नाशिक हनी ट्रॅप प्रकरण :कॉल डिटेल्स,आर्थिक व्यवहार तपासणीची सुरुवात

अधिकाऱ्यांची अंतर्गत चौकशी वेगात

1

नाशिक, २२ जुलै २०२५ – Nashik Honey Trap Case नाशिकमध्ये सध्या सर्वाधिक गाजत असलेल्या हनी ट्रॅप प्रकरणाची चौकशी आता अधिक तीव्र झाली असून, राज्य प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या प्रकरणात आता महसूल विभागासह अनेक संवेदनशील खात्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर संशयाची सुई फिरू लागली आहे.

अधिकाऱ्यांची अंतर्गत चौकशी सुरू (Nashik Honey Trap Case)
हनी ट्रॅप प्रकरणात एका हॉटेल व्यावसायिकाशी संबंधित संशयित संबंधांमुळे काही बड्या अधिकाऱ्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभागाच्या संयुक्त पथकाने संबंधित अधिकाऱ्यांचे कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि मालमत्तेचे व्यवहार तपासण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. हे अधिकारी त्या हॉटेल व्यावसायिकाच्या संस्थांना संवेदनशील माहिती पुरवत होते का? याचाही तपास केला जात आहे.

जमिनी व्यवहारावर विशेष लक्ष
सूत्रांच्या माहितीनुसार, हा हॉटेल व्यावसायिक नाशिक आणि परिसरात जमिनीच्या मोठ्या व्यवहारात सक्रिय होता. विशेषतः शर्तीच्या जमिनी, आदिवासी जमिनी, आणि गावठाण हद्दीतील व्यवहारांमध्ये त्याच्या सहभागाची शक्यता तपासली जात आहे. मागील काही वर्षांत नाशिकमध्ये जमिनींना सोन्याचा भाव आला असून, त्यात घोटाळ्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

‘गोल्डन गँग’ सक्रिय असल्याची शक्यता
या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली असून, जमिनीच्या व्यवहारांमागे ‘गोल्डन गँग’ नावाचा गट सक्रिय असल्याची चर्चा आहे. हनी ट्रॅपच्या माध्यमातून सरकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि स्थानिक राजकीय मंडळी यांच्यावर प्रभाव टाकून जमिनींचे व्यवहार केल्याचा संशय आहे.

ठाणे पोलिसांकडून झाडाझडती
ठाणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये येऊन संबंधित हॉटेलची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाला राजकीय व प्रशासकीय वर्तुळात मोठं वळण मिळालं आहे. या झडतीदरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल डेटा जप्त करण्यात आला आहे.

विरोधकांचा दबाव, सरकार अडचणीत
या प्रकरणात विरोधकांनी सरकारवर चौकशीसाठी दबाव वाढवला असून, विधानसभेतही हे प्रकरण गाजलं. महसूल खात्याच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचं नाव समोर आल्याने राजकीय पातळीवर अस्वस्थता वाढली आहे.

प्रकरण मुळापर्यंत जाणार
सध्या सुरू असलेली चौकशी केवळ अधिकाऱ्यांपुरती मर्यादित राहिल की, यामध्ये राजकीय हस्तक्षेप किंवा हितसंबंध उघडकीस येतील, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र, पोलिस प्रशासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतल्याने आणि फॉरेन्सिक तपास, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल्स तपासणीसह सर्व बाजूंनी छाननी सुरू असल्याने हे प्रकरण लवकरच मोठी कलाटणी घेऊ शकतं.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!