“देव द्या, देवपण घ्या” उपक्रमात सहभागी व्हावेअभिजीत खांडकेकर यांचे आवाहन
गोदावरी स्वच्छतेसाठी युवकांचा पुढाकार
नाशिक, दि. ३० ऑगस्ट २०२५ – Nashik Ganeshotsav गणेशोत्सवाच्या अनंत चतुर्दशी निमित्त गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सुरू असलेल्या “देव द्या, देवपण घ्या” या स्तुत्य उपक्रमाचे यंदा पंधरावे वर्ष असून, या मोहिमेत नाशिककरांनी उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन अभिनेते अभिजीत खांडकेकर यांनी केले.
सुविचार मंचच्या पुढाकाराने गेल्या १५ वर्षांपासून हा उपक्रम राबवला जात असून, यंदाही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत. माहितीपत्रकांचे प्रकाशन अभिजीत खांडकेकर यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्रनाना पगार यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या वेळी प्रथितयश डॉ. राजेंद्र आभाळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रदूषण रोखण्यासाठी युवकांची कंबर कसली(Nashik Ganeshotsav)
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती व त्यावरचे रासायनिक रंग यामुळे गोदावरी नदीचे प्रदूषण गंभीर स्वरूपात वाढते. या पार्श्वभूमीवर सुविचार मंचतर्फे युवकांनी घराघरात माहितीपत्रके पोहोचवून पर्यावरणपूरक विसर्जनाचे महत्त्व पटवून देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
युवकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातूनही व्यापक जनजागृती केली जात आहे. “युवकांचा असा विधायक सहभाग कौतुकास्पद असून, त्यांच्या माध्यमातून गोदावरीचे प्रदूषण नक्कीच थांबवता येईल,” असे मत अभिजीत खांडकेकर यांनी व्यक्त केले.
पाच दिवस व सात दिवसांच्या गणेशोत्सवातील मूर्ती संकलनाची व्यवस्था केली जाणार असून, कार्यकर्ते अनंत चतुर्दशी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत चोपडा लॉन्स जवळील गोदापार्क येथे मूर्ती स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
“देव द्या, देवपण घ्या ! हा उपक्रम नाशिककरांनी आपला समजून स्वीकारावा. गेल्या १४ वर्षांपासून मिळालेल्या प्रतिसादामुळेच उपक्रम पंधराव्या वर्षात पदार्पण करत आहे,” असे संयोजक आकाश पगार यांनी सांगितले.
उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्ते
या प्रकाशन सोहळ्याला अभिनेते अभिजीत खांडकेकर, ॲड. रविंद्रनाना पगार, डॉ. राजेंद्र आभाळे यांच्यासह आकाश पगार, सागर बाविस्कर, जीत मोरे, राहुल अढांगळे, रामराव पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविक आकाश पगार यांनी केले, सूत्रसंचालन सागर बाविस्कर यांनी तर आभार प्रदर्शन विशाल गांगुर्डे यांनी केले. मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्वच्छ गोदावरीकडे वाटचाल नदी ही शहराचे जीवन आहे. तिचे प्रदूषण थांबविणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असल्याचे संदेश या उपक्रमातून दिले जात आहेत. युवकांनी घेतलेला पुढाकार आणि नागरिकांचा सहकार्यभाव यामुळे गोदावरीच्या स्वच्छतेसाठी हा उपक्रम महत्वाचा टप्पा ठरत आहे.उपक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२१५६३५५५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.