नाट्य परिषद नाशिक शाखेची वार्षिक सभा आज; वादळी चर्चेची शक्यता ?
नाट्य परिषद नाशिक शाखेच्या निवडणुकीसाठी अनेक रंगकर्मींनी थाेपटले दंड

दिगंबर काकड
नाशिक, दि. २५ डिसेंबर २०२५ – Nashik Natya Parishad News अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज गुरुवारी, दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कालिदास कलामंदिरातील नाट्य परिषद सभागृहात होणार आहे. मात्र, या सभेपूर्वीच नाट्य परिषदेच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, त्याचे पडसाद आता उघडपणे उमटू लागले आहेत.जनस्थान ऑनलाईनवर “सभासदांना कोणतीही सूचना न देता वार्षिक सभा?” तसेच “नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांची नाराजी” या आशयाची बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयाला व्यापक प्रतिसाद मिळत आहे. अनेक रंगकर्मी व सभासदांनी जनस्थान ऑनलाईनशी संपर्क साधून या प्रश्नाला वाचा फोडल्याबद्दल समाधान व्यक्त केले असून, यामुळे नाट्य परिषदेत सकारात्मक बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.अनेक तरुण व ज्येष्ठ रंगकर्मींनी संपर्क साधून नाट्य परिषद नाशिक शाखेतील कारभारासंदर्भात विविध बाबी मांडल्या आहेत. यामधून काही धक्कादायक वास्तव समोर आले असून, अनेक सभासदांना आज होणाऱ्या वार्षिक सभेबाबत अद्याप कोणतीही अधिकृत सूचना मिळालेली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
जनस्थान ऑनलाईनवरील बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर काही सभासदांना दूरध्वनीद्वारे संपर्क करण्यात आला असला, तरी सभेच्या दिवशीही बहुसंख्य सभासद अज्ञानातच असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.परिषदेच्या नियमांनुसार सभासदांना १९ डिसेंबरपर्यंत ठराव किंवा सूचना लेखी स्वरूपात सादर करण्याची अंतिम मुदत होती. मात्र, सभा होणार असल्याचीच माहिती नसल्याने कोणतेही ठराव किंवा सूचना सादर झाल्या नसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावरून सभासदांना गृहीत धरले जात असल्याचा आरोपही केला जात आहे.वर्तमानपत्रात सभेची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचा दावा पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असला, तरी सभासदांचे म्हणणे वेगळे आहे. “नाट्य परिषदेने थेट आमच्याशी संपर्क साधून किंवा किमान व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे सभेची माहिती देणे अपेक्षित होते,” अशी नाराजी अनेक सभासदांनी व्यक्त केली. नाट्य परिषदेच्या उपक्रमांची कोणतीही माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नसल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.पूर्वी सभासदांना पत्राद्वारे सभेची माहिती दिली जात होती. मात्र, खर्च वाचवण्यासाठी ही पद्धत बंद करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. तथापि, सोशल मीडियाचा वापर करून व्हॉट्सअॅपवर विनामूल्य संदेश पाठवणे सहज शक्य असताना तसे का करण्यात आले नाही, असा सवाल सभासद उपस्थित करत आहेत.नाशिक शहराची लोकसंख्या सुमारे २३ लाखांहून अधिक असून, शहरात मोठ्या प्रमाणावर कलावंत कार्यरत आहेत. असे असतानाही अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाशिक शाखेतील सभासदसंख्या केवळ सुमारे १,५०० च्या आसपास असणे, ही बाबही चर्चेचा विषय ठरत आहे.
अकार्यक्षम ठरलेल्या सात शाखांची मान्यता रद्द; नाशिक शाखेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह (Nashik Natya Parishad News)
नुकतीच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा मुंबईतील एका नाट्यगृहात पार पडली. या सभेत नाट्य परिषदेच्या घटनेतील कलम २१ (१२) व २१ (५) अन्वये अकार्यक्षम ठरलेल्या कराड, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रायगड, इंदापूर आणि परळी वैजनाथ या सात शाखांची मान्यता रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या शाखांतील सभासदांना जवळच्या सक्रिय शाखांमध्ये वर्ग करण्यात येणार असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले.सभेत शाखा व्यवस्थापन आणि निवडणूक प्रक्रियेबाबतही सविस्तर चर्चा झाली. घटनेतील कलम ९ (६) (४) नुसार कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतर निवडणूक प्रक्रिया राबवणे अनिवार्य असताना, प्रत्यक्षात अनेक शाखांमध्ये निवडणुका वेळेवर होत नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी निवडणूक प्रक्रिया घटनेनुसार पार पाडली जात नसल्याचे आरोपही मांडण्यात आले. अशा परिस्थितीत मध्यवर्ती शाखेला संबंधित शाखा बरखास्त करण्याचा अधिकार असल्याचे सभेत नमूद करण्यात आले.
