नाशिकच्या प्रभाग १२ मध्ये नुपूर सावजींना उस्फूर्त प्रतिसाद

कलावंतांचा प्रतिनिधी महापालिकेत जाण्याचा विश्वास;भाजपाच्या निर्णयाने सांस्कृतिक विश्वात आनंद

1

नाशिक | दि. ११ जानेवारी २०२६ Nashik Municipal Election 2026 आजवर निवडणूक काळात कलावंतांचा उपयोग केवळ प्रचार, सभा आणि मनोरंजनापुरताच मर्यादित राहिला होता. मात्र नाशिक महानगरपालिकेच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने हा संकेत बदलत एका गुणी, अभ्यासू आणि सामाजिक जाणिवा असलेल्या अभिनेत्रीला थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. प्रभाग क्रमांक १२ मधून नुपूर लक्ष्मण सावजी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आल्याने नाशिकच्या सांस्कृतिक आणि कलावंत विश्वात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांनी नुपूर सावजी यांच्या युवा नेतृत्वाला दिलेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता “यावेळी आपलाच प्रतिनिधी महापालिकेत जाणार” असा विश्वास नागरिकांसह अनेक कलावंतांनी व्यक्त केला आहे. कलावंतांचा आवाज थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोचावा, ही अनेक वर्षांची अपेक्षा आता प्रत्यक्षात उतरत असल्याची भावना सर्वत्र दिसून येत आहे.

१५ जानेवारीला मतदान; सर्वांत तरुण उमेदवाराकडे सर्वांचे लक्ष (Nashik Municipal Election 2026)

येत्या १५ जानेवारी रोजी नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्रात महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. नाशिकच्या मध्यवर्ती आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध अशा प्रभाग क्रमांक १२ मधून नुपूर सावजी या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. नाशिक महानगरपालिकेतील सर्वांत तरुण उमेदवारांपैकी एक असल्याने या प्रभागाकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांचेही लक्ष वेधले गेले आहे.

बिहारचा संदर्भ; नाशिकमधील आशा बळावल्या

बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत युवा गायिका मैथिली ठाकूर यांना जनतेने दिलेल्या पाठिंब्याचा संदर्भ देत, “त्याचप्रमाणे नुपूर सावजीही निवडून येतील,” असा विश्वास प्रभागातील अनेक नागरिक व कलावंतांनी व्यक्त केला. सांस्कृतिक क्षेत्रातून आलेल्या नेतृत्वाला जनतेने स्वीकारल्याची उदाहरणे वाढत असल्याने नाशिकमध्येही बदलाची हवा असल्याचे चित्र आहे.

साहित्यिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला प्रभाग

प्रभाग क्रमांक १२ हा केवळ भौगोलिकदृष्ट्या नव्हे, तर सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. साहित्य क्षेत्रातील दैवत तात्यासाहेब शिरवाडकर, ज्येष्ठ नाटककार कै. वसंत कानेटकर यांचे निवासस्थान याच प्रभागात होते. त्यामुळे या भागाला साहित्यिक आणि सांस्कृतिक वारशाची समृद्ध परंपरा लाभली आहे. अशा प्रभागातून सांस्कृतिक जाणीव असलेले नेतृत्व पुढे येणे हे या वारशालाच साजेसे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

याच पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध अभिनेते व अर्थतज्ज्ञ दीपक करंजीकर, सा. वा. ना.चे अध्यक्ष दिलीप फडके, ज्येष्ठ अभिनेते सदानंद जोशी ,अभिनेत्री विद्या करंजीकर, अभिनेता चिन्मय उदगीरकर, अभिनेत्री पूजा गोरे आणि अभिनेत्री पल्लवी पटवर्धन यांनी नुपूर सावजी यांच्या उमेदवारीला खुले समर्थन दिले आहे. “लोकसेवेचा वारसा घेऊन आलेली तरुण उमेदवार निश्चित यश संपादन करेल,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

प्रभाग १२ : नाशिकचा मध्यबिंदू

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना नुपूर सावजी म्हणाल्या, “प्रभाग क्रमांक १२ हा केवळ मध्य नाशिकचाच नव्हे, तर संपूर्ण नाशिकचा मध्यबिंदू आहे. पूर्वेला नदीसह जुने नाशिक, पश्चिमेला रोजगाराची ओळख असलेली सातपूर औद्योगिक वसाहत, दक्षिणेला कामगारबहुल परिसर आणि उत्तरेला वेगाने विकसित होणारा गंगापूर रोड अशी सर्व वैशिष्ट्ये या प्रभागात एकत्र आलेली आहेत.”

त्या पुढे म्हणाल्या, “विद्यानगरी म्हणून ओळख असलेला परिसर, स्वातंत्र्यानंतरची पहिली समूहवस्ती असलेले महात्मानगर या सगळ्यांमुळे हा प्रभाग संवेदनशील, सुसंस्कृत आणि उद्यमशील लोकवस्तीचा आहे. अशा प्रभागाला तरुण, तडफदार, रोखठोक पण संस्कृतीची जाण असलेले नेतृत्व हवे.”

संस्कृती, शिक्षण आणि उद्यमशीलतेचा संगम

नुपूर सावजी या द्विपदवीधर असून त्यांची संस्कृतवर मजबूत पकड आहे. भारतीय सनातन संस्कृतीचा अभिमान, अभ्यास आणि ओळख त्यांच्याकडे आहे. प्रायोगिक नाटक, दूरदर्शन मालिका, जाहिराती, सोशल मीडिया मार्केटिंग अशा विविध माध्यमांतून त्या घराघरात पोहोचल्या असल्या, तरी त्यांची नाळ आजही जमिनीशी घट्ट जोडलेली आहे.

भाजपा नेते लक्ष्मण सावजी यांचे बाळकडू, स्वतः डिझायनर व उद्योजक अशी त्यांची ओळख आहे. “मी सहज मिसळणारी, थेट संवाद साधणारी आणि हक्काने नागरिकांपर्यंत पोहोचणारी आहे. प्रभाग १२ मधील नागरिक मला सेवा करण्याची संधी नक्की देतील,” असा विश्वास नुपूर सावजी यांनी व्यक्त केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!