नाशिक,दि,२१ फेब्रुवारी २०२४ – नाशिकचे ज्येष्ठ चित्रकार केशव कासार यांच्या चित्रांचे प्रदर्शन दिल्लीतील ललित कला अकादमीच्या कलादालनात भरवले आहे.”चित्रेय”नावाच्या या समूहात पाच कलाकार सहभागी झाले आहेत.१७ ते २३ फेब्रुवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत हे प्रदर्शन कलाप्रेमींसाठी खुले असणार आहे.
केशव कासार यांची चित्रे कुंडलिनी जागृतीसाठी केलेल्या ध्यान साधने मधील अनुभव दर्शवतात. मेरुदांडातील षट्चक्रांचे आकार त्यांच्याशी निगडीत दैवते आणि वाहने असे आकार दर्शविणारी ही चित्रे समआंगिक आहेत. मध्यात एका अदृश्य रेषेने चित्राचे डावा उजवा असे दोन समभाग होतात. ध्यानावस्थेचा समतोल यातून जाणवतो.
वर्षा कुलकर्णी यांच्या अमूर्त चित्रात निसर्गातील घटितांचे प्रतिबिंब जाणवते. निसर्गातील काही दृश्य क्षण वर्षा यांनी अमूर्त पद्धतीने,केवळ रंगांच्या स्ट्रोकमधून व्यक्त केले आहेत. श्रद्धा कामत केकरे ला स्त्रीच्या जीवनात घडणारे बदल, त्यांचा तिच्या मनावर होणारा परिणाम आणि निसर्गतील घटकांवर त्याचे होणारे आरोपण चित्रीत करणे महत्वाचे वाटते. एखादी स्त्री आकृती आणि आजुबाजूला तिचे भावविश्व दाखवणारे सूक्ष्म घटक यांच्या संगमातून श्रद्धा काव्यात्मक पद्धतीने आशय व्यक्त करतात.
.
नीलिमा कढे यांची चित्रे अमूर्ताचा प्रवास दर्शवतात. शास्त्रीय संगीतामधे जसे स्वरावलीतून उमलणारे आकृतीबंध आस्वाद्य असतात तसे रंगछटांचे संमेलन त्यांच्या चित्रात उतरावे, त्यांचे एकमेकांबरोबर साहचर्य हाच चित्रविषय असावा असे त्यांना वाटते. रंग रेषा आकार या मूल घटकांची एकमेकांशी असलेली संगती उस्फूर्त रीतीने मांडत जाणे त्यांना अधिक भावते.
श्रुती गावकर ही व्यवसायाने आर्किटेक्ट असून तिला दृश्य कलेतील आधुनिक अभिव्यक्ती आपलीशी वाटते. इनस्टोलेशनच्या माध्यमातून स्पर्श भावनेशी निगडीत रंगानुभव ती दर्शकांना देऊ इच्छिते. पाचही कलाकारांचे आपापले दृश्यानुभव त्यांच्या कलाकृती व्यक्त करतात.असे मत कलाप्रेमी व्यक्त करता आहेत.