नाशिक,दि .२ डिसेंबर २०२३ –शाळेतील दिवस हळुवार संपून कॉलेजमध्ये जाण्याची एक आंतरिक ओढ आणि कॉलेज पासआऊट करताना तिथल्या रंजक व गोड आठवणी या कुणासाठीही आयुष्यभराचा एक खजिना असतो. प्रत्येक व्यक्ती ही कॉलेज मधील व्यतीत केलेल्या सुंदर दिवसांचा काळ आणि तिथल्या आठवणी पुन्हा जगण्यासाठी आतुर असतो .पण आज या धावपळीच्या आयुष्यात प्रत्येक जण एवढा गुरफटून गेलाय की त्या कॉलेजच्या सोनेरी क्षणांची आठवणच विसरून गेलाय ! म्हणून हीच आठवण ताजी करण्यासाठी बी.वाय.के. महाविद्यालय आणि काही माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन,आज शनिवार दिनांक २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेपासून ते रात्री ९ वाजेपर्यंत माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. विशेष म्हणजे हा मेळावा हा सगळ्या बॅचेस च्या विद्यार्थांसाठी खुला असणार आहे.
यावेळी ४ ते ६ या वेळात फन फेअर,६ ते ८ यावेळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात १९५७ ते २०२२ चे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी हे गायन,वादन आणि नृत्य सादर करणार आहेत. तसेच यावेळी आजवर वैशिष्ट्य पूर्ण काम करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ देखील आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या माजी विद्यार्थी मेळाव्याची थीम आणि सजावट हि कॉमर्स (वाणिज्य) या विषयाशी निगडीत म्हणजे अॅसेट, बॅलन्सशीट, डेबिट, क्रेडीट,
रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट यांचा आपल्या आयुष्याशी कसा संबंध आहे, अशा अनोख्या पद्धतीने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉलेज मधले ते सुंदर दिवस ते मित्र मैत्रिणींना चिडवणं, कट्यावर बसून तासंतास चाललेल्या गप्पा, बाहेर जाऊन सलीम मांमुचा कटिंग चहा आणि ‘तो’ किंवा ‘ती’ कॉजेलला अजून कशी नाही आली अजून म्हणून वाट बघत राहणं हे सुंदर दिवस पुन्हा अनुभवण्यासाठी शनिवारी सायंकाळी नाशिक मधील बी.वाय.के महाविद्यालयात सर्व माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले असून यावेळी माजी विद्यार्थ्यांसोबतच, सर्व माजी प्राचार्य, माजी शिक्षक देखील उपस्थित राहणार आहे.
तरी आपल्या उमटलेल्या त्या पाऊलखुणा बघायला आणि आयुष्यातले तेच दिवस पुन्हा अनुभवायला बी.वाय.के.कॉलेजमध्ये आज २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता १९५७ पासून तर २०२२ पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी बी. वाय. के. कॉलेज च्या या माजी विद्यार्थी मेळाव्याला आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एन.सुर्यवंशी यांनी केले आहे
फ्री रजिस्ट्रेशन आवश्यक – आपण येणार असाल तर कृपया खालील नंबर वर मेसेज पाठवून आपले आणि आपल्या ग्रुप मधील लोकांचे नावं रजिस्टर करा.त्यासाठी टाईप करा BYK (स्पेस) तुमचं नाव आणि तुमची बॅच (वर्ष) आणि व्हॉट्सअप करा 9850400962 (रोशन वैद्य) या क्रमांकावर.आणि कार्यक्रमच्या अधिक माहितीसाठी पाऊलखुणा या फेसबुक पेज ला व्हिजिट करा.