नाशिक, दि. १५ जून २०२५ – Nashik Election News नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड घडत असून,शिवसेना (ठाकरे गट) कडून पक्षातून हकालपट्टी झाल्यानंतर सुधाकर बडगुजर(Sudhakar Badgujar joins BJP) यांच्या भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यापूर्वी स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला जोरदार विरोध दर्शवला होता, मात्र आता वरिष्ठांच्या सूचनेनंतर तो विरोध मावळला आहे.
भाजपचे नाशिक शहराध्यक्ष सुनील केदार यांनी स्पष्ट केले की, “वरिष्ठांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य आहे. स्थानिक पातळीवर मतभेद असतात, पण पक्षवाढीच्या दृष्टीने निर्णय वरच्या पातळीवर होतात.”
कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही यावर ठाम भूमिका घेत, “जर आपण त्यांना पक्षात घेतले नाही, तर ते दुसऱ्या पक्षात जातील,” असे मत बैठकीत मांडले होते. त्यामुळे सुधाकर बडगुजर यांना पक्षात प्रवेश देण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे.
गणेश गीते यांची भाजपमध्ये घरवापसी ?(Nashik Election News)
दरम्यान, नाशिकच्या राजकारणातील आणखी एक चर्चेचा विषय म्हणजे गणेश गीते यांची भाजपमध्ये घरवापसी. यापूर्वी त्यांनी भाजपमधून नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपचे आमदार राहुल ढिकले यांनी पराभूत केले होते.
आता पुन्हा एकदा गीते यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगत असून, सुनील केदार यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याही प्रवेशाला मुहूर्त लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
राजकीय समीकरणांची नवी जुळवाजुळव
नाशिक जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये इनकमिंग लाट दिसून येत आहे. पक्षवाढीच्या उद्देशाने स्थानिक मतभेदांवर मात करत पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असल्याचे स्पष्ट होत आहे.