नर्तनरंग कथक नृत्य अकादमी तर्फे २१ डिसेंबरला ‘कृष्ण धून’ कार्यक्रमाचे आयोजन
मुंबईच्या ग्लोबल हॉस्पिटलचे डॉ. भरत शहा आणि डॉ. मिता शहा यांची विशेष उपस्थिती
नाशिक,२० डिसेंबर २०२२ – नर्तनरंग कथक नृत्य अकादमी ही नाशिकमध्ये कथक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी अग्रगण्य संस्था ! दर वर्षी आपण या संस्थेच्या वार्षिक कार्यक्रमांचा आस्वाद घेत असतो. २१ डिसेंबरला “कृष्णधून “हा सुरेख कार्यक्रम आयोजित केला आहे. सायंकाळी ५.३० वाजता कालिदास कलामंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमात रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे.
कथक या शास्त्रीय नृत्याचा उगम उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ येथे झाला असे म्हणतात. उत्तर हिंदुस्थान आणि कृष्णाचे तर फार जवळचे नाते आहे. कृष्ण आणि गोपी यांच्या रास नृत्यातून कथक नृत्याचा प्रारंभ झाला असे काही जण ठामपणे म्हणतात, तर नटवर कृष्णाच्या नावावरून या नृत्याचे पूर्वीचे नाव “नटवरी नृत्य” होते असेही प्रचलित आहे. थोडक्यात, कथक आणि कृष्ण यांचे जणू आदिम नाते आहे असे म्हणायला हरकत नाही.
यावर्षी, नर्तनरंग कथक नृत्य अकादमी कृष्णावर आधारित कथक नृत्यातील पारंपरिक रचना सादर करणार आहेत. ज्यात भजन, स्तुती, होरी, कीर्तन अशा वैविध्यपूर्ण बंदिशींचा समावेश आहे. तसेच,पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांना आदरांजली म्हणुन त्यांनी संगीतबद्ध केलेली “श्रीकृष्ण नीरतत” ही विशेष प्रस्तुती होणार आहे. अकादमीच्या ज्येष्ठ शिष्या ती सादर करतील. या कार्यक्रमात अकादमीच्या अगदी प्रथम वर्षापासूनच्या विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे नृत्यदिग्दर्शन, अकादमीच्या संचालिका प्रेषिता पंडित यांनी केले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून, ग्लोबल हॉस्पिटल मुंबई येथून डॉ. भरत शहा आणि डॉ. मिता शहा उपस्थित राहणार असून, गुरूवर्य विद्या देशपांडे यांचे गुरुपूजन संपन्न होणार आहे.
कार्यक्रमासाठी संगत कलाकार लाभले आहेत-
संवादिनी आणि गायन- पुष्कराज भागवत.
तबला-कल्याण पांडे.
बासरी-समृद्ध कुटे.
निवेदन डॉ स्नेहा रत्नपारखी आणि प्रथमेश पाठक आपल्या खुमासदार शैलीत करणार आहेत.
हा कार्यक्रम दिनांक २१ डिसेंबर २०२२रोजी सायंकाळी ५.३० वाजता कालिदास कलामंदिर येथे होणार आहे. कार्यक्रमात रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. तरी, नाशिककरांनी या सोहळ्याचा निखळ आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे!