नाशिक,दि, ६ एप्रिल २०२५ – श्री राम नवमी नंतर दोन दिवसांनी येणाऱ्या कामदा एकादशीच्या दिवशी श्री राम आणि श्री गरुड रथयात्रेचे आयोजन श्री काळाराम संस्थान तर्फे करण्यात येत असते.संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून लाखो भाविक या यात्रेचा लाभ घेऊन प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी गोदावरी नदीच्या काठी दुतर्फा हजेरी लावत असतात.
यावेळी परंपरेनुसार श्री गरुडरथाचे शहरातील पारंपरिक मार्गावरुन भाविकांना दर्शन घडवून आणण्याची प्रमुख जबाबदारी गरुड रथाचे वंश परंपरागत मानकरी बाळंभट दीक्षितांचे वारसदार असलेल्या दीक्षित परिवाराकडे असते. ही परंपरा शेकडो वर्षांची आहे. दीक्षित परिवाराच्या मार्गदर्शनाखाली श्री अहिल्याराम व्यायाम शाळेचे पदाधिकारी आणि बोलोपासक गरुड रथातील पादुकांचे दर्शन भाविकांना घडवून आणत असतात.यंदाचे वर्षी श्री काळाराम संस्थान तर्फे सुमारे ७० वर्षानंतर या रथाचे मोठ्या प्रमाणात नूतनीकरण करण्यात आले.
याचे औचित्य साधत रथाच्या वरच्या अग्रभागी असलेल्या पूर्वापार गरुड मूर्तीचेही नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या जागी आता फायबर ग्लास मधील गरुडाची पूर्णाकृती मूर्ती दीक्षित परिवारातर्फे नंदन दीक्षित यांनी यावर्षीचे सालकरी हेमंत बुवा पुजारी संस्थांचे विश्वस्त श्री धनंजय पुजारी आणि नरेश पुजारी यांच्याकडे सूपूर्त केली. तीन फूट चार इंच रुंद दोन फूट उंच अशी ही आकर्षक मूर्ती मुंबईचे प्रतिसिद्ध शिल्पकार गणेश क्षीरसागर यांनी घडवली.यावर्षी ही मूर्ती रथावर स्थानापन्न होऊन रथाचे जणू सारथ्य करणार असल्याचे नंदन दीक्षित यांनी सांगितले.
याप्रसंगी मंदिराच्या गाभाऱ्यात उपस्थित हेमंत बुवा पुजारी, नंदन दीक्षित,रवींद्र दीक्षित,पवन दीक्षित, विश्वस्त धनंजय पुजारी, नरेश पुजारी, महंत सुधीरदास पुजारी, ज्येष्ठ वकील अविनाश भिडे, , मनीषा दीक्षित, ऋतुजा दीक्षित, जान्हवी लखोटे दीक्षित यांसह समस्त दीक्षित आणि पुजारी परिवार उपस्थित होता.