नाशिक,दि.२२ नोव्हेंबर २०२३- डिजिटल पोर्ट्रेटच्या विश्वात विश्वविक्रम करणारा डिजिटल पोर्ट्रेट आर्टीस्ट प्रणव सातभाई ह्याने साकारलेल्या डिजिटल पोर्ट्रेटचे प्रदर्शन शनिवार दिनांक २५,२६,२७ नोव्हेंबर रोजी गुरुदक्षिणा हॉल, बीवायके कॉलेजजवळ, कॉलेज रोड येथे आयोजित केले आहे.
प्रणव सातभाई हा मूळचा नाशिकचा असून कोविड काळात छंद म्हणून त्याने डिजिटल पोर्ट्रेट साकारायला सुरुवात केली. त्याच्या कलेला सोशल मिडीयावर प्रसिद्धी मिळाली. त्याने एका वर्षात १००० हून अधिक डिजिटल पोर्ट्रेट साकार करून विश्वविक्रम प्रस्थापित केला. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे पोर्ट्रेट आजपर्यंत प्रणवने साकारले आहे. कोविड काळात छंद म्हणून सुरु झालेल्या ह्या उपक्रमाला आज व्यवसायाचे स्वरुप आले आहे.
प्रणवला सोशल मिडीयाच्या माध्यमातून देश विदेशातून डिजिटल पोर्ट्रेटच्या ऑर्डर येत असतात. प्रणवची ही कला जगभर प्रसिद्ध आहे. प्रणवने साकारलेल्या डिजिटल पोर्ट्रेटचे प्रदर्शन यापूर्वी नाशिकमध्ये झाले आहे. तसेच ज्येष्ठ समाजासेविका सिंधूताई सपकाळ ह्यांच्या सन्मती बाल निकेतन आश्रमाच्या सौजन्याने पुण्यात एक भव्य प्रदर्शन भरवण्यात आले होते.
ह्या दोन्ही प्रदर्शनाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर नाशिकमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शन आयोजित केले आहे. सोलो, कपल, फॅमिली, होम डेकोर असे डिजिटल पोर्ट्रेटचे वेगवेगळे प्रकार इथे आपल्याला बघायला मिळतील. ह्यापैकी आपल्या पसंतीचे पोर्ट्रेट आपण पर्सनल तसेच कॉर्पोरेट गिफ्टींगसाठी बूक करू शकतो. तसेच पर्सनलाईझ गिफ्टींगचा पर्याय आपल्याला उपलब्ध आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन २५ तारखेला सकाळी ११ वाजता नमिता कोहोक ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी ह्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला आपण जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, अशी विनंती आयोजकांतर्फे करण्यात आली आहे.