कोलकत्ता ,दि,९ जानेवारी २०२४ – संगीत सम्राट उस्ताद राशिद खान यांचं आज दुपारी निधन झालं आहे.वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. उस्ताद रशीद खान यांना प्रोस्टेट कॅन्सर झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. ते व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर होते. उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले आहे. गेल्या महिन्यात सेरेब्रल अटॅक आल्यानंतर उस्ताद रशिद खान यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांनी सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले होते. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. राशिद खान यांच्या निधनानं संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
उस्ताद रशीद खान यांच्यावर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही खूप प्रयत्न केले,पण प्रयत्नांना यश मिळाले नाही. रशीद खान यांचे दुपारी ३.४५ च्या सुमारास निधन झाले.’
उत्तर प्रदेश येथील बदाऊन येथे जन्मलेले रशिद खान हे उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांचे पुतणे होते. त्यांनी सुरुवातीचे प्रशिक्षण त्यांचे आजोबा उस्ताद निसार हुसेन खान (१९०९-१९९३) यांच्याकडून घेतले. रशिद खान हे उस्ताद रामपूर- सहसवान घराण्याचे गायक होते. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी पहिला स्टेज परफॉर्मन्स दिला होता. रशिद खान यांच्या पश्चात पत्नी सोमा, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.
राशिद खान यांना पद्मश्रीसह संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. तसेच सर्वोच्च नागरिक पुरस्कार पद्मभूषणदेखील त्यांना प्रदान करण्यात आला आहे. राशिद खान यांनी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटातील ‘आओगे जब तुम’ ही बंदिश उस्ताद रशिद खान यांनी गायली होती. जी खूप लोकप्रिय झाली. ‘माय नेम इज खान’, ‘राझ 3’, ‘मंटो’ आणि ‘शादी में जरूर आना’ यांसारख्या चित्रपटांमधील गाणी देखील उस्ताद रशिद खान यांनी गायली आहेत.
उस्ताद रशिद खान यांच्या निधनाची बातमी कळताच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या, ‘संपूर्ण देशाचे आणि संपूर्ण संगीत जगताचे हे मोठे नुकसान आहे. मी खूप दु:खी झाले आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही की राशिद खान हे आता आपल्यात नाहीत.”