नाशिक,दि,२७ मार्च २०२४ –नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे.एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार विजय करंजकर यांचे तिकीट कापल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण पसरले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवार विजय करंजकर यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. काहीजरी झाले तरी मी निवडणुक लढणार असा पवित्रा विजय करंजकर यांनी घेतल्यामुळे महाआघाडीत अस्थिरतेचे वातावरण पसरले आहे.
अनेक महिन्यापासून नाशिकमधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून विजय करंजकर हे उमेदवार असतील अशी चर्चा होती मूळचे देवळाली कॅम्प परिसरात रहाणारे आणि देवळाली कॅन्टोमेंट बोर्डावर वर्चस्व असणारे करंजकर आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या मध्ये लढत होणार असे चित्र असतांना नाशिकच्या राजकारणात नवा ट्विस्ट आल्याने करंजकरांसह त्यांचे समर्थक प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.
आज काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेऊन विजय करंजकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली येत्या दोन दिवसात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून पडलो तरी चालेल पण आपण निवडणुक लढवणार असे संकेत दिले आहेत.