मुंबई, दि. ३ जुलै २०२५ – MNS Shiv Sena Unity महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वळण आल्याचं स्पष्ट होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन बंधू येत्या ५ जुलै रोजी एकत्र येणार आहेत. या ऐतिहासिक एकतेमुळे सत्ताधारी एकनाथ शिंदेसह सरकारसमोर मोठं राजकीय आव्हान निर्माण झालं असून, राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात संपूर्ण राज्यभर संताप व्यक्त केला गेला. ठाकरे बंधूंमध्ये यावर एकवाक्यता निर्माण झाली आणि मराठी जनतेने उचललेल्या आवाजाला बळ देत, त्यांनी ५ जुलै रोजी “मराठी प्रेमींचा पक्षविरहित मोर्चा” काढण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयामुळे संपूर्ण राज्यात वातावरण तापलं आणि प्रचंड जनआंदोलन उभं राहिलं. परिणामी सरकारने हिंदी सक्तीचा GR मागे घेण्याचा निर्णय घेतला. मराठीचा विजय झाला!
राज आणि उद्धव यांच्यातील कटुता मागे टाकून जर दोघांनीही एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला, तर मुंबई, ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागांमध्ये त्यांचा प्रभाव पुन्हा प्रस्थापित होऊ शकतो. मनसेच्या आक्रमक शैलीसोबत उद्धव ठाकरेंच्या सहानुभूतीची लाट मिळून, मतदारांवर मोठा प्रभाव पडू शकतो.
या संभाव्य समीकरणामुळे शिंदे गट व भाजपा यांची गणितं कोलमडण्याची शक्यता आहे. विशेषतः शिंदे गटाची मराठी मतदारांवर असलेली पकड ढासळू शकते. कारण राज व उद्धव एकत्र आल्यास पारंपरिक शिवसैनिकांची मने पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या दिशेने वळू शकतात.
दरम्यान, भाजप व शिंदे गटाकडून यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र विरोधकांत वाढणारी सलोख्याची भावना आगामी विधानसभा निवडणुकीत नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते.
‘महाराष्ट्र मोठा आहे’ –राज ठाकरेंचा भावनिक इशारा (MNS Shiv Sena Unity)
राज ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी “महाराष्ट्र कोणत्याही वादापेक्षा मोठा आहे,” असं विधान केलं होतं. याच विधानावर शिक्कामोर्तब करत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकत्र येण्याचा निर्णय घेतला. या ऐतिहासिक पावलाने भाजप व शिंदे गटाच्या रणनीतीला जबरदस्त हादरा बसला आहे.
मराठी मतदारांची ताकद – निर्णायक ठरणार!
मुंबई महापालिकेतील सुमारे १०० प्रभागांमध्ये मराठी मतदार निर्णायक आहेत. दोन्ही ठाकरे गटांचा मतदार आधार सारखाच असल्याने या युतीमुळे भावनिक लाट निर्माण होऊ शकते. याचा थेट फटका शिंदे गटाला बसणार असून, भाजपची हिंदी भाषिक मतांवरील मदार सुद्धा धोक्यात येऊ शकते.
भाजपची अडचण आणि सावधगिरी
हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर मनसे-शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक भूमिका घेत असल्याने भाजपची अवस्था सध्या सावध पण अस्वस्थ अशी आहे. मराठी अस्मिता आणि भाषेचा मुद्दा निवडणुकीच्या काळात तापल्यास भाजपची अडचण मोठी होणार आहे, विशेषतः मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसारख्या शहरी भागात.
महाविकास आघाडीत संभ्रम?
या नव्या युतीमुळे महाविकास आघाडीतही काहीसा संभ्रम निर्माण होऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांना राज ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे धोका वाटू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना देखील राष्ट्रीय राजकारणातील भूमिका ठरवावी लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीवरही प्रभाव
जर ठाकरे बंधूंची ही युती शहरी भागांमध्ये यशस्वी ठरली, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील सत्तेचं गणितही पूर्णपणे बदलू शकतं. मराठी मतांच्या एकजुटीमुळे ही जोडी नव्या राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकते.
भाजपामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश; नाशिकमध्ये ठाकरे गटाला जोरदार धक्का
भाजपामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश सुरू असून त्याचा थेट फटका ठाकरे गटाला बसताना दिसत आहे. नाशिक महापालिकेच्या पार्श्वभूमीवर अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होत असून त्यामुळे भाजपची ताकद लक्षणीयरीत्या वाढली आहे.
भाजपने नाशिकमध्ये “१०० प्लस” चा नारा दिला असून, आगामी महापालिका निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून भाजपचा महापौर नाशिक व मुंबईत बसवण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे शिंदे गटाला किती जागा मिळणार, तसेच महायुतीतील अजित पवार गटाला किती जागा दिल्या जाणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
या सर्व घडामोडीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कारण महापालिका निवडणुकांमध्ये भाजप जर स्वतःच सर्व आघाड्यांवर आक्रमक भूमिका घेत असेल, तर शिंदे गट व इतर घटक पक्षांची मागणी धोक्यात येऊ शकते.
भाजपचा जोर वाढत असताना, ठाकरे गट मात्र अनेक पदाधिकाऱ्यांच्या गळतीमुळे अडचणीत आला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि इतर विरोधक कोणती रणनीती आखतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.