विकास कामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात
राज्यातील पहिले वातानुकूलित नाशिक मेळा बसस्थानकाचे आज होणार लोकार्पण !
नाशिक दि,१० फेब्रुवारी २०२४ – विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक शहरातील विविध विकास कामांच्या लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्यासाठी नाशकात येत आहेत. त्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजप नाशिक महानगराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.
नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले व नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे यांच्या विकास निधीतून अनेक कामे पूर्णत्वास गेली आहेत. त्यांचे लोकार्पण व अनेक कामांचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न होत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दुपारी २.३० वाजता ओझर विमानतळावर आगमन होणार असून लगेचच दुपारी २.४५ वाजता नाशिक पूर्व मतदार संघातील विविध कामांचे उद्घाटन त्या नंतर मॅरेथॉन चौकात जलपरिषद रथाचे उद्घाटन, दुपारी ४ ते सायंकाळी ६ वाजता या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथील आयोजित क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभास उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ वाजेनंतर आ.
सीमा हिरे यांच्या प्रयत्नातून साकार झालेल्या सर्व सोयींनी युक्त अशा अत्याधुनिक सुविधा असलेल्या सातपूर पोलीस स्टेशनच उद्घाटन सायंकाळी ६.३० वाजता आ. देवयानी फरांदे यांच्या विशेष प्रयत्नातून साकार झालेले नाशिकच्या वातानुकूलित व अत्याधुनिक मेळा बस स्थानकाचे उद्घाटन होणार आहे. तरी मेळा बस स्थानकाच्या उद्घाटनासाठी
मोठे संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहनही शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी केले आहे. याचवेळी ऑनलाईन पद्धतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम व नाशिक मध्यच्या आमदार निधीतून साकार झालेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन करणार आहेत.
दरम्यान शहरातील तिन्ही आमदार अनुक्रमे आ.राहुल ढिकले, आ. देवयानी फरांदे,आ. सीमाहिरे यांच्या विधानसभा क्षेत्रात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर फलक लावून सजावट करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.
नाशिक मेळा बसस्थानक होणार खुले,आज होणार लोकार्पण ! ठक्कर बझारचा भार होणार कमी !
नाशिक मेळा बसस्थानकाला राज्यातील पहिले वातानुकूलित स्थानक करण्यात आले असून स्थानकाचे आज शनिवारी (दि. १०) लोकार्पण होईल. रविवारपासून पुणे, धुळे, छत्रपती संभाजीनगरसह लांब पल्ल्याच्या बसेस या स्थानकातून सुटणार असल्याचे नियोजन झाले आहे.बसपोर्ट मध्ये पोलिस चौकी, मॅनेजर केबीन, रेस्ट रूम, गेस्ट रूम, संपूर्ण बसपोर्ट वातानुकूलित असणार आहे
कुंभमेळ्याच्या पार्शवभूमीवर बांधलेलेले नवीन मेळा बसस्थानक हे २० प्लॅटफॉर्मचे असून येथून रोज १५०० बसेसद्वारे ६०००० प्रवाशांची ये-जा होणार आहे. या स्थानकामुळे ठक्कर बझार स्थानकावरील भार कमी होणार असून बाहेरील आणि स्थानकातीलही कोंडी फुटणार आहे. या स्थानकातून छ. संभाजीनगर, पुणे, धुळे, मालेगाव, सटाणा अशा लांब व मध्यम पल्ल्याच्या बसेस सुटणार आहेत. तर ठक्कर बझार येथून इगतपुरी, जव्हार, सिन्नर, त्र्यंबकेश्वर व ग्रामीण भागातील फेऱ्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
स्थानकातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटणार:
नवीन बसस्थानक परिसरातील पार्किंगचा जागेमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत होती. मात्र आता मेळा बसस्थानक येथून आता बसेस सोडण्याचे नियोजन केले जात असल्याने या परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे.