नाशिक,दि ४ जुलै २०२३ –कंत्राटी कामगारांनी पहाटे पासून सुरु केलेल्या संपामुळे नाशिकची सिटीलिंक बस वाहतूक सेवा पुन्हा ठप्प झाली असून अचानक केलेल्या संपा मुळे विद्यार्थी आणि चाकरमान्यांचे पुन्हा हाल सुरु झाले आहे.कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन ठेकेदाराने अद्याप न दिल्याने हा संप पुकारण्यात आला आहे.
गेल्या महिन्यातच या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते.त्यांना थकीत वेतन देण्याचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला त्यावेळी सलग २ दिवस बससेवा ठप्प होती. दोन दिवसात कंपनीचे जवळपास ३० लाखाचे नुकसान झाले होते. आता पुन्हा काम बंद आंदोलन कर्मचाऱ्यांनी घेतले आहे.कर्मचारी आक्रमक झाले आहेत.गेल्या आंदोलनावेळी झालेल्या बैठकीत कंत्राटदाराने सांगितले होते की, थकीत वेतन तातडीने अदा केले जाईल. मात्र, अद्यापही कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही.त्यामुळे त्यांचा संयम संपला आहे.
दररोज लाखो प्रवासी शहर बससेवेचा लाभ घेतात.खासकरुन सकाळच्या सुमारास शहराच्या विविध भागातून शाळेत जाणारे विद्यार्थी,महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी,सरकारी वा खासगी कार्यालयात जाणारे कर्मचारी, अंबड आणि सातपूर या औद्योगिक वसाहतीत जाणारे कामगार, नाशिकरोड रेल्वे स्टेशन येथे जाणारे प्रवासी आदी त्याचा लाभ घेतात.आजच्या या संपामुळे सर्वांचेच खुप हाल होत आहेत. महापालिका आयुक्तांनी पुढाकार घेऊन तातडीने हा संप मिटवावा आणि शहर बससेवा सुरू करावी,अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.