शाश्वत विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांची भूमिका महत्वाची : राधाकृष्ण गमे
होमेथॉन २०२३ गृहप्रदर्शनाचा शानदार प्रारंभ :पहिल्याच दिवशी १० हजार नागरिकांची भेट,१८ जणांनी केले फ्लॅटचे बुकिंग
नाशिक मध्ये १५ लाखा पासून १२ कोटी चे फ्लॅट उपलब्ध
नाशिक ,दि. २१ डिसेंबर २०२३ –आगामी काळात सिंहस्थ कुंभमेळा होणार असून या निमित्ताने शहराच्या विकासाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये सर्वांचे सहकार्य अपेक्षित असून त्यात बांधकाम व्यावसायिकांचा मोठा वाटा असणार आहे. किंबहुना नाशिकच्या सर्वांगीन विकासात त्यांचा मोठा हातभार लागणार आहे. मंत्रभूमी ते यंत्रभूमी, वाईन कॅपिटल म्हणून नावारूपाला आलेल्या नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागली असून या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्राच्या विकासालाही मोठी संधी असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी केले.
सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे दि. २१ ते २५ डिसेंबरपर्यंत सकाळी १० ते रात्री ८ असे पाच दिवसांचे ‘होमेथॉन प्रदर्शन’ नाशिक शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे गुरूवार (दि.२१) रोजी अत्यंत थाटात उद्घाटन संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदिप कदम, नाशिक महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, एनएमआरडीएचे आयुक्त सतीश खडके, पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे, बँक ऑफ महाराष्ट्रचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी.बी.सिंग, एलआयसी हौसिंगचे अमोल गायके, आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर नरेडको नाशिकचे अभय तातेड, नरेडको सचिव सुनील गवादे, होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर , होमेथॉनचे सह समन्वयक शंतनु देशपांडे, भूषण महाजन, प्रदर्शनाचे प्रायोजक व दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे, ललित रूंग्ठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ललित रुंगठा आदींसह मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे म्हणाले की, नाशिकचे पर्यावरण अत्यंत उत्कृष्ठ आहे. नाशिकचा विकास झपाटयाने होत आहे. परंतू केवळ घरे बांधून होणार नाही तर येथे उद्योग वाढले पाहिजे उद्योग वाढला तर रोजगार वाढेल, रोजगार वाढला तर ग्राहकांची क्रय शक्ती वाढेल आणि यातूनच रिअल इस्टेट क्षेत्राला बुस्ट मिळेल. मंत्रभूमी ते यंत्रभूमी असा नाशिकचा आजवरचा प्रवास राहीला आहे. नाशिकचे हवामान, उत्तम कनेक्टिव्हिटी आणि आल्हाददायक वातावरण यामुळे नाशिकची वाटचाल आता वेलनेस सिटीकडे होऊ लागल्याचे ते म्हणाले. कोणत्याही शहराचा विकास होत असतांना तो सुनियोजित पध्दतीने व्हायला हवा याकरीता आपल्या प्रयत्न करणे गरजेचे आहे. शासनामार्फत राबविल्या जाणार्या योजनांबाबत बोलतांना त्यांनी ई-हक्क प्रणाली, ई-सात बारा, ई-फेरफार या योजनांबाबत माहिती देतांना या सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. आगामी कुंभमेळ्याचे नियोजन आतापासूनच सुरू झाले असून या माध्यमातून शहर विकासाला निश्चितच हातभार लागेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
शिमला येथील विभागीय आयुक्त संदिप कदम यावेळी म्हणाले की, देशाच्या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राचा महत्वाचा वाटा आहे. आज देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात बांधकाम क्षेत्राचा वाटा हा ७ टकके आहे तो पुढील तीन ते चार वर्षात १० ते १२ टक्क्यांपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तरीही चीनपेक्षा हे प्रमाण कमी असल्याचे त्यांनी आकडेवारीवरून स्पष्ट केले. घर म्हणजे केवळ डोक्यावर छत असणे असे नव्हे तर आता घर घेण्याबाबत ग्राहकांची संकल्पना बदलत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याचे काम आता बांधकाम व्यावसायिकांना करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक शहराच्या विकासाबाबत आनंद व्यक्त करतांना आजही नाशिकमध्ये क्वॉलिटी ऑफ लाईफ बघायला मिळते असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना मविप्र समाज संस्थेचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे म्हणाले की, नाशिकचे महत्व वाढत आहे. या शहराच्या सुनियोजीत विकासासाठी बांधकाम व्यावसायिकांची भूमिका महत्वपूर्ण आहे. देशात सर्वाधिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक असलेले नाशिक हे एकमेव शहर आहे. क्वॉलिटी सिटी म्हणून नाशिकची निवड करण्यात आली आहे. शहराच्या विकासात नरेडकोची भूमिकाही महत्वाची असून या प्रदर्शनाच्या माध्यमातून एकाच छताखाली सर्व प्रकारचे घरांचे पर्याय उपलब्ध करून दिल्याबंददल त्यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी या ग्रँड आयोजनाबाबत नरेडकोचे विशेष कौतुक केले. नागरिकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम नरेडकोच्या माध्यमातून होत आहे ही खुप मोठी गोष्ट असून नाशिकचे एकूणच वातावरण पाहता नाशिकमध्येच स्थायिक होण्याची इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
