मुंबई– राज्यावर आलेल्या कोरोना संकटामुळे पुढे ढकललेल्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांची तारीख आता जाहीर झाली आहे. ११ एप्रिल २०२१ रोजी होणाऱ्या एमपीएससीच्या (MPSC) संयुक्त पूर्व परीक्षा आता शनिवार ४ सप्टेंबर २०२१ रोजी होणार आहेत.
कोरोनाच्या संकटामुळे २०२० पासून या परीक्षा आता पर्यंत ६ वेळेस पुढे ढकलण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांकडून देखील सातत्यानं परीक्षा कधी आयोजित केली जाणार यांसदर्भात विचारणा केली जात होती. अखेर आज सरकारनं आता कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागल्याने राज्य व केंद्र शासनाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. ८०६ जागांसाठी ही परीक्षा होणार आहे.
या संदर्भात आयोगाने असेही म्हटले आहे की कोविड विषाणू प्रादुर्भावाच्या स्थितीच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना लक्षात घेऊन परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोग वेळोवेळी आढावा घेईल. तसेच याबाबतची माहिती आयोगाच्या संकेतस्तळावर प्रसिद्ध करण्यात येईल. यामुळे आयोगाचे संकेतस्थळ नियमितपणे पाहण्याचे आवाहनदेखील उमेदवारांना करण्यात आले आहे.