Nashik IT Raid: नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई
बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजक आयकर विभागाच्या रडारावर
नाशिक,दि,३१ जानेवारी २०२४ – नाशिकमध्ये पुन्हा आयकर विभागाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे नाशिक पुन्हा एकदा आयकर विभागाच्या रडारवर आले आहे. नाशिक शहरातील बांधकाम व्यवसायिकांसह अनेक उद्योजकांवर आयकर विभागाकडून छापे घातल्याचे वृत्त आहे.४ कंत्राटदार आणि १० बिल्डर अशा १४ ठिकाणी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले आहेत.
आज पहाटेपासून नाशिक शहरात आयकर विभागांना छापा-सत्र सुरू केले आहे. राज्यातील आयकर विभागाचे एकूण १२० अधिकारी ७० विविध वाहनांमध्ये नाशिकमध्ये दाखल झाले आहेत.
नाशिक मध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांवर छापे पडले असून मोठा आयकर बुडवल्याचा संशयावरून हे छापे करण्यात आले आहे कुणालाही कळू नये म्हणून मुंबई विभागाच्या आयकर विभागाने औरंगाबाद मध्ये जाऊन नंतर नाशिकमध्ये येऊन या कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईसाठी १५० अधिकाऱ्यांची मोठी फौज नाशिकमध्ये दाखल झाली आहे. तसेच मुंबईचे आयकर अधिकारी नाशिकमध्ये पोहचले आहे.
आयकर विभागाने आज सकाळी केलेल्या या छापेमारीमध्ये सरकारी ठेकेदार असून, त्यांच्याशी निगडित काही चार्टर्ड अकाऊंटंट यांच्या कार्यालय व निवासस्थान यांच्यावरही छापेमारी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका व जिल्हा परिषदेशी निगडित असलेल्या काही ठेकेदारांवर आयकर विभागाने छापेमारीची कारवाई केली आहे. यातील दोन ठेकेदार हे नाशिकमध्ये वास्तव्यास असले, तरी ते सिन्नर तालुक्याशी निगडित आहेत, तर एक ठेकेदार हा मुंबई नाका येथे वास्तव्यास असून, त्याने महाराष्ट्र पोलीस अकादमीसह काही सरकारी इमारतींच्या बांधकामात सहभाग घेतलेला आहे, तर याच ठेकेदाराचा व्यावसायिक पार्टनर हा जिल्हा परिषदेचा माजी सदस्य असून, त्याने सभापती म्हणून कामकाज पाहिलेले आहे.