Nashik:बिबट्याला कुत्र्यांनी पिटाळले :सी सी टीव्हीत घटना झाली कैद 

(व्हिडिओ पहा)

0

नाशिक,दि. २६ जुलै २०२३ – नाशिक शहरात रविवारी बिबट्याने पादचारी नागरिकांवर हल्ला केल्याने  स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली आहे. अशातच नाशिकच्या आडगाव परिसरात बिबट्याने एका  बंगल्यात शिरकाव केला. यावेळी कुत्र्याला भक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या कुत्रा थेट मदतीला धावला. काही वेळ प्रतिकार केला  आणि दोन्ही कुत्र्यांना पाहून  बिबट्याने बंगल्यातून धूम ठोकल्याचे फुटेज सीसी टीव्हीत कैद झाल्याने सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

नाशिक  शहरातील जय भवानी रोडवर तिनच दिवसांपूर्वी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक ईसम गंभीर जखमी झाला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयातही चांगलेच व्हायरल झाल्याने परिसरात कमालीची दहशत पसरली आहे. दरम्यान, हा बिबट्या अजून वनविभागाच्या हाती लागलेला नसतांनाच आडगाव परिसरातील पाझर तलाव परिसरात असलेल्या प्रभाकर माळोदे यांच्या मळ्यातील बंगल्यात काल रात्री बिबट्या शिरला होता. एका कुत्र्याला भक्ष्य करायला तो जाताच दुसरा कुत्रा त्याला वाचवायला आला आणि अखेर श्वानांचे हे चवताळेलेले रूप बघून बिबट्या पळून गेला. कुत्र्यांनी त्याचा पाठलाग केल्याचीही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.

नाशिक शहरात सातत्याने बिबट्याच्या दर्शनासह  हल्ल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे नाशिकच्या जेलरोड, देवळाली आदी परिसरात नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. आडगाव परिसरातील पाझर तलाव भागात प्रभाकर माळोदे यांचा बंगला आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास अचानक बिबट्याने भिंतीवरून उडी घेत बंगल्यात प्रवेश केला. यावेळी प्रवेश करताच एक कुत्रा झोपलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यामुळे बिबट्याने कुत्र्याची शिकार करण्याचे ठरविले. बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करताच बाजूलाच दुसरा कुत्रा देखील झोपलेला होता. आवाजाने तो जागी झाला. मात्र, कुत्र्यांनी एकाचवेळी प्रतिकार केल्याने बिबट्याने धूम ठोकली. कुत्र्यांनी प्रतिकार करताना बिबट्याला सळो की पळो केले, अखेर काही मिनिटात बिबट्याने धूम ठोकली. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.

दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरातील आनंदनगर भागात रविवारी रात्री साडेनऊ वाजता इसमावर हल्ला चढवला. रस्त्याने जाणाऱ्या राजू शेख यांच्यावर बिबट्याने झेप घेत झडप घातली. या हल्ल्यात राजू  शेख यांच्या डोक्याला जबर जखम झाली. त्यांना खाजगी रुग्णालयात सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शेख हे भालेकर मळा येथील रहिवासी असून गुरुदेव गॅस एजन्सीमध्ये कामाला आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास राजू शेख रस्त्याने पायी जात असताना बिबट्याने प्रचंड वेगाने त्याच्यावर अचानक हल्ला केला.

नाशिकमध्ये बिबट्याची प्रचंड दहशद असून स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. वन विभागाने तातडीने याची दखल घेऊन पिंजरा लावावा तसेच बिबट्याला रेस्क्यू करून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे .

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.