नाशिक – गानसम्राज्ञी भारतरत्न स्व.लता मंगेशकर यांच्या अस्थींचे आज सकाळी नाशिकच्या रामकुंडावर धार्मिक विधी करुन विधीवत पध्दतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी नाशिककरांनी अस्थीकलशाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
नाशिकच्या रामकुंड परिसरात शामियाना उभारण्यात आला होता याठिकाणी विधिवत पूजा करून अस्थींचे विसर्जन करण्यात आले.यावेळी उषा मंगेशकर,आदिनाथ मंगेशकर, वैजनाथ मंगेशकर, राधा मंगेशकर,मयुरेश पै,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय शिवसेना पदाधिकारी मिलिंद नार्वेकर, हे विशेष विमानाने अस्थिकलश घेऊन नाशिकमध्ये दाखल झाले होते.
वेदमुर्ती शांतारामशास्त्री भानोसे मकरंदशास्त्री भानोसे, मंदारशास्त्री भानोसे,वेदमुर्ती,सुरेश शास्त्री भानोसे,सतीश शुक्ल ,दिनेश शास्त्री गायधनी ,चंद्रात्रे गुरुजी,अतुलशास्त्री गायधनी यांनी पौरोहित्य केले. नाशिककरांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतल्या नंतर भावपूर्ण वातावरणात अस्थींची रामकुंडात विसर्जन कारणात आले.
नाशिक शिवसेनेकडून अस्थी विसर्जन कार्यक्रमाची सर्व नियोजन करण्यात आले होते लता दिदींनी ९३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दादर येथील शिवाजी पार्कवर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
यावेळी जिल्हाधिकारी सुरज मांढरे, प्रभारी पोलीस आयुक्त बी.जी.शेखर,पंचवटी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ निरीक्षक सीताराम कोल्हे,शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर,महानगर प्रमुख अजय बोरस्ते,विनायक पांडे, माजी आमदार बबन घोलप दत्ता गायकवाड,प्रशांत जुन्नरे ,ईश्वर जगताप यांच्यासह नाशिकमधील कालक्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.