नाशिक,दि,२१ जानेवारी २०२५ –नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत तिढा कायम असतानाच सोमवारी शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे.मात्र पालकमंत्री पदावरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळता आहेत.राजगड आणि नाशिक मधील पालकमंत्री पदाला स्थिगिती देण्याचे पत्र शासनाने जरी काढले असले तरी आता भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नाशिकमधून भाजपचे गिरीश महाजन आणि रायगडमधून राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांची पालकमंत्री पदी नियुक्ती करण्यात आली होती.मात्र नाशिकमधून दादा भुसे आणि रायगडमधून भरत गोगावले यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केल्याने नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय स्थगित करण्यात आला. परंतु आता नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपच आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांच्यात नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. गिरीश महाजन यांनाच पुन्हा नाशिकचे पालकमंत्री करण्यावर भाजपचे नेतृत्व ठाम आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी नाशिक पालकमंत्रिपदाबाबत स्वतः बोलणार आहेत.आगामी सिंहस्थ कुंभमेळा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद भाजप स्वतःकडे ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नाशिककडे विशेष लक्ष आहे.गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक पालिकेची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नाशिक पश्चिममधून सीमा हिरे, नाशिक मध्य मधून देवयानी फरांदे आणि नाशिक पूर्व मतदारसंघात राहुल ढिकले हे भाजपचेच आमदार आहेत.सिंहस्थ कुंभमेळाच्या नियोजनाची गिरीश महाजन यांच्याकडे विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी याआधीही नाशिकचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यामुळे भाजप नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत आग्रही असल्याची माहिती मिळत आहे.
गिरीश महाजनच करणार प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण
नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत तिढा कायम असतानाच सोमवारी शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात भारताच्या प्रजासत्ताक दिनी (दि. २६) रोजी नाशिक येथे मंत्री गिरीश महाजन व रायगड येथे अदिती तटकरे या राष्ट्रध्वजारोहण करतील,असे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता नाशिकमधून गिरीश महाजन आणि रायगडमधून अदिती तटकरे प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करतील, हे स्पष्ट झाले आहे.