गोरेगावच्या धर्तीवर नाशिकमध्ये साकारणार भव्य फिल्म सिटी – छगन भुजबळ

नाशिक चित्रनगरीसाठी गती! अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली निर्णायक बैठक, महसूल विभागास जमीन हस्तांतरणाचे आदेश

0

नाशिक, दि. ७ ऑक्टोबर २०२५ Nashik Film City नाशिक चित्रनगरी प्रकल्पाला अखेर निर्णायक वळण मिळाले आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील ४७ हेक्टर जमीन सांस्कृतिक कार्य विभागाला हस्तांतरित करण्याचे आदेश महसूल विभागाला देण्यात आले. या निर्णयामुळे “नाशिक फिल्म सिटी” प्रकल्पाला नवसंजीवनी मिळाली असून, नाशिककरांच्या आशा पुन्हा एकदा उजळल्या आहेत.

या बैठकीला राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव सौरभ विजय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी उपस्थित होते.

नाशिककडून लाईन प्रोड्युसर अमित कुलकर्णी,शाम लोंढे, राजू फिरके, प्रसाद राहणे, अंबादास खैरे आणि या चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी या बैठकीत सहभाग घेतला.

🎬 चित्रनगरी प्रकल्पाला नवीन गती(Nashik Film City)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “नाशिक चित्रनगरीसाठी प्रस्तावित जमीन सांस्कृतिक कार्य विभागाकडे तातडीने द्यावी.”त्यांनी सांगितले की, या प्रकल्पाचा फायनान्शिअल वायबिलिटी आणि गॅप अनालिसिस करण्यासाठी KPMG या तज्ञ सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात आली असून, नोव्हेंबर २०२५ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, “इगतपुरी परिसर नैसर्गिकदृष्ट्या सुंदर असून, समृद्धी महामार्गामुळे मुंबईचे अंतर कमी झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी चित्रनगरी साकारण्यास कोणतीही अडचण नाही. लवकरच येथे भव्य चित्रपटनगरी आणि अम्यूजमेंट पार्क साकारले जाईल.”

📽️ २००९ पासून सुरू असलेली कहाणी आता नवा अध्याय

नाशिकमध्ये चित्रनगरी उभारण्याची कल्पना २००९ साली नाशिक विभाग विकास कार्यक्रमांतर्गत मांडण्यात आली होती. त्यानंतर विविध सरकारांच्या काळात या प्रकल्पावर अनेक बैठकांचे सत्र झाले.

सांस्कृतिक मंत्रिपदावर बदल झाले संजय देवतळे, विनोद तावडे, अमित देशमुख, सुधीर मुनगंटीवार आणि आता आशिष शेलार पण प्रकल्पाचा शेवट नेहमीच कागदावर राहिला.

विनोद तावडे यांच्या कार्यकाळात मिटकॉन कंपनीने तयार केलेल्या अहवालात हा प्रकल्प “आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य” असल्याचे नमूद केले होते. मात्र आता या अहवालाचे पुन्हा विश्लेषण करून नव्या आर्थिक व्यवहार्यता अभ्यासानंतर पुढील निर्णय होणार आहे. त्यामुळे नाशिक फिल्म सिटीचा “सीझन २” सुरू झाल्याचे चित्रपटसृष्टीत म्हटले जात आहे.

🏞️ इगतपुरीचा निसर्ग चित्रपटसृष्टीसाठी आदर्श ठिकाण

मुंढेगाव (ता. इगतपुरी) येथील सर्वे क्रमांक ४५९ मधील ५४.५८ हेक्टरपैकी ४७.३९ हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. या परिसरातील डोंगराळ निसर्ग, धबधबे, हिरवळ आणि मुंबई-ठाण्याची जवळीक यामुळे इगतपुरी चित्रिकरणासाठी उत्तम ठिकाण ठरत आहे.

नाशिकच्या स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार -अमित कुलकर्णी

सध्या नाशिक परिसरात तीन मराठी मालिका आणि दोन हिंदी चित्रपटांचे शूटिंग सुरू असून, स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत आहे.लाईन प्रोड्युसर अमित कुलकर्णी म्हणाले, “नाशिकमध्ये चित्रीकरणासाठी आवश्यक सर्व सुविधा आहेत. कलाकारांना प्रवासास कमी वेळ लागतो, तसेच लोकेशन्स, उपकरणे आणि तांत्रिक मदत सहज उपलब्ध होते.

” स्थानिकांना आनंद स्वप्न साकारतेय!-शाम लोंढे 

नाशिकचे सुप्रसिद्ध वास्तुविशारद शाम लोंढे, जे गेल्या दोन दशकांपासून या प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहेत, म्हणाले,“चित्रमहर्षी दादासाहेब फाळकेंच्या जन्मभूमीत चित्रनगरी व्हावी हे स्वप्न आता साकारते आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे हा प्रकल्प वास्तवात उतरेल, याचा मला अभिमान आहे.”

💡 नाशिक फिल्म सिटीमुळे मिळणारे फायदे

स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी

पर्यटन, हॉटेल व्यवसाय, ट्रान्सपोर्ट क्षेत्राला चालना

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी पर्यायी शूटिंग डेस्टिनेशन

मुंबईवरील ताण कमी होऊन नव्या सांस्कृतिक केंद्राची निर्मिती

सोळा वर्षांनंतर नाशिक चित्रनगरीच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाली आहे. नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या KPMG च्या अहवालानंतर हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

गोरेगावच्या चित्रनगरीप्रमाणेच, “इगतपुरी फिल्म सिटी” नाशिकच्या सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाचे नवे पर्व ठरू शकते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!