नाशिक-बेंगळुरू विमानसेवेचा शुभारंभ :पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद 

असे आहे वेळापत्रक :आता २३२ आसनी विमान

0

नाशिक,दि,११ सप्टेंबर २०२४ – नाशिकच्या ओझर विमानतळावरून नाशिक-बेंगळुरू विमानसेवा अखेर काल मंगळवारपासून (दि.१०) सुरु करण्यात आली.विमानसेवेला पहिल्याच दिवशी भरभरून प्रतिसाद मिळाला. या विमानातून ३६७ प्रवाशांनी उड्डाण केले. तब्बल ८५ टक्के प्रवाशांचा प्रतिसाद लाभल्याने कंपनीने १८० ऐवजी २३२ आसनी विमानाद्वारे सेवा देण्याचे निश्चित केले आहे.नाशिक-बेंगळुरू विमानसेवेमुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.नाशिक दक्षिण भारताशी जोडले जाणार असल्याने,नाशिकमध्येही बेंगळुरू येथून गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.

नाशिकच्या ओझर विमानतळावरून ‘इंडिगो’कंपनीकडून नवीन दिल्ली, अहमदाबाद, नागपूर, हैदराबाद, गोवा व इंदूर या सहा शहरांना जोडली जाणारी नियमित सेवा दिली जात आहे. नाशिक-बेंगळुरू विमानसेवेसाठी निमा, आयमा, महाराष्ट्र चेंबर, तान यासह इतर औद्योगिक, व्यापारी संघटनांकडून या सेवेसाठी पाठपुरावा केला जात होता. अखेर कंपनीने काल १० सप्टेंबरपासून सेवेला हिरवा कंदील दाखविला होता. दरम्यान, मंगळवारपासून (दि.१०) ही सेवा सुरू झाली असून, मंगळवारी दुपारी २.३० वाजता बेंगळुरू येथून निघालेले विमान सायंकाळी ४.२० वाजता नाशिकला पोहोचले. त्यातून १८९ प्रवाशांनी प्रवास केला. तर, सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी नाशिकहून उड्डाण घेतलेले विमान ६ वाजून ३० मिनिटांनी बेंगळुरूला पोहोचले. यावेळी १८७ प्रवाशांनी प्रवास केला. सेवेच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३६७ प्रवाशांनी प्रवास केल्याने, कंपनी व्यवस्थापनाने समाधान व्यक्त केले. या सेवेमुळे नाशिकच्या उद्योग, व्यापार क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे.

आता २३२ आसनी विमान
नाशिक-बेंगळुरू विमानसेवेची मागणी लक्षात घेता, या सेवेला भरघोस प्रतिसाद मिळेल, अशी कंपनीला अपेक्षा आहे. त्यानुसार कंपनीने १८० एवजी २३२ आसनी विमान उपलब्ध करून दिले आहे. पुढील दोन महिन्यांसाठी याच विमानद्वारे सेवा दिली जाणार आहे. प्रारंभी ‘इंडिगो’ने एथ्री टू ०० क्रमांकाचे १८० आसनी विमान निश्चित केले होते. मात्र, प्रवाशांकडून बुकिंगला मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे कंपनीने या सेवेसाठी एथ्री टू ०१ क्रमांकाचे २३२ आसनी विमान उपलब्ध करून दिले आहे.

असे आहे वेळापत्रक
बेंगळुरू येथून दररोज दुपारी २.३० वाजता विमान उड्डाण घेऊन ते सायंकाळी ४.२० वाजता नाशिकला पोहोचेल. हे विमान सायंकाळी ४.५० वाजता नाशिकहून भरारी घेऊन ६.३० वाजता बेंगळुरूला पोहोचेल.

नाशिक-बेंगळुरू विमानसेवेमुळे व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्राला मोठा लाभ होणार आहे. नाशिक दक्षिण भारताशी जोडले जाणार असल्याने, नाशिकमध्येही बेंगळुरू येथून गुंतवणूक येण्याची शक्यता आहे.
मनीष रावल, एव्हीएशन कमिटी, निमा

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.