नाशिक, दि. ६ ऑगस्ट २०२५ :Muskaan Season 6 Nashik दिव्यांग मुलांच्या आत्मविश्वासास नवे पंख देणारा आणि त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देणारा एक हृदयस्पर्शी उपक्रम – ‘मुस्कान सीझन 6’ – सक्षम्म फाउंडेशनतर्फे नुकताच नाशिकमधील गुरुदक्षिणा हॉल, कॉलेज रोड येथे पार पडला.
‘मुस्कान’ ही केवळ नृत्यस्पर्धा नाही, तर प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याच्या मनातील आशा, आत्मविश्वास आणि सृजनशीलतेचा उत्सव आहे. या वर्षीच्या सिझनमध्ये २६ शाळांनी सहभाग नोंदवला आणि २१५० प्रेक्षकांनी या बालकलाकारांच्या सादरीकरणाला भरभरून दाद दिली.
स्पर्धा नव्हे, सन्मान आणि समावेशाचा उत्सव(Muskaan Season 6 Nashik)
‘मुस्कान’चा मुख्य उद्देश कोणाला हरवणं नाही, तर प्रत्येक दिव्यांग विद्यार्थ्याला आपले कला-कौशल्य खुलेपणाने दाखवता यावे यासाठी संधी उपलब्ध करून देणे हा आहे. अंध, मूकबधिर, मतिमंद, कर्णबधिर आणि बहुविकलांग मुलांसाठी ही स्पर्धा खास आयोजित करण्यात आली होती.
सक्षम फाउंडेशनने मागील सहा वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जाऊन या कार्यक्रमासाठी तयारी केली. शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संवाद साधून त्यांच्या मनात ‘मीही काही करू शकतो’ हा आत्मविश्वास रुजवला.
प्रसिद्ध पाहुण्यांची उपस्थिती आणि सामाजिक पाठिंबा
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रहार संघटनेचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चूभाऊ कडू, समाजकल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर, दिव्यांग हक्क अधिकारी भरत चौधरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
यावेळी ‘सितारे जमीन पर’ फेम ऋषभ सुरी देखील विशेष आमंत्रित म्हणून उपस्थित होता, ज्याने उपस्थित मुलांना चिअर करत त्यांच्या आनंदात सहभागी झाला.
स्पर्धेतील प्रमुख विजेते :
🔹 बहु-अपंगत्व शाळा श्रेणी :
प्रथम: NAB स्कूल सातपूर
द्वितीय: निरंजन आव्हाड बहु-अपंगत्व शाळा
तृतीय: आशा स्कूल देवळाली
🔹 शारीरिक व मानसिक अपंग शाळा :
प्रथम: प्रयास लर्निंग थेरपी सेंटर
द्वितीय: काकासाहेब भामरे शाळा
तृतीय: मनाली NGO स्पेशल स्कूल
🔹 आव्हानात्मक कार्यशाळा श्रेणी :
प्रथम: प्रबोधनी संरक्षित कार्यशाळा
द्वितीय: रुक्माबाई अपंग युवक शाळा
तृतीय: मनाली शाळा
🔹 अंध शाळा श्रेणी :
प्रथम: NAB भावना चांडक
द्वितीय: NAB कार्यशाळा शाळा
तृतीय: सरकारी अंध शाळा
🔹 मूकबधिर – कर्णबधिर श्रेणी :
प्रथम: श्रीमती माई लेले श्रावण विकास विद्यालय
द्वितीय: इंदिरा भारती कर्णबधिर निवासी विद्यालय
तृतीय: अमर बन्सीलाल छाजेड श्रावण विकास विद्यालय
कार्यक्रम यशस्वी करणारे आधारस्तंभ
सक्षम फाउंडेशनमागे उभं राहणाऱ्या अनेक व्यक्तींमध्ये रज्जत शर्मा, वैभव नातू, मिलिंद महाजन, महादेव गवई, गोविंद थापा, परेश मेहता, देवयानी भारती, शुभम दोंदे, गौरव पाटील, जगदीश मुठाळ, विनोद यादव, सचिन कुलथे, अमर वाणी, नितीन सोनार आदींचा मोलाचा वाटा आहे.
मुस्कान – केवळ हास्य नव्हे, तर आशेची झुळूक
‘मुस्कान’ या नावाचा अर्थ इथे चेहऱ्यावरील हास्यापुरता नाही – तर या मुलांच्या आत्म्यात उमटणाऱ्या आशावाद, आत्मिक उर्जेचा आणि आत्मविश्वासाचा प्रकाश आहे. सक्षम्म फाउंडेशनचा हा उपक्रम समाजासाठी एक सशक्त संदेश आहे – “संवेदनशीलतेतून समाज बदलतो, आणि प्रत्येकाचा सहभाग गरजेचा असतो.”