दरम्यान, नाट्य परिषद नाशिक शाखेबाबतही काही गंभीर बाबी समोर आल्या आहेत. रंगभूमीची ३० वर्षांहून अधिक सेवा केलेले अनेक ज्येष्ठ सभासद, तसेच पुण्यातील ललित कला केंद्र आणि मुंबई विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातील तरुण, हौशी रंगकर्मी यांना नाशिक शाखेकडून अनेक वर्षांपासून सभासदत्वाचे अर्ज दिले जात नसल्याचा आरोप काही रंगकर्मींनी केला आहे. मात्र, नाट्य परिषदेच्या मूळ घटनेनुसार पात्र कलाकारांना काही महिन्यांच्या आत सभासद करून घेणे शाखांसाठी बंधनकारक आहे.काही परखड रंगकर्मींनी, सांस्कृतिक पत्रकारांनी, समीक्षकांनी तसेच महिला कलावंतांनी नाशिक शाखेच्या कथित मनमानी कारभाराविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले आहे. मात्र, हा आवाज दाबण्यात आल्याचा आरोप करण्यात येत असून, काहींना कार्यकारिणीत सामावून घेऊन विषय शांत करण्यात आल्याचेही बोलले जात आहे.या पार्श्वभूमीवर, यावेळी मात्र अनेक सभासद व कलाकारांनी नाशिकच्या रंगभूमीच्या उज्ज्वल भविष्यासाठी आगामी नाट्य परिषद नाशिक शाखेच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग घेण्याची भूमिका जाहीर केली आहे. यामध्ये नाशिकमधील अनेक ज्येष्ठ व नामवंत रंगकर्मींचा समावेश असून, त्यांनी गेल्या अनेक वर्षांत नाशिकच्या रंगभूमीची सेवा करून नाट्यक्षेत्राची ओळख अधिक व्यापक स्तरावर निर्माण केली आहे.
घटनेनुसार कार्यकाळ संपूनही निवडणूक प्रक्रिया सुरू नसल्याने नाशिक शाखेच्या कारभारावर सवाल (Nashik Natya Parishad News)
जनस्थान ऑनलाइनच्या हाती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेची मूळ घटना प्राप्त झाल्यानंतर नाट्य परिषदेच्या नियमावली व कार्यपद्धतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या घटनेच्या आधारे नाट्य परिषद नाशिक शाखेच्या आगामी निवडणुकांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, अनेक रंगकर्मी निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.नाट्य परिषदेच्या नवीन घटनेतील कलम ९ (२) (अ) नुसार नियामक मंडळाचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. या नियमानुसार नाशिक शाखेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ पूर्ण झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे घटनेनुसार निवडणूक प्रक्रिया राबवणे बंधनकारक ठरते.घटनेतील कलम ९ (६) (४) नुसार, शाखेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रमुख निवडणूक अधिकारी नियुक्त करणे, निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आणि निवडणुकीच्या तारखेपूर्वी किमान दोन महिने आधी सर्व आजीव सभासदांना तसेच सर्व शाखांना एसएमएस, ई-मेल आणि प्रमुख वृत्तपत्रांद्वारे अधिकृत सूचना देणे आवश्यक आहे. त्यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडणे अपेक्षित आहे.मात्र, नाशिक शाखेच्या कार्यकारिणीचा कार्यकाळ संपला असतानाही अद्याप कोणतीही अधिकृत निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. यामुळे घटनेच्या अंमलबजावणीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नाशिकसह राज्यातील काही अन्य शाखांमधील निवडणुका घटनेनुसार वेळेत होणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत रंगकर्मी व्यक्त करत आहेत.
परिषदेच्या घटना *कलम क्र. ७ (२) आ), इ), ई), उ)* प्रमाणे झालेल्या सभासदांना परिषदेच्या सर्वसाधारण व विशेष सर्वसाधारण सभांना उपस्थित राहणे, सभेच्या कामकाजात भाग घेणे व नियमाप्रमाणे मत देणे, प्रश्न विचारणे, मत प्रदर्शीत करणे, ठराव मांडणे, घटनेच्या नियमाप्रमाणे कागदपत्र पाहणे, निवडणुकीस उभे राहणे, मत देणे, साधारण व विशेष सर्वसाधारण सभेची मागणी करणे, परिषदेने परिषदेच्या कार्याविषयक काही जबाबदाऱ्या सोपविल्यास त्या स्वीकारणे व पार पाडणे व एकूण नाट्यचळवळीच्या व पर्यायाने परिषदेच्या कार्याच्या अभिवृद्धीसाठी झटणे अशा पद्धतीच्या आहे.
