नाशिक,दि.२२ डिसेंबर २०२३ –नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे माजी अध्यक्ष तसेच भारतीय जनता पार्टीचे लोकप्रिय नेते,धुळे मतदार संघाचे माजी खासदार प्रताप (दादा) (वय ७५) यांचे आज शुक्रवार दिनांक २२ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले.अतिशय लाजवी व मनमिळावू असलेल्या प्रतापदादा यांचा आज ७५ वा वाढदिवस होता व आजच्या दिवशी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रतापदादा सोनवणे हे जनसंघाचे जुने कार्यकर्ते होते. त्यांनी धुळे मतदार संघाचे खासदार, नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार, नाशिक मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सभापती, अध्यक्ष व चिटणीस म्हणून कामकाज केले आहे. त्यांचे वडील स्व.नारायण मन्साराम सोनवणे हे देखील बागलाण मतदार संघाचे आमदार होते.
प्रताप दादा हे बागलाण तालुक्याच्या इतिहासातील लोकसभेत खासदार पदाचे नेतृत्व करणारे पहिले एकमेव खासदार होते. एक आदर्श खासदार व दिलदार व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ख्याती होती.त्यांच्या जाण्याने नाशिकच्या राजकिय वर्तूळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी शोभाताई सोनवणे, मुलगी पल्लवी संतोष पाटील, सोनिया साकेत घोडके, मुलगा तुषार प्रताप सोनवणे व नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा राहत्या घराजवळून कामधेनु बंगला डिसूजा कॉलनी, जेहान सर्कल सर्कल जवळ, गंगापूर रोड येथून दुपारी तीन वाजता निघेल. नाशिकच्या अमरधाम मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.