नाशिक दि. २३ फेब्रुवारी २०२३ – नाशिकच्या मनोरंजन क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. मंगेश चव्हाण यांच्या निर्मितीतून साकारलेली, डॉ. अभिजित सावंत लिखीत आणि सोनू अहिरे दिग्दर्शित ‘इनसाईड द शाडो’ या लघुचित्रपटाची थेट राष्ट्रीय पातळीवरील इंडियन इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाली आहे.
नाशिकच्या मनोरंजनक्षेत्राने आपले नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे. येथील कलाकारांनी ‘इनसाईड द शाडो’ याशॉर्ट फिल्मच्या मध,माध्यमातून एक सामाजिक विषय घेऊन मनोरंजनातून समाज जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. लहान मुलांच्या अपहरणाच्या घटना, पालकांची सतर्कता, पोलीस प्रशासनाची भूमिका आणि अशा अप्रिय घटना रोखण्यासाठी घ्यावयाची आवश्यक ती काळजी आदी महत्वाच्या मुद्यांकडे हा लघुचित्रपट लक्ष वेधतो.
यामध्ये रोचीता चव्हाण प्रमुख भूमिकेत असून, दिलीप वालकर, सुधीर सावंत, मकरंद शिंदे, भिकाजी पवार, वैभव पवार यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत. राकेश तिवारी यांनी त्यांच्या चित्रीकरणातून या लघुचित्रपटात जीव ओतला आहे. निकेश श्रीवास्तव यांच्या कला कौशल्याने प्रत्येक पात्र अक्षरश: गंभीर आणि तितकेच बोलके झाले आहे.
मनोरंजनातून समाजाचे उद्बोधन, समाजापर्यंत जाणारा उत्तम संदेशपण कुठेही तोल ढळू न देता कमी वेळात प्रेक्षकांच्या मनापर्यंत भिडणे ही किमया काही मोजक्याच प्रयोगांना साधता येते. हे आव्हान ‘इन साईड द शाडो’ ने अचूक पेलले आहे. या लघुचित्रपटाने राष्ट्रीय पातळीवर महोत्सवात आपले स्थान निश्चित केले आहे, ही बाब नाशिकच्या मनोरंजन क्षेत्रासाठी अभिमानाची आहे.