एनएमआरडीएचे आयुक्त सतीश खडके म्हणाले की, नरेडकोच्या माध्यमातून घराचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच सर्वसामान्यांना परवडणारी घरे या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहेत. नाशिकमध्ये यापूर्वी काम करण्याचा योग आला नाशिक झपाटयाने बदलते आहे. गगनचुंबी इमारती येथे उभ्या राहत आहेत. एनएमआरडीच्या अंतर्गत ६ तालुके आणि २७०० किलोमीटर क्षेत्राचा विकास आराखडा बनविण्याचे काम सुरू झाले आहे. महानगर क्षेत्रात नगरविकास योजनेच्या माध्यमातून ५० एकर क्षेत्रावर इंटिग्रेटेड टाउनशिप उभारण्याची संधी आता नाशिकमध्येही निर्माण होणार आहे. त्यामुळे नाशिक आता विकासाची नवनवी शिखरं गाठत असल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी बोलतांना मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे म्हणाले की, सर्वसामान्यांना घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी होमेथॉनच्या माध्यमातून नरेडकोने बळ दिले आहे. नाशिकचे वातावरण येथील संस्कृती, पर्यावरण यामुळे नाशिककडे लोकांचा कल वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी मुद्रांक विभागाने १ लाख ४१ हजार दस्त नोंदणी केली या माध्यमातून १ हजार ५० कोटींचा महसूल प्राप्त झाला. यंदा दिड लाख दस्त नोंदणीचे उदिदष्ट असून या माध्यमातून १७५० कोटींचा महसूल प्राप्त होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रास्ताविकास नरेडकोचे अध्यक्ष अभय तातेड यांनी नरेडको संस्थेविषयी माहिती दिली. तर नरेडकोचे सचिव सुनिल गवादे यांनी नरेडकोच्या कार्याबाबत माहिती देतांना विशेष करून महारेरा संदर्भात बांधकाम व्यावसायिकांना येणारया अडचणी सोडविण्यासाठी विशेष प्रतिनिधींची तसेच वकिलांची नियुक्ती केल्याचे त्यांनी सांगितले. महारेराच्या नियमांबाबत सर्व सभासदांना सातत्याने अवगत केले जाते. आज सुमारे ४५ हजार रेरा नोंदणी करण्यात आली आहे यात ४५०० नोदंणी ही नाशिकमधून झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात सातत्याने होणारे बदल याबाबत सदस्यांना वेळोवळी तज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात या आयोजनामागील भूमिका विशद करतांना सांगितले, नाशिक शहराचा चौैफेर विकास होत असून औद्योगिक विकास, कृषी विकास, दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होत आहे. या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकही वाढत आहे. नाशिककरांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नरेडकोच्यावतीने होमेथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून येथे १५ लाख ते १२ कोटींपर्यंतची घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच प्रदर्शनात बुकिंग करणारयांना एक चांदीचे नाणेही भेट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास नरेडको वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर, क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजुभाई ठक्कर, महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, आदींसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती अॅडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित यांनी केले. होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर,सह समन्वयक शंतनू देशपांडे,भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह भाविक ठक्कर, ,प्रशांत पाटील,पुरुषोतम देशपांडे,राजेंद्र बागड,अश्विन आव्हाड,अविनाश शिरोडे,,शशांक देशपांडे,नितिन सोनवणे,मयूर कपाटे,उदय घुगे, अभय नेरकर, आदी प्रयत्नशील आहेत.आभार भूषण महाजन यांनी मांडले
पहिल्याच दिवशी १८ फ्लॅटचे बुकिंग
प्रदर्शनाचे औपचारिक उदघाटन सायंकाळी ५ वाजता करण्यात आले मात्र सकाळी १० वाजेपासूनच हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे १० हजार नागरिकांनी भेट दिली. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी १८ फ्लॅट, ४ शॉप, ८ प्लॉटचे बुकिंग करण्यात आले. या सर्व ग्राहकांना नरेडकोच्यावतीने चांदीचे नाणे भेट देण्यात आले.
अभिनेत्री प्रार्थना बेहरेची आज प्रकट मुलाखत
याप्रदर्शनाची ब्रँड अँबेसेडर म्हणून सुप्रसिध्द अभिनेत्री प्रार्थना बेहरे असून या शुक्रवार (दि.२२ ) रोजी सायंकाळी ५:३० वाजता ती प्रदर्शनाला भेट देणार असून यावेळी नंदन दीक्षित आणि किशोरी किणीकर हे प्रार्थना बेहरेची प्रकट मुलाखत घेणार आहे. त्यामुळे त्यांना ऐकण्याची संधी नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे.
मुंबई, पुण्यासह विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग केवळ नाशिकच नव्हे तर मुंंबई, पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तसेच विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार असून नाशिकसोबतच मुंबई, पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी या निमित्ताने नाशिककरांना मिळणार आहे.