Nashik Dam Update:नाशिकचे गंगापूर धरण ८७ टक्के भरले 

जिल्ह्यातील ५ धरणे ५० टक्क्यांच्या खाली तर दोन शून्यावरच

0

नाशिक,दि.७ ऑगस्ट २०२३ – नाशिक शहरा सह जिल्ह्यातील अनेक तालुके अद्याप दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असले तरी नाशिकशहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने ऑगस्ट  महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गंगापूर धरण ८७ टक्के भरले आहे . गतवर्षींपेक्षा या धरणात  १३ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी जिल्ह्यातील बहुतांश धरणे तळाशीच आहेत.

राज्यामध्ये एकीकडे मान्सूनचा दमदार  हजेरी लावली असली तरी नाशिक जिल्ह्याला मात्र अद्यापही मुसळधार आणि दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे. सुदैवाने गंगापूर, नांदूरमध्यमेश्वर, पालखेड, पुणेगाव, केळझर, कडवा या धरणात चांगला जलसाठा उपलब्ध झाला आहे. परंतु उर्वरित धरणांना चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

घोटी, इगतपुरी तालुक्यात सातत्याने पाऊस सुरू असल्याने दारणा धरण समूहाच्या धरण साठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. जोरदार पावसामुळे भावली पाठोपाठ इतरही धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. सलग पाचव्या वर्षीही हे धरण भरल्याने परिसरात समाधान व्यक्त होत आहे.

पावसाळा  सुरू होऊन सव्वादोन महिने उलटूनही जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरू शकली नाहीत. ६५ हजार ६६४ दशलक्ष घनफूट एवढी या धरणांची साठवून क्षमता असली तरी सद्यस्थितीत या धरणांमध्ये ४५ हजार ३३५ दशलक्ष घनफूट म्हणजे एकूण क्षमतेचे ६१ टक्केच पाणीसाठा आहे.

गतवर्षी याच कालावधीत ५५ हजार ७२९ दशलक्ष घनफळ म्हणजे ८५ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध होता.धक्कादायक म्हणजे अजूनही तिसगाव,नागासाक्या,माणिकपुंज ही धरणे कोरडीच असून त्यामध्ये पाणीच उपलब्ध होऊ शकले नाही, जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण अशी ओळख असलेले गिरणा धरण गतवर्षी आत्तापर्यंत ९१ टक्के भरले होते, यांना त्यात केवळ ३५ टक्केच पाणी आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८७ टक्के पाणीसाठा सध्या आहे.कश्यपी धरणात ५२ टक्के,गौतमी धरणात ५४ टक्के,पालखेड धरण ७१ टक्के, पुणेगाव धरणात ९२ टक्के पाणीसाठा आहे. तर दारणा धरणामध्ये ९३ आणि भावली १०० टक्के एवढा पाणीसाठा आहे, वालदेवी १०० टक्के, नांदूरमध्यमेश्वर ९२ टक्के, हरणबारी १०० टक्के, केळझर १०० टक्के असा धरणसाठा उपलब्ध आहे.

तर दारणा धरणातून १२५० क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.भावली डॅममधून १३५ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.वालदेवी ६५ क्युसेक,कडवा ३३६ क्युसेक, नांदुरमध्यमेश्वर १२११ क्युसेक, चणकापूर १४६ क्युसेक, हरणबारी ८४६ क्युसेक, केळझर १९८ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.