
नाशिक,दि,२९ जानेवारी २०२४ –गर्गे परिवारातील तीन पिढ्यांनी तब्बल शंभर वर्षे शिल्पकला क्षेत्रात अनमोल योगदान दिले आहे. शिल्पे प्रेरणादायी असतात व अनेक पिढ्यांना जाज्वल्य, खऱ्या इतिहासाची ओळख करुन देतात. असे प्रतिपादन ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
ज्येष्ठ चित्रकर्ती अरुणा मदन गर्गे यांच्या चित्रदालनाचे ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आज (दि. २९ ) उदघाटन करण्यात आले. स्टुडिओच्या शतकपूर्ती महोत्सवाचा भाग म्हणून सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्य व्यवसाय मंत्री मुनगंटीवार यांनी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील गर्गे आर्ट स्टुडिओस सदिच्छा भेट दिली. नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जाऊन दर्शन घेतले. गर्गे आर्ट स्टुडिओत ज्येष्ठ चित्रकार व शिल्पकार अरुणा मदन गर्गे यांच्या चित्रकला दालनाचे उद्घाटन केले.

या चित्रदालनात ४० व्यक्तीचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुख्यत: तैलरंग व पेस्टल या माध्यमात केलेली चित्रांकने केलेली आहेत. गर्गे स्टुडिओत तीन पिढ्यांतील शिल्पकारांनी घडवलेली शिल्पे अचंबित करणारी व राष्ट्र भावना जागृत करणारी आहेत अशी भावना मंत्री महोदयांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्रवीर सावरकर, महात्मा ज्योतिबा फुले व अनेक राष्ट्रपुरुषांची स्मारक शिल्प त्यांनी बारकाईने पहिली व शिल्पकार अरुणा व श्रेयस गर्गे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
या कार्यक्रमा प्रसंगी आ सीमा हिरे,भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव,नाना शिलेदार,आर्की संजय पाटील, गिरीश टकले,विद्या टकले,डॉ. मीना बापये, डॉ. मनोहर बापये. देशदूतच्या संपादिका वैशाली बालाजीवाले,चित्रकार संजय देवधर,तेजस गर्गे,श्रेयस गर्गे ,मंदार गर्गे,मिलिंद गर्गे,आदी सह मान्यवर उपस्थित होते.


