पंचवटीत ७ एकरात साकारले नंदनवन; ‘आपले नाशिक हरित नाशिक’ मोहिमेला बळ
मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून वृक्ष लागवड एक स्त्युत उपक्रम : सुरेश अण्णाजी पाटील- अध्यक्ष एनआयटी

नाशिक, दि. २१ डिसेंबर २०२५ – Nashik Green Mission नाशिक शहर हरित करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत पंचवटी परिसरात तब्बल ७ एकर जागेत हिरवेगार नंदनवन साकारले आहे. “आपले नाशिक हरित नाशिक” या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात एन.आय.टी. महाविद्यालयाच्या पुढाकाराने सुमारे २ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून, या उपक्रमामुळे परिसराचे स्वरूपच पालटले आहे.
या उपक्रमासाठी एन.आय.टी. महाविद्यालयाने नाशिक महानगरपालिकेच्या जागेवर स्वच्छता मोहीम राबवून वृक्षलागवडीसाठी योग्य वातावरण निर्माण केले. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी एकत्र येत केवळ झाडे लावण्यापुरतेच नव्हे, तर त्यांचे संवर्धन व संगोपन करण्याचा ठाम संकल्प केला आहे. “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांकडून या वृक्षांचे दीर्घकालीन जतन केले जाणार आहे.
कुंभमेळा मंत्री श्री. गिरीश महाजन यांनी आज या उपक्रमास भेट देत वृक्षलागवडीची पाहणी केली. त्यांनी एन.आय.टी. महाविद्यालयाच्या या स्तुत्य पुढाकाराचे कौतुक करत, हरित नाशिकसाठी(Nashik Green Mission) अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. मंत्री महाजन व विद्यार्थ्यांच्या हस्ते यावेळी प्रत्यक्ष वृक्षलागवड करण्यात आली. तसेच, हैदराबादहून आणण्यात आलेल्या विविध वृक्षप्रजातींबाबत त्यांनी माहिती घेत आवश्यक सूचना केल्या.
यावेळी आमदार देवयानी ताई फरांदे, आमदार सिमाताई हिरे, माजी आमदार बाळासाहेब सानप, संस्थेचे अध्यक्ष सुरेश अण्णाजी पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य गोपाल वडनेरे आदी मान्यवर उपस्थित होते.
“नाशिकचे पर्यावरण जपणे ही केवळ जबाबदारी नाही, तर भावी पिढीसाठीची गुंतवणूक आहे,” असे मत संस्थेचे अध्यक्ष सुरेश अण्णाजी पाटील यांनी व्यक्त केले.या उपक्रमामुळे पंचवटी परिसरात नवे जीवन फुलले असून, ‘हरित नाशिक’चे स्वप्न अधिक साकार होत असल्याचे चित्र दिसत आहे.



