद्योजक निर्माण व्हावे व त्यांनी योग्य युवकांना रोजगार मिळवून द्यावा. या मेळाव्यात आघाडीच्या ३५ कंपन्या सहभाग नोंदवला होता तसेच साडेतीन हजार रिक्त पदे उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी मागणीनुसार मुलाखती देऊन रोजगाराची संधी मिळवावी असे प्रतिपादन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांनी केले. ते रोजगार मेळाव्याच्या उदघाट्न प्रसंगी बोलत होते.
एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटी व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजक मार्गदर्शन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. प्रारंभी सायली काकडे यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या दरमहा नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये कौशल्य विकास उपक्रम राबवले जातात. ग्रामीण पातळीवर अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून आतापर्यंत ८ रोजगार मेळावे घेण्यात आले असून साडेचार हजार उमेदवारांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.
लवकरच करिअर केंद्र सुरु करण्यात येणार आहे. अभियांत्रिकी विभागाचे प्राचार्य डॉ. व्ही.पी. वाणी यांनी स्वागत केले. ते म्हणाले,आमच्या संस्थेत ७ हजार विद्यार्थी विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच त्यांची कौशल्ये विकसित केली जातात. विद्यार्थी व रोजगार यांना जोडण्याचे काम आजच्या मेळाव्यात होणार आहे.
उपायुक्त सुनील सैंदाणे म्हणाले, सुशिक्षित बेरोजगारांना उत्तम नोकरीच्या संधी मिळवून देण्यासाठी मेळाव्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दोन्ही घटकांना एकत्र आणण्यासाठी एम.ई.टी. भुजबळ नॉलेज सिटीने मोलाचे सहकार्य केले आहे. उमेदवारांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. शासन आपल्या दारी उपक्रमाचाच हा एक भाग असून विविध महामंडळांची दालने येथे उभारण्यात आली आहेत. तेथे स्वतःचा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी सुयोग्य मार्गदर्शन मिळेल.
नवसंकल्पनांना चालना दिली जाईल. विद्यार्थ्यांनी व उद्योजकांनी राज्य शासनाच्या विनामूल्य व उपयुक्त साईटला महिन्यातून एकदातरी भेट द्यावी असे आवाहन त्यांनी केले. व्यासपीठावर सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी व पॉलीटेक्निक विभागाचे प्राचार्य डॉ. आर. एस. नारखेडे, इन्स्टिट्यूट ऑफ डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. रिझवान शेख, प्रा. दीपक वर्तक उपस्थित होते. फार्मसी विभागाचे प्राचार्य डॉ.संजय क्षीरसागर यांनी आभार मानले. संस्थेचे विश्वस्त समीर भुजबळ यांनी एम.ई.टी भुजबळ नॉलेज सिटी अशा उपक्रमांना नेहमीच सहकार्य करेल अशी ग्वाही देऊन शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाप्रसंगी सर्व इन्स्टिट्युटचे प्राचार्य, प्राध्यापक, विभाग प्रमुख, ट्रस्ट कार्यालयाचे पदाधिकारी, विद्यार्थी व नाशिककर मोठया संख्येने उपस्थित होते.
नाशिक शहर,जिल्ह्यातील विद्यार्थी सहभागी
या रोजगार मेळाव्याला नाशिक शहर व जिल्ह्यातील सुमारे १७०० पेक्षा जास्त नोकरी इच्छुक तरुण तरुणींनी नोंदणी केली व प्रत्यक्षपणे हजारावर तरुण-तरुणी दाखल झालेत. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी एम.ई. टी. भुजबळ नॉलेज सिटीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. विविध क्षेत्रातील कंपन्यांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन मार्गदर्शन केले. अनेक योग्य उमेदवारांना संध्याकाळी निवडपत्र देण्यात आले.