नाशिक,दि.२८ ऑगस्ट २०२३ –नाशिकमधील गेल्या ५४ वर्षांपासून संगीत क्षेत्रात तबल्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या पवार तबला अकॅडमी चा गुरुपौर्णिमा उत्सव रविवार दि. २७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी विशाखा सभागृह,कुसुमाग्रज स्मारक येथे उत्साहात पार पडला.
प्रसिद्ध छायाचित्रकार व पत्रकार अभय ओझरकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. याच बरोबर,रघुवीर अधिकारी , फणींद्र मंडलिक, महेश मालपाठक, चंद्रशेखर चिटणीस व नितीन पवार उपस्थित होते. सुरवातीला नाशिकचे प्रख्यात नाट्यसंगीत गायक व ऑर्गनवादक पंडित रवींद्र अग्निहोत्री यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.
या उत्सवात पवार तबला अकादमीच्या सुमारे १०० विद्यार्थ्यांनी तबला सहवादनातून आपली कला प्रस्तुत केली. यात त्रिताल, झपताल, रूपक, मत्त, एकताल, पंचम सवारी या तालांमध्ये कायदे, रेले, विविध प्रकारच्या बंदिशीने आपली कला विद्यार्थ्यांनी सादर केली. या सर्व विद्यार्थ्यांना हार्मोनियमवर साथसंगत आशुतोष इप्पर व मल्हार चिटणीस यांनी केली. या नंतर नाशिकचे युवा सतारवादक प्रसाद रहाणे यांनी मेघ रागातील व झपतालात निबद्ध असलेली बंदिश तसेच द्रुत एकतालात बंदिश व झाला प्रस्तुत करून रसिकांची वाहवा मिळवली, त्यांना अद्वय पवार यांनी समर्पक अशी तबला साथसंगत केली. त्यानंतर अकॅडमी चे शिष्य अद्वय पवार, कुणाल काळे, सुजीत काळे यांनी तीनतालामध्ये विविध घराण्यातील पेशकार, कायदे, चलन याद्वारे आपले एकल वादन सादर केले. कार्यक्रमाची सांगता प्रफुल्ल पवार (कॅजोन), रोहित श्रीवंत (तबला) यांनी झपतालात रेला, चलन इ. अशा पाश्चात्य आणि भारतीय संगीतात फ्युजनने सादर केले. या सर्वांना हार्मोनियमची साथ नाशिकचे युवा गायक व हार्मोनियम वादक ज्ञानेश्वर कासार यांनी केली.
विद्यार्थ्यांचा आणि कलाकारांचा नाशिक मधील मान्यवर कलाकारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन सायली गोखले, ध्वनी सचिन तिडके आणि ग्राफिक्स मिथिलेश मांडवगणे केले. कार्यक्रमास विद्यार्थी, पालक, कलारसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.