नाशिकमध्ये जोरदार पाऊस : दोन दिवस रेड अलर्ट, गोदावरीला पूर
मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरला, उत्तर महाराष्ट्रात धोक्याची घंटा
मुंबई/नाशिक, दि. २८ सप्टेंबर २०२५ –Nashik Heavy Rain Updates महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः मराठवाड्यात मुसळधार पावसाने अक्षरशः कहर केला. गोदावरी, मांजरा, कयाधू यांसारख्या नद्यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला. बीड, नांदेड, धाराशीव आणि लातूरसह तब्बल सहा जिल्ह्यांतले जनजीवन विस्कळीत झाले. अनेक रस्ते बंद पडले, शाळांमध्ये पाणी शिरले तर पोलिस ठाण्यांपर्यंत पाणी गेल्याने प्रशासनाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. आतापर्यंत ९० जणांचा मृत्यू झाला असून २८५७ गावांतील शेती पाण्याखाली गेली आहे.
तथापि, हवामान विभागाकडून आता एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील पावसाचा जोर पुढील २४ तासांत कमी होणार आहे. कारण, राज्यात तयार झालेलं डिप्रेशन अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात परिवर्तित झालं असून ते हळूहळू पश्चिमेकडे सरकत आहे. १ ऑक्टोबरपर्यंत ते गुजरात किनाऱ्याजवळील ईशान्य अरबी समुद्रात पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
नाशिकमध्ये संततधार, घाटमाथ्यावर रेड अलर्ट ( Nashik Heavy Rain Updates)
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार असला तरी उत्तर महाराष्ट्रात धोक्याची घंटा वाजली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विशेषतः नाशिक जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने गोदावरी नदी दुथडीभरून वाहत आहे.रामकुंड, कुशावर्त तीर्थ परिसरात पाणी साचल्याने भाविकांची गैरसोय झाली आहे.अनेक दुकाने, हॉटेल्स आणि मंदिर परिसर पाण्याखाली गेला आहे.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना विशेष सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, प्रशासनातील सर्व विभागांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
गोदावरी नदीला पुन्हा पूर
गेल्या दोन दिवसांपासून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. परिणामी गंगापूर धरणातून १०,९९८ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे रामकुंड परिसरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. परसरातील लहान दुकाने, धार्मिक स्थळे आणि घाट पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत.नदीकाठच्या गावांना प्रशासनाने इशारा दिला असून, परिस्थिती नियंत्रणात न राहिल्यास विसर्ग वाढवला जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
येवला, मनमाड परिसरात मुसळधार पाऊस:पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तब्बल ८०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने कहर केला आहे.येवला शहरात बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटरमध्ये पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले.उंदीरवाडी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.बल्हेगाव येथील पोल्ट्री फार्मची भिंत कोसळून तब्बल ८०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.याशिवाय मनमाड, इगतपुरी आणि देवळाली परिसरात मुसळधार पावसाने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मराठवाड्यात दिलासा
दरम्यान, मराठवाड्यातील मुसळधार पाऊस कमी होणार आहे. हवामान खात्याच्या मते, पुढील २-३ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. मात्र पूरस्थिती कायम असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बीड, लातूर, नांदेडसह अनेक ठिकाणी अजूनही घरांमध्ये पाणी आहे.राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक अद्यापही विविध भागांत मदतकार्य करत आहे. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याने नुकसानभरपाईसाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे.
नागरिकांना सतर्कतेचा इशारा
नाशिक जिल्हा प्रशासनाने नागरिकांसाठी विशेष सूचना दिल्या आहेत :
सखल भाग टाळावेत.
नदी-नाल्यांच्या पुलावरून पाणी वाहत असताना रस्ता ओलांडू नये.
शेतकऱ्यांनी जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.
अफवांवर विश्वास ठेवू नये.
पर्यटकांनी घाट परिसरात जाणे टाळावे.
जिल्ह्यातील सर्व धरणे ओव्हरफ्लो झाल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवली असून, गरज भासल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्याची तयारी आहे.
सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात पावसाने पुन्हा कहर केला आहे. मराठवाड्यात पावसाचा जोर ओसरत असला तरी नाशिक, धुळे आणि नंदुरबार येथे मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. गोदावरी नदीला पूर आला असून, नाशिक शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. प्रशासनाने रेड अलर्ट जारी करत नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.आता सर्वांचे लक्ष पुढील दोन दिवसांत पावसाची तीव्रता किती वाढते आणि विसर्ग किती प्रमाणात करावा लागतो याकडे लागले आहे. सुरक्षितता, सावधानता आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन यावरच जनजीवन सुरळीत होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
पाऊस विषयी बातम्या मिळाल्यावर खरी परिस्थिती समजली. धन्यवाद 🙏