नाशिक,१२ डिसेंबर २०२२- नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको) तर्फे २२ ते २५ डिसेंबरपर्यंत गंगापूररोड वरील डोंगरे वसतिगृह येथे आयोजित होमथॉन प्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू झाली असून यादृष्टीने स्टॉल धारकांच्या प्रतिनिधींसाठीचे प्रशिक्षण शिबीर शंकराचार्य संकुलात पार पडले. प्रमुख प्रेरक वक्ते केतन गावंड यांनी आपल्या खास शैलीत या सर्वांना मार्गदर्शन केले.
घरकुल बूक करण्यासाठी येणारा ग्राहक हा आपल्या आयुष्याची सर्व पुंजी लावीत असतो.त्यामुळे या ग्राहकांशी कसे संभाषण करावे,त्यांच्याशी कसे वागावे आणि त्यांना घर घेण्यासाठी प्रवृत्त करतांना त्यांच्या शंकांचे कसे निरसन करावे याबाबत गावंड यांनी या प्रतिनिधींना संबोधित केले.
प्रदर्शनासाठी हॉस्पिटॅलिटी हा प्रयोग नरेडको प्रथमच अमलात आणत असून घर खरेदीसाठी येणाऱ्यांचे अतिथी देव भव सारखे स्वागत करून त्यांचे खास अगत्य केले जाईल,एखाद्या प्रदर्शनाच्या १० दिवस आधी स्टॉल धारकांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी प्रयत्न करणारी नरेडको ही पहिलीच संस्था आहे. या पुढे ही बांधकाम व्यावसायिक प्रतिनिधींना जर मार्गदर्शनाची गरज भासल्यास नरेडको दर तीन महिन्यांनी अशा अभिनव शिबिराचे आयोजन करेल असे प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.
नाशकात अनेक प्रदर्शन होत असतात परंतु स्टॉल धारकांना अशा प्रकारे मार्गदर्शन करणारी नरेडको ही पहिलीच संस्था आहे.या शिबिराचा २०० हुन अधिक प्रतिनिधींनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेडकोचे सेक्रेटरी सुनील गवादे यांनी केले,परिचय भाविक ठक्कर यांनी करून दिला तर आभार पुरुषोत्तम देशपांडे यांनी मांडले याप्रसंगी व्यासपीठावर सुनील गवादे ,शंतनू देशपांडे जयेश ठक्कर,मर्जीन पटेल तसेच कार्यक्रमास नितीन पाटील,मयूर कपाटे ,उदय घुगे,अविनाश आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.