अमरावती – राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना न्यायालयाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी प्रतिज्ञापत्रात मुंबई येथील सदनिकेची नोंद न केल्याप्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोषी ठरवीत दोन महिन्याची शिक्षा आणि २५ हजार रुपये दंड ठोठावला. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी राज्यमंत्री बच्चू कडू तर्फे जामीन अर्ज सादर केला असता न्यायालयाने तो मंजूर केला आहे. तसेच अपील करता ३० दिवसाचा कालावधी देण्यात आला आहे.
न्यायालयाने शिक्षा सूनावल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जामिनसाठी अर्ज सादर केला असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. या प्रकरणाने राजकीय क्षेत्रात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघातून निवडणूक लढवतांना निवडणूक प्रतिज्ञा पत्रात मुंबई येथील त्यांच्या नावाने असलेल्या फ्लॅटची माहिती दिली नव्हती त्यामुळे या विरोधात चांदूरबाजार भाजपचे गोपाल तिरमारे यांनी बच्चू कडू विरोधात डिसेंबर २०१७ रोजी चांदूरबाजार तालुक्यातील आसेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.यात बच्चू कडू विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते, यात तब्बल पाच वर्षानंतर चांदुरबाजार येथील न्यायालयाने बच्चू कडू यांच्या विरुद्ध निकाल देत त्यांना दोन महिने सश्रम कारावास आणि २५ हजार रुपये दंड दिला आहे
तर बच्चू कडू यांनी जनतेची दिशाभूल केली आणि चुकीची माहिती दिल्याने त्यांच विधानसभा सदस्यपद रद्द करा अशी प्रतिक्रिया याचिकाकर्ते गोपाल तिरमारे यांनी दिली.