*९ (१) नियामक मंडळ रचना व निवडणूक :*
परिषदेच्या आजीव सभासदांनी निवडून दिलेले परिषदचे एक नियामक मंडळ असेल. हे नियामक मंडळ नाट्य परिषदेचे एकंदर धोरण सभासदांच्या वार्षिक किंवा विशेष सर्वसाधारण सभेच्या मान्यतेने ठरवेल. ठरविलेल्या धोरणानुसार व नियमानुसार परिषदेचे कामकाज चालेल. त्यावर देखरेख अणि नियंत्रण ठेवणे हे नियामक मंडळाचे प्रमुख कार्य राहील. यावर नाट्य परिषद नाशिक शाखेवर कोणाचे नियंत्रण आहे.
*९ (२) अ)* या नियामक मंडळाची मुदत ५ वर्षे (एक सत्र) अशी असेल. परंतु नाट्य परिषद नाशिक शाखेवर अनेक वर्ष मोजकीच मंडळी ठाण मांडून बसली आहे.
*२१ (१) अ) परिषद शाखा 🙁Nashik Natya Parishad News)
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या हया घटनेत नमूद केलेले ध्येय, उद्देश्य व साधने हे जोपासना करण्यासाठी व नाटयविषयक चळवळ अखिल भारतात लोकाभिमुख करण्यासाठी परिषदेच्या शाखांची स्थापना करण्यात येईल. मुंबईप्रमाणेच ज्या ज्या ठिकाणी महानगरपालिका आहेत, (उदा. पुणे, नागपूर, सोव औरंगाबाद, ठाणे, कल्याण, कोल्हापूर) इत्यादि ठिकाणी जास्तीत जास्त ३ इतक्या शाखा असा मात्र त्या मंजूर करतांना भौगोलिक परिस्थितीचा विचार व्हावा. कोणत्याही गावात अगर शहरात परिषदेची नवी शाखा स्थापन करण्यासाठी किमान १५० आजीव सभासदांची आवश्यकता असेल.
सध्या अस्तित्वात असलेल्या शाखा अगर नवीन स्थापन झालेल्या शाखा ह्यांना परिषदेची ही घटना बंधनकारक असेल. मात्र अशा शाखांना त्यांच्या दैनंदिन कार्याच्या आवश्यकतेनुसार घटनेशी सुसंगत असे, स्वतःचे कामकाजाविषय नियम, पोटनियम तयार करता येतील. मात्र अशा नियम-पोटनियमांना शाखेच्या सर्वसाधारण सभेची व तनंतर मध्यवर्तीच्या कार्यकारी समितीची मान्यता घेणे बंधनकारक असेल. आवश्यकतेनुसार शाखेच्या नियम-पोटनियमात बदल करण्याचा अधिकार शाखेच्या सर्वसाधारण सभेला असेल. अशा फेरबदलास मध्यवर्तीच्या कार्यकारी समितीची मान्यता घेणे बंधनकारक असेल. सर्व शाखांचे व्यवस्थापन मध्यवर्तीच्या घटनेप्रमाणे तसेच घटनेला कोणतीही बाधा न आणता चालेल. घटनेच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता व्यवस्थापनाच्या सोयीसाठी काही किरकोळ बदल करावयाचे असल्यास त्यास मध्यवर्तीच्या कार्यकारी समितींची पूर्व परवानगी घ्यावी लागेल.
परिषदेच्या घटनेविरूद्ध अगर विसंगत असे एखाद्या शाखेचे वर्तन अगर कार्य झाल्यास व तसे परिषदेच्या कार्यकारी समितीस आढळून आल्यास अगर तसे सिद्ध झाल्यास अगर एखाद्या शाखेने सलग दोन वर्षे कोणताही उपक्रम न राबविल्यास अथवा मध्यवर्तीतर्फे आयोजित केलेल्या उपक्रमात सहभाग न घेतल्यास अगर मध्यवर्तनि शाखेसाठी बनविलेल्या आचार संहितेचे पालन न केल्यास त्या शाखेची कार्यकारी समिती कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द करण्याचा अधिकार मध्यवर्तीच्या कार्यकारी समितीस असेल. अशा प्रसंगी मध्यवर्ती कार्यकारी समिती निरीक्षकांची नेमणूक करून त्या शाखेची विषेश सर्वसाधारण सभा बोलावून नवीन कार्यकारी समिती प्रस्थापीत करेल. अशा शाखेची मान्यता तात्पुर्ती काढून घेण्याचा अथवा तशी शाखा निलंबित अगर रद्द करण्याचा अधिकार परिषदेच्या नियामक मंडळास राहील. मात्र अशा कारवाईपूर्वी त्या शाखेला आपली बाजू लेखी मांडण्याची योग्य ती संधी दिली जाईल.असे नियम आहेत त्यामुळे आज नाशिकशाखेच्या सर्वसाधारण सभेत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

