सरकारवाडा हद्दीतील गोळीबार प्रकरणातील आरोपीला धोंडेगाव जंगलातून अटक
गुन्हे शाखा अंबड पथकाची उत्कृष्ट कामगिरी

नाशिक, दि.९ नोव्हेंबर २०२५ – Nashik Crime News सरकारवाडा गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. गुन्हे शाखा अंबड पथकाने मोठ्या शिताफीने धोंडेगाव जंगल परिसरात सापळा रचून आरोपीला पकडण्यात यश मिळवले आहे. या कारवाईने नाशिक पोलिसांनी शहरातील गुन्हेगारीविरोधात पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.नाशिक शहरात वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक सुव्यवस्था टिकवण्यासाठी मा. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त, नाशिक शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा अंबड पथक सक्रियपणे काम करत आहे. त्याच मोहिमेचा एक भाग म्हणून ही उल्लेखनीय कारवाई करण्यात आली.
घडलेला प्रकार:(Nashik Crime News)
दि. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास सरकावाडा पोलीस ठाणे हद्दीत बेथेलनगर भागात सात ते आठ अज्ञात व्यक्तींनी एकत्र येऊन हातात कायते, चॉपर आणि दांडके घेऊन परिसरात दहशत माजवली. त्यांनी रिक्षा, दुचाकींच्या काचा फोडल्या तसेच घरांवर काचेच्या बाटल्या फेकल्या.या गोंधळात स्थानिक नागरिक मायकल भंडारी यांनी चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर आरोपींनी “कोठे लपला आहे हर्षद, तुझा आज गेमच करतो!” असे म्हणत गोळीबार केला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४२/२०२५ भा.दं.वि. कलम १०९, १८९(२), १९१(३), १९० तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५, ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणातील प्रमुख पाहीजे आरोपी लंबोदर विष्णु फसाळे (वय १८ वर्षे ५ महिने, रा. राजीव गांधी नगर, गोवर्धन गाव, गंगापूर, नाशिक) हा गुन्ह्यानंतर फरार झाला होता. दरम्यान, अंबड गुन्हे शाखेचे प्रभारी पोउनि. मोतीलाल पाटील यांना आरोपी धोंडेगाव जंगल परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली.
अभियान आणि अटक:
दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळपासूनच पथकाने धोंडेगाव जंगल परिसरात नदीकाठी सापळा रचला. दुपारी सुमारे २ वाजता आरोपी लंबोदर फसाळे नदीकाठी दिसताच पथकाने वेळीच कारवाई करून त्यास ताब्यात घेतले. पुढील चौकशीसाठी आरोपीला सरकारवाडा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहे.
यशस्वी कारवाईतील अधिकारी व कर्मचारी:
ही कारवाई मा. संदीप कर्णिक (पोलीस आयुक्त), मा. किरणकुमार चव्हाण (उप आयुक्त, गुन्हे), मा. संदीप मिटके (सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या यशस्वी मोहिमेत वपोनि. जग्विंदरसिंग राजपूत, पोउनि. मोतीलाल पाटील, श्रेपोउनि. दिलीप सगळे, सपोउनि. सुहास क्षिरसागर, तसेच पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, पोअं. भगवान जाधव, चारुदत्त निकम व महिला पोअं. सविता कदम यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली.या कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, नाशिक पोलिसांच्या दक्षतेमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होईल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.



[…] सरकारवाडा हद्दीतील गोळीबार प्रकरणात… […]