नेपाळमधील बेपत्ता विमान सापडलं : अपघातग्रस्त विमान आढळलं भयंकर स्थितीत
अपघातग्रस्त विमानात मुंबईतील एकाच कुटुंबातील चार प्रवासी

रविवारी नेपाळमध्ये बेपत्ता झालेले विमान अखेर सापडलं आहे.तारा एअरलाइनच्या विमानाच्या अवशेषाचे काही फोटो समोर आले आहेत. मुस्तांग भागातील कोबान परिसरात विमानाचे अवशेष भयंकर स्थितीत सापडले आहेत.हे विमान तारा एअरलाइनचे फ्लाइट नं ९ एनएईटी असून हे विमान नेपाळमधील पोखरा येथून जोमसोमला जात होते.सकाळी १० च्या सुमारास हे विमान अचानक बेपत्ता झालं.विमानातील २२ प्रवाशांबाबत अद्याप काही माहिती समोर आलेली नाही.या २२ प्रवासात मुंबईतील एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. नेपाळ सैन्याने आणि बचाव दलाने विमान अपघात स्थळाचा प्रत्यक्ष शोध घेतला आहे. बचाव दलाकडून सध्या तपास सुरु आहे.
काल दिवसभर शोधमोहीम राबवल्यानंतर दुपारी ४ वाजता विमान कोसळल्याची पुष्टी करण्यात आली. या विमानात तीन क्रू मेंबर्ससह एकूण २२ जण होते. यामध्ये ४ प्रवासी भारतीय होते. तर जर्मनीचे २ आणि १३ प्रवाशी नेपाळ देशाचे होते. अपघातग्रस्त विमान ३० वर्षांहून अधिक जुनं असल्याची माहिती समोर आली आहे.विमान रविवारी सकाळी बेपत्ता झालं. यानंतर बेपत्ता विमानाचा शोध सुरु झाला. मात्र नंतर बर्फवृष्टीमुळे शोधकार्य थांबवण्यात आलं होतं. खराब हवामानात नेपाळच्या सेनेचं एक हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचा अंदाज असलेल्या भागात पोहोचलं. बर्फवृष्टी थांबल्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु करण्यात आलं. पायलटच्या फोनंच शेवटचं लोकेशन ट्रॅक करत विमान शोधण्यात यश आलं आहे. माय रिपब्लिकाने दिलेल्या वृत्तानुसार, नेपाळ लष्कराचे १० सैनिक आणि दोन कर्मचाऱ्यांसह हेलिकॉप्टरने नरशंग मठजवळ नदीच्या काठावर उतरले, जे अपघाताचे संभाव्य ठिकाण होतं. याच परिसरात काही अंतरावर अपघातग्रस्त विमानाचे अवशेष सापडले आहेत.
अपघातग्रस्त विमानात मुंबईतील एकाच कुटुंबातील चार प्रवासी
या विमानात चार भारतीय प्रवाशांसोबत एकूण २२ प्रवासी प्रवास करत होते. यामधील चारही भारतीय प्रवासी हे मुंबईतील एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर असं या चार भारतीय प्रवाशांची नावं आहेत.सध्या अशोक कुमार भुवनेश्वरमध्ये तर, वैभवी ठाण्यात माजीवड्यातील रुस्तमजी इमारतीत वास्तव्यास आहेत. दोन्ही मुले वैभवी यांच्याबरोबर राहतात.



