नाशिक,दि. १९ जुलै २०२३-कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपा मुळे नाशिक सिटीलिंक बस सेवा दुसऱ्या दिवशी ही ठप्प झाली आहे.कामगार संघटना आणि प्रशासन यात कोणताही तोडगा निघाला नसल्याने नाशिककरांना हाल सहन करावे लागणार आहेत. ठेकेदारांकडून वाहकांना वेतन दिले जात नाही, दोन महिन्यांचे वेतन रखडल्याने वाहकांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बससेवा बंद असल्याने नाशिककरांचे प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन श्रमिक कामगार सेनेमार्फत पुकारण्यात आले आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे.
ठेकेदाराने दोन महिन्यांचे वेतन न दिल्याने नाशिक महापालिकेची परिवहन सेवा असलेल्या सिटी लिंकच्या वाहकांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारले असून आजही सलग दुसऱ्या दिवशी सिटीलिंक बस सेवा विस्कळीत झाली आहे. काल दिवसभर सिटीलिंक व्यवस्थापन आणि ठेकेदार कंपनीचे अधिकार यांच्या चर्चा होऊन ही तोडगा निघाला नसल्याने आज पुन्हा चालक वाहक यांनी काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.त्यामुळे नाशिक करण्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.गेल्या दीड वर्षांपासून नाशिक शहरात मनपाच्या माध्यमातून सिटीलिंक बस सेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र गेल्या पाच सहा महिन्यांपासून पगार वेळेवर मिळावा यासाठी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने आंदोलनं केली जात आहेत.
दरम्यान कालपासून कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं असून आजचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे नाशिक शहरातील प्रवासी बस सेवा विस्कळीत झाल्याने विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे मोठे हाल झाले आहेत.
कंपनीचे एकाच दिवसात ३० लाख रुपयांचं नुकसान
ठेकेदाराकडून वेतन मिळत नसल्याने याच वर्षी तब्बल चौथ्यांदा वाहकांना काम बंद पुकारावे लागले आहे. सिटीलिंकने वाहक पुरवण्याचा ठेका मॅक्स सेक्युरिटीज या कंपनीला दिला आहे. या कंपनीकडून ५०० वाहक पुरवण्यात आले आहेत. या ठेकेदारीने मागील दोन महिन्यांपासून वाहकांना वेतन दिले नसल्यामुळे मंगळवारी सकाळी संतप्त झालेल्या ५०० वाहकांनी संप पुकारल्याने शहरातील बस सेवेला ब्रेक लागला.
नाशिक शहरातील बससेवा सकाळपासूनच ठप्प झाल्याने शेकडो विद्यार्थी आणि नाशिककरांचे मोठे हाल झाले.राजकीय पाठबळ असलेल्या ठेकेदाराच्या कारभारामुळे सिटीलिंक ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचा वाहकांचा आरोप आहे. त्यातच आज दुसऱ्या दिवशी देखील एकही डेपोतून बस बाहेर पडू शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असताना सिटीलिंकमध्ये बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. त्यामुळे एकाच दिवसात कंपनीचे ३० लाख रुपयांचे नुकसान झाले तर प्रवाशांचे देखील हाल झाले.
वाहकांचे कोणतेही वेतन प्रलंबित नाही
सिटीलिंकचे महाव्यवस्थापक मिलिंद बंड म्हणाले की,सिटीलिंककडून वाहकांचे कोणतेही वेतन प्रलंबित नाही.एप्रिल महिन्यातील रक्कम ठेकेदारांनी इतर प्रलंबित कर भरण्यास वापरली,आता मे आणि जून महिन्याची बिले तसेच वाहकांचा पीएफ भरल्याच्या पावत्या सादर केलेल्या नाहीत प्रवाशांचे हाल होऊ नये,यासाठी बुधवारपासून तातडीने बस सेवा सुरु करण्याचे आदेश देण्यात आल्या असून तसे न केल्यास कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला होता, मात्र दुसऱ्या दिवशी देखील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे.त्यामुळे यावर लवकरात लवकर तोडगा काढून नाशिकची विस्कळीत बस सेवा सुरळीत करावी, अशी मागणी नाशिककरांकडून करण्यात येत आहे.