Nashik : सातपूर MIDC परिसरात बिबट्याचा मुक्त संचार :नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण

सीसी टीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद (व्हिडीओ बघा)

0

नाशिक –नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्या दिसून आला असून मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास वसाहतीतील निलकमल मार्बल कंपनीच्या मागील रहिवासी भागात आज पहाटे बिबट्या निदर्शनास आला आहे. कंपनीच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या कैद झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन दिवसांपूर्वी एबीबी सर्कल परिसरात शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सिटी सेंटर मॉल परिसरात मध्यरात्री बिबट्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला होता.तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.आता या बिबट्याचा वावर सातपूर औद्योगिक वसाहतीत असल्यामुळे कामगारांसह उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खासकरून मध्यरात्री शिफ्ट संपल्यानंतर शेकडो कामगार घराकडे परततात तर अनेक कामगार रात्रपाळीसाठी कंपनीत येत असतात. अशा स्थितीत बिबट्याचा वावर धोकादायक बनला आहे.

आज सातपूर औद्योगिक वसाहतीत बिबट्या दिसताच रहिवाशांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी बिबट्याचा शोध घेत आहे. मात्र, तो सापडत नसल्याने नागरिक दहशतीत आहेत. यापूर्वीदेखील अनेकदा नाशिक शहर व परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. तेव्हा प्रशासनाने जंगली प्राणी शहरात येऊ नये म्हणून काही उपाययोजना केल्या होत्या. अशात आता शहरात आलेला बिबट्या नेमका कुठून आला, याचा शोध वनविभाग घेत आहे.

नागरीकांना रात्री घराबाहेर न पडण्याचे आवाहन 

शहराचा मध्यवर्ती भाग आणि नेहमी वर्दळ असणाऱ्या सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटी, एबीबी सर्कल या भागात मध्यरात्री बिबट्या आढळून आला. त्यामुळे गुरुवारी दिवसभर वनविभागाच्या पथकाने एबीबी सर्कल, सिटी सेंटर मॉल या परिसरातील झाडांमध्ये बिबट्याचा शोध घेतला. तसेच, परिसरातील रहिवाशांनादेखील रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, अशा सूचना दिल्या. अशातच आज हा बिबट्या या परिसराला लागूनच असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीत आढळून आला आहे. त्यामुळे वन विभागाने आता या भागात बिबट्याच्या शोधासाठी मोर्चा वळवला आहे.